‘डिजिटल’ अटकेद्वारे फसवणूक करणार्‍या चौघांना सूरत येथून अटक !

मुंबई – मालाडमधील ६८ वर्षांच्या वृद्धाच्या विरोधात आर्थिक गुन्हा नोंद झाल्याची भीती दाखवून त्यांना डिजिटल अटक करत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणार्‍या ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जय रसीकभाई मोराडीया, धरम मुलुभाई गोहिल, संदीप प्रतापभाई केवडीया, जय जितेंद्रभाई असोद्रिया अशी त्यांची नावे असून ते आंतरराज्यीय टोळीशी संबंधित आहेत.

तक्रादार व्यक्तीला एका अज्ञाताने दूरभाष करून तो पोलीस असल्याचे सांगितले. तक्रारदार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या आधारकार्डवरून गोयल नावाच्या व्यक्तीने बँकेत खाते उघडले आहे. या खात्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगून त्यांना ‘चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल’, असे सांगण्यात आले. व्हिडिओ कॉल करून पोलिसांच्या गणवेशात असलेल्या व्यक्तीने त्यांना डिजिटल अटक केल्याचे सांगितले. यातून सुटका होण्यासाठी त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती साडेआठ लाख रुपये बोगस पोलिसांनी दिलेल्या खात्यावर हस्तांतरित केल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी मालाड पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी अन्वेषणाअंती चौघांना सूरतमधून अटक केली.

संपादकीय भूमिका

असे करणार्‍यांना कारागृहात डांबण्याचीच शिक्षा द्यायला हवी !