सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.
मागील लेखात आपण ‘सप्तलोकांची नावे आणि ती विशिष्ट प्रकारे लिहिण्यामागील नियम’ यांविषयी माहिती पाहिली. आजच्या लेखात आणखी काही शब्दांच्या व्याकरणाविषयी जाणून घेऊ.
(लेखांक १६ – भाग ४)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/632441.html
(टीप : या विषयातील ‘२ अ’ ते ‘२ अं’ ही सूत्रे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये यापूर्वी १८ नोव्हेंबर, २५ नोव्हेंबर आणि २ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखांत देण्यात आली आहेत.)
२ क. ‘वहाणे’, ‘पहाणे’ आणि ‘रहाणे’ हे शब्द लिहिण्याविषयी नियम : प्रचलित मराठी लिखित भाषेत ‘वाहणे’, ‘पाहणे’ आणि ‘राहणे’ अशी रूपे वापरली जातात; परंतु ही रूपे उच्चारांनुसार अयोग्य आहेत. बहुतांश मराठी भाषिक लोक बोलतांना ‘वहाणे’, ‘पहाणे’ आणि ‘रहाणे’ असे उच्चार करतांना आढळतात. यांतील ‘वहाणे’ हा शब्द संस्कृत भाषेतील त्याच अर्थाच्या ‘वह्’ या धातूच्या रूपाशी मिळताजुळता आहे. त्यामुळे आपण या शब्दांच्या प्रचलित व्याकरणात पालट केला असून हे शब्द ‘वहाणे’, ‘पहाणे’ आणि ‘रहाणे’ याप्रमाणे लिहिण्याचे धोरण स्वीकारले आहे. या शब्दांच्या वाक्यांप्रमाणे पालटणार्या निरनिराळ्या रूपांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
२ क १. ‘वहाणे’ या शब्दाची वाक्यांतील विविध रूपे
२ क १ अ. ‘प्रवाहदर्शक (प्रवाह दर्शवणार्या)’ वाक्यांतील रूपे
१. पाणी वहाते.
२. पाटाचे पाणी सर्व झाडांमधून वहावे, यासाठी त्याने दिवसभर राबून पाण्याचा मार्ग मोकळा केला.
३. वहात्या पाण्यावर शेवाळे जमत नाही.
४. वारा वहातो.
५. वारा वहाता रहावा, यासाठी आकांक्षाने दोन्ही खिडक्या उघडल्या.
२ क १ आ. ‘अर्पण करणे’ या अर्थाच्या वाक्यांमधील रूपे
१. शिवाला बेल वहातात.
२. देवाला वहाण्यासाठी पत्री आणली.
३. आई ही फुले देवीला वहाणार आहे.
४. श्री गणपतीला दूर्वा वहाव्यात.
५. श्रद्धा श्रीकृष्णाच्या चरणी तुळशीपत्रे वहात होती.
थोडक्यात ‘प्रवाह दर्शवणे’ आणि ‘अर्पण करणे’ या दोन्ही अर्थांनी लिहितांना ‘वहाणे’ हाच शब्द वापरावा अन् त्याची वाक्यांतील रूपेही सारख्याच पद्धतीने लिहावीत.
२ क २. ‘पहाणे’ या शब्दाची वाक्यांतील विविध रूपे
अ. मी आणि मामा जत्रा पहाण्यासाठी गेलो.
आ. तुम्ही एकदा तरी जाऊन तिची चित्रे पहायला हवीत.
इ. तो चकित होऊन पहात राहिला.
ई. आम्ही प्रदर्शन पहाणार आहोत.
उ. तानाजी मालुसरे यांनी आक्रमण करण्यापूर्वी गडाची पहाणी केली.
२ क ३. ‘रहाणे’ या शब्दाची वाक्यांतील विविध रूपे
अ. आता आम्ही गावी जाऊन रहाणार आहोत.
आ. श्री. कानडे पूर्वी दत्तमंदिराच्या मागे रहात.
इ. त्याने घरात रहावे, यासाठी आई-वडिलांनी पुष्कळ प्रयत्न केले.
ई. त्यांचे रहाणीमान आता उंचावले आहे.
उ. त्याची रहाणी साधी आहे.
२ क ४. ‘वहाणे’, ‘पहाणे’ आणि ‘रहाणे’ या शब्दांच्या रूपांत होणारे पालट : काही वाक्यांमध्ये ‘वहा’चे ‘वाह’, ‘पहा’चे ‘पाह’ आणि ‘रहा’चे ‘राह’ अशी रूपे होतात. त्यानंतर त्यांतील ‘ह’ला र्हस्व अथवा दीर्घ ‘उ-कार’ किंवा ‘इ-कार’ लागतो आणि एखादा प्रत्यय लागून नवीन शब्द सिद्ध होतात. काही वेळा प्रत्यय न लागताही शब्द सिद्ध होतात. ‘वारे वहाणे’ हा मूळ शब्दप्रयोग आहे; मात्र त्याचा ‘सूर्यास्त झाला आणि गार वारे वाहू लागले’, या वाक्यात उपयोग होतांना ‘वहाणे’ या शब्दातील पहिल्या दोन अक्षरांत पालट होऊन ती ‘वाह’ अशी झाली. त्यानंतर ‘ह’ या अक्षरामध्ये ‘ऊ-कार’ समाविष्ट होऊन ‘वाहू’ असे रूप सिद्ध झाले. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. मागील वर्षीच्या पुरामध्ये तो बांध वाहिला.
आ. आत्या म्हणाली, ‘‘भाऊ, देवाला शिळी फुले वाहू नयेत.’’
इ. दादा चिंटूला म्हणाला, ‘‘पाहू बरं किती लागलं आहे ते.’’
ई. आम्ही श्री भवानीदेवीची नवीन मूर्ती पाहून आलो.
उ. मी चार दिवस मावशीकडे राहून आलो.
(क्रमशः पुढील शुक्रवारी)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१२.२०२२)