देवतेला वाहिलेली फुले आणि हार यांचे आध्‍यात्मिक स्‍तरावरील महत्त्व

‘निसर्गातील विविध घटक विविध पंचतत्त्वांशी संबंधित असतात, उदा. माती पृथ्‍वीतत्त्वाशी, जल आपतत्त्वाशी आणि मेघ वायुतत्त्वाशी. निसर्गातील फुले सर्वांना स्‍वत:कडे आकृष्‍ट करतात; कारण नैसर्गिक फुलांमध्‍ये मुळातच पुष्‍कळ सात्त्विकता असते. त्‍यामुळे त्‍यांचा गंध, रंग आणि स्‍पर्श आकर्षक असतो. विविध रंगांची फुले केवळ मनुष्‍यालाच मोहून घेत नाहीत, तर ती देवालाही प्रिय असतात.

कु. मधुरा भोसले

१. देवतेला वाहिलेली फुले आणि हार यांचे महत्त्व  

फुलांच्‍या सात्त्विकतेमुळे त्‍यांच्‍याकडे पाहिल्‍यावर आपला भाव जागृत होतो. त्‍यामुळे जेव्‍हा आपण देवाला फुले किंवा फुलांपासून बनवलेला हार घालतो, तेव्‍हा आपला देवाप्रतीचा भाव जागृत होतो. देवतेच्‍या फुलांमध्‍ये भक्‍ताचा देवाप्रती असणारा भाव आकृष्‍ट होतो. त्‍यामुळे जेव्‍हा देवाला भावपूर्णरित्‍या फुले वाहिली जातात किंवा हार घातला जातो, तेव्‍हा फुलांच्‍या भावस्‍पर्शामुळे देवतेची मूर्ती किंवा चित्र यांमध्‍ये देवतेचे तत्त्व जागृत होते. त्‍यानंतर देवतेची मूर्ती किंवा चित्र यांमध्‍ये कार्यरत झालेली सात्त्विकता आणि चैतन्‍य फुलांच्‍या देठातून फुलांमध्‍ये प्रविष्‍ट होऊन फुलांचा गंध, फुलांचा रंग आणि फुलांच्‍या पाकळ्‍या यांतून संपूर्ण वातावरणामध्‍ये प्रक्षेपित होते. अशा प्रकारे देवतेला वाहिलेली फुले सात्त्विक असल्‍यामुळे ती भाव, चैतन्‍य आणि आनंद यांचे वहन अन् प्रक्षेपण करतात. त्‍यामुळे वातावरण सात्त्विक, शुद्ध आणि भावमय होते.

२. देवतेला वाहिलेली फुले आणि हार यांंतील भेद अन् त्‍यांच्‍यामुळे होणारा आध्‍यात्मिक लाभ 

देवतांना वाहिलेली फुले आणि हार यांच्‍यामध्‍ये देवतेच्‍या सगुण-निर्गुण स्‍तरावरील तत्त्वलहरी कार्यरत होतात. त्‍यामुळे देवाला वाहिलेली फुले सात्त्विकता, शक्‍ती आणि चैतन्‍य यांनी भारित झाल्‍यामुळे ती वातावरणातील रज-तम कणांशी सूक्ष्म स्‍तरावर युद्ध करतात. देवतेला वाहिलेल्‍या फुलांचे रूपांतर जेव्‍हा निर्माल्‍यात होते, तेव्‍हा स्‍थुलातून फुले सुकलेली असली, तरी सूक्ष्म स्‍तरावर त्‍यांच्‍यामध्‍ये सात्त्विकता आणि चैतन्‍य कार्यरत असते. त्‍यामुळे निर्माल्‍यही रज-तम प्रधान त्रासदायक शक्‍तीच्‍या स्‍पंदनांशी सूक्ष्म युद्ध करून वातावरण शुद्ध आणि सात्त्विक ठेवण्‍यासाठी साहाय्‍यक असतात. फुले व्‍यक्‍ती किंवा वातावरण यांतील त्रास शोषून घेऊन चैतन्‍याचे प्रक्षेपण करतात. या प्रक्रियेमुळे फुले लवकर सुकणे, करपल्‍याप्रमाणे दिसणे किंवा त्‍यांच्‍या रंगामध्‍ये पालट होणे यांसारखे स्‍थुलातील परिणाम देवतांना वाहिलेल्‍या फुलांमध्‍ये होत असतात. देवतेला वाहिलेले एक-एक फूल व्‍यष्‍टी स्‍तरावर आणि मर्यादित स्‍थानापुरते कार्यरत असते. हारामध्‍ये अनेक फुले एकत्रित झाल्‍यामुळे फुलांची शक्‍ती संघटित झालेली असते. त्‍यामुळे हाराचा लाभ व्‍यष्‍टी-समष्‍टी अशा दोन्‍ही स्‍तरांवर होऊन वायूमंडलाची शुद्धी अधिक प्रमाणात होते.  देवतांना वाहिलेली फुले आणि हार यांमध्‍ये त्‍या त्‍या देवतेचे तत्त्व ग्रहण होऊन त्‍याचा उपयोग निर्माल्‍य म्‍हणून केसात माळल्‍यास किंवा वहात्‍या पाण्‍यात विसर्जित केल्‍यास त्‍याचा आध्‍यात्मिक स्‍तरावर अधिक प्रमाणात लाभ होतो.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आताची आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०२१)

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.