सहचर (मित्र) पिकांची लागवड

१. झाडे एकमेकांना त्रासदायक ठरणारी नसावीत !

श्री. राजन लोहगांवकर

‘साधारणपणे जेव्‍हा एकाच जागेत किंवा एकमेकांजवळ दोन पिके एकाच वेळी घेतली जातात, तेव्‍हा ती एकमेकांना त्रासदायक न ठरता साहाय्‍य करणारी असावी लागतात. दोन पिके एकाच दिशेने वाढणारी असूनही चालत नाही, उदा. कुंडी लहान असेल आणि पिके एकमेकांना पूरक जरी असली, तरी मुळा आणि गाजर किंवा बटाटा एकत्र घेऊन चालणार नाही. तसेच वांगी आणि टोमॅटोही एकत्र घेऊन लाभ होणार नाही.

२. एकमेकांना साहाय्‍य करणार्‍या झाडांची उदाहरणे 

झाडांमध्‍ये काही प्रकार असे आहेत की, जे कुठल्‍याही भाज्‍यांसोबत घेतले, तरी चालतात. ते नुसतेच फुले किंवा फळे देत नाहीत, तर बागेतील किडींवर नियंत्रण ठेवतात आणि मातीही सुपीक करतात. अशी पिके म्‍हणजे झेंडू आणि चवळी. झेंडू किडींना स्‍वतःकडे आकर्षित करून घेतो, तसेच आपल्‍या मुळांद्वारे सूत्रकृमींवरही (रोपांच्‍या मूळांतून रस शोषणार्‍या बारीक किड्यांवर) नियंत्रण ठेवतो. चवळीचे रोप शेंगा किंवा दाणे देण्‍यासह मातीमध्‍ये नत्राची (नायट्रोजनची) पातळी वाढवून नत्रप्रिय झाडांना वाढीसाठी साहाय्‍य करते. झाडे लावतांना माती, पाण्‍याची मात्रा, एकमेकांच्‍या वाढण्‍यासाठीची जागा, एकमेकांना ते साहाय्‍य करतात कि स्‍पर्धा करतात, तेही बघणे आवश्‍यक आहे.