पिंपरी, २४ डिसेंबर (वार्ता.) – पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कोरोना महामारीमुळे रुग्णांच्या उपचारासाठी शहरात ‘स्पर्श मल्टीस्पेशालिटी रुग्णालय’ यांना भोसरी येथील ‘रामस्मृती मंगल कार्यालय’ आणि ‘हिरा लॉन्स’ येथे ‘कोविड सेंटर’ उभारण्याची अनुमती देण्यात आली होती; मात्र ‘कोविड सेंटर’ने महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या आर्थिक संगनमताने बनावट देयके घेतली असल्याचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त पुणे यांच्याद्वारे चौकशी समिती नेमून उच्च न्यायालयात सादर केला आहे.
या प्रकरणी अतिरिक्त आयुक्तांवर कारवाई करण्यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. महापालिका आयुक्तांनी शासकीय चौकशी समितीच्या अहवालातील दोषींवर कारवाई करून ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ सादर करण्याऐवजी अहवालाच्या अभ्यासासाठी दुसर्या अंतर्गत समितीच्या स्थापनेची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यामुळे स्पर्श रुग्णालय आणि प्राथमिकदृष्ट्या दोषी असलेले संबंधित अधिकारी यांची चौकशी चालू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना दिली.