लुप्त होत असलेल्या औषधी वनस्पतींचे संवर्धन करा ! – जागतिक आयुर्वेद परिषदेत आवाहन

पणजी – पृथ्वीवर प्रत्येक २ वर्षांमध्ये एक उपयुक्त अशी औषधीय वनस्पती लुप्त होत चालली आहे आणि ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या लुप्त होण्याच्या प्रक्रियेच्या तुलनेत १०० पटींनी अधिक आहे. भारतातील ९०० मुख्य औषधी वनस्पतींपैकी १० टक्के वनस्पती लुप्त होण्याचा धोका सर्वाधिक आहे. औषधी वनस्पतींचे संवर्धन होण्यासाठी केवळ त्याविषयी जागृती करून चालणार नाही, तर यासाठी नियोजनबद्धरित्या आणि ध्येयाने प्रेरित अशी योजना आखावी लागणार आहे, असे आवाहन कांपाल, पणजी येथे ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत झालेल्या ९ व्या जागतिक आयुर्वेद परिषदेत ‘औषधी वनस्पतीचे संवर्धन’ या विषयावरील ११ डिसेंबर या दिवशी झालेल्या एका कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी केले.

यामध्ये छत्तीसगड येथील ‘मेडिसीनल अँड ॲरोमॅटीक प्लान्ट्स’ या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.ए.सी.एस्. राव म्हणाले, ‘‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ या जागतिक संघटनेच्या मते सुमारे २० ते २५ सहस्र वनस्पतींचे अस्तित्व अधिक धोक्यात आले आहे. शहरीकरण, जंगली वनसंपदा नष्ट होणे, औषधी वनस्पतींची लागवड न करणे आदी कारणांमुळे ही स्थिती ओढवली आहे. यावर उपाय म्हणून लागवडीचा अभ्यास करणे, त्यासंबंधी शास्त्रोक्त माहितीचा संग्रह करणे, औषधांच्या संवर्धनासाठी आवश्यक कायदे करणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे.’’

राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम म्हणाले, ‘‘भारतात ४५ सहस्र वनस्पतींचे प्रकार आहेत आणि यामधील ७ सहस्र ३३३ औषधी वनस्पती आहेत. औषधी वनस्पतींपैकी केवळ १५ टक्के वनस्पतींची लागवड केली जाते. औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी त्याविषयी सर्व माहितीचा संग्रह करणे अत्यावश्यक आहे.’’ आयुष मंत्रालयाचे माजी साहाय्यक सचिव जितेंद्र शर्मा म्हणाले, ‘‘राष्ट्रीय डिजिटल पोर्टल’ सिद्ध करून त्यामध्ये जो कुणी औषधी वनस्पतींची लागवड करत आहे, त्याने त्यासंबंधी माहिती घातली पाहिजे. ही माहिती सार्वजनिक झाल्याने तिचा पुढे चांगला वापर करता येईल.’’