संपादकीय : बीडमध्ये जंगलराज ?

हत्या करण्यात आलेले सरपंच संतोष देशमुख

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन माहिती प्रतिदिन बाहेर येत आहे. हत्या होऊन जवळपास १ मास उलटून गेला आहे, तरी मुख्य आरोपीपर्यंत पोलीस अद्याप पोचू शकलेले नाहीत. या प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना मात्र पुष्कळ ऊत आला आहे. या आरोपांतून कलाकारही सुटले नाहीत. काही कलाकारांचाही या घटनेशी संबंध जोडला गेल्यामुळे मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन याचा निषेध नोंदवला आणि खोट्या बातम्या कोणतीही शहानिशा न करता देणार्‍या प्रसारमाध्यमांवर अंकुश ठेवण्यासाठी शासनाला आवाहन केले. सरपंच संतोष देशमुख यांच्या नृशंस हत्याप्रकरणी आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये सर्वपक्षीय मोर्चे निघत असून त्यात सहस्रोंच्या संख्येने लोक उपस्थिती लावत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांना मरेपर्यंत कुंपणाच्या तारांनी मारण्यात आले, डोळे फोडले, त्यांच्यावर लघुशंका केली, असे विविध माहितीतून समोर येत आहे. एकूणच देशमुख यांना क्रूर पद्धतीने हालहाल करत मारले आहे, हे लक्षात येते. यामुळे ‘बीडमध्ये नेमके काय चालू आहे ?’, असा प्रश्न पडल्याविना रहात नाही. बीडमध्ये ‘अवादा आस्थापना’च्या कार्यालयाजवळ ३ आरोपी आले, त्यांनी रखवालदाराला मारहाण केली, नंतर आस्थापनाच्या प्रकल्प व्यवस्थापकालाही मारहाण केली. या वेळी गावाचे सरपंच देशमुख यांना बोलावल्यावर त्यांच्यासमवेत आलेल्या लोकांनी मारहाण करणार्‍या लोकांना चोप देऊन पळवून लावले. याचा राग आरोपींनी नंतर ३-४ दिवसांनी संतोष देशमुख वाहनातून जात असतांना त्यांच्यावर आक्रमण करून आणि त्यांची हत्या करून काढला.

बीड येथील अराजक !

बीड हा तसा दुष्काळी भाग आहे. आता बीडमध्ये सौरऊर्जा, पवनऊर्जा यांची आस्थापने आली आहेत. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पैसा येत आहे. पुण्यातील मुळशीमध्ये आस्थापने आल्यामुळे ज्याप्रमाणे भूमीला किंमत आली, तोच भाग बीडमध्ये झाला आहे. त्यामुळे अंतर्गत वादातून गुन्हेगारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथे खंडणीखोर, वाळूमाफिया यांसह स्वत:चे वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून हाणामारीचे प्रकार घडतात. संपूर्ण राज्यात बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक, म्हणजे एकूण १ सहस्र २२२ पिस्तुलांचे परवाने दिले गेले आहेत. हे परवाने अधिकृत आहेत, तर अनधिकृत पिस्तुले किती जणांकडे असतील ? याची गणतीच नाही. हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या गटातील कैलाश फड इत्यादींचे हवेत गोळीबार करतांनाचे व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. त्याचसमवेत स्वत: मंत्री धनंजय मुंडे हवेत गोळीबार करतांनाच्या छायाचित्रासह अनेकांची तशी छायाचित्रे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सामाजिक माध्यमांत प्रसारित केली आहेत. अंजली दमानिया यांनी अशा लोकांना ‘गुंड’ म्हणून संबोधत त्यांच्याकडील शस्त्रपरवाने रहित करून शस्त्रे जमा करून घेण्याची मागणी केली आहे.

बीडमध्ये गत ५ वर्षांत हत्येचे एकूण ३०८ गुन्हे नोंद झाले आहेत. त्यांपैकी २९५ हत्या प्रकरणे उघड झाली असून १३ हत्या प्रकरणे उघड झालेली नाहीत. हत्येच्या प्रयत्नांचे ७६५ गुन्हे नोंद असून त्यांपैकी ७६० प्रकरणे उघड झाली असून ५ प्रकरणांचा उलगडा झालेला नाही. बलात्काराचे ७८२ गुन्हे नोंद आहेत. गत ५ वर्षांच्या तुलनेत हत्येच्या प्रयत्नांचे सर्वाधिक गुन्हे या वर्षी नोंद झाले आहेत. गुन्ह्यांची ही भयावह आकडेवारी लक्षात घेता तेथे अराजकाची परिस्थिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रपरवाने का वाटले जात आहेत ? यातून तेथील कायदा-सुव्यवस्थेची स्थितीही भीषण असल्याचे लक्षात येते. आणखी एका धक्कादायक घटनेची नोंद एका प्रशासकीय अधिकार्‍याने सांगितल्याचे २ आमदारांनी सांगितले असून त्यामध्ये ‘एक आय.ए.एस्. अधिकारी एका स्थानिक नेत्याच्या घरी गेल्यावर तो पुन्हा कधी जिल्ह्यात आणि राज्यातही दिसला नाही’, अशी माहिती दिली. (म्हणजे त्याचीही हत्या झाल्याचे अप्रत्यक्ष सांगितले आहे.) मस्साजोग येथील हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार किंवा आरोपी म्हणून ज्याचे नाव समोर येत आहे, त्याचे जिल्ह्यातील स्थानिक आमदार आणि सध्या सत्ताधारी गटात असणार्‍या मंत्र्याशी घनिष्ट संबंध असल्याचे अनेक पुरावे सामाजिक माध्यमे अन् प्रसारमाध्यमे यांमध्ये दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे या मंत्र्याच्या त्यागपत्राची मागणी होत आहे, तसेच या आरोपीची स्थानिक पोलिसांशी नियमित ऊठबस असल्याचेही व्हिडिओ समोर आले आहेत. बीड येथील गुन्ह्यांची नोंद असलेली आकडेवारी आणि परिस्थिती यांतून बिहारमधील ‘जंगलराज’चीच आठवण होते. बिहारमध्येही उघडपणे शस्त्रे चालवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यात आली होती.

व्यवस्थेतच आमूलाग्र पालट हवा !

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी भाष्य करतांना ‘बीड येथे अराजक आहे’, हे मान्य करत ‘बीडमधील गुन्हेगारी मोडून काढू’, असे सांगितले आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली असली, तरी एकूणच तेथील सर्व व्यवस्थेतच आमूलाग्र पालट करणे आवश्यक आहे. त्यासाठी चांगले पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी यांचा भरणा करून त्यांच्या माध्यमातून उत्तरप्रदेशात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थानिक गुंडांचा कोणतीही दयामाया न दाखवता खात्मा केला तसेच करणे आवश्यक आहे. तसे अधिकारही पोलीस प्रशासनाला देणे आवश्यक आहेत. बीड येथे निर्माण झालेल्या गुन्हे विश्वामागे स्थानिक ‘आका’चा हात आहे. हा ‘आका’च या स्थितीला उत्तरदायी आहे, असे अनेक लोकप्रतिनिधी सांगत आहेत. हा ‘आका’ कोण आहे ? त्यावर कठोर कारवाई केव्हा होणार ? हे मुख्यमंत्र्यांनी घोषित करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा प्रत्येक जिल्हा, राज्य येथे असे ‘आका’, ‘दादा’ हेच पोलीस, प्रशासन यांहून वरचढ ठरतील. सामान्य जनतेने कितीही आंदोलने केली, मोर्चे काढले, तरी जोपर्यंत व्यवस्था सुधारत नाही, तोपर्यंत हत्या आणि अन्य गुन्हे यांचे प्रकार होत रहातील. संतोष देशमुख कर्तृत्ववान होते, त्यांनी गावात चांगली कामे केली होती, तसेच ते सत्ताधारी पक्षातील मंत्री पंकजा मुंडे यांच्या जवळचे होते. त्यामुळे त्यांचे प्रकरण गाजले. जिल्ह्यात जी दहशत, भीती सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे, ती खरेतर गुन्हेगारांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. या प्रकरणात अनेक नावांची आणि विषयाशी दुरान्वये संबंध नसणार्‍या घटनांची वाच्यता करून या प्रकरणातील मूळ विषयावरून लक्ष दुसरीकडे भरकटवण्याचा प्रयत्न नेतेमंडळींनी टाळला पाहिजे. आता विशेष अन्वेषण पथकाने या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा आणि पीडितांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे !

बीड येथील अराजक दूर करून कायदा-सुव्यवस्थेची चांगली स्थिती निर्माण करण्यासाठी प्रामाणिक पोलीस हवेत !