प्रतापगडाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गडदुर्ग इस्लामी अतिक्रमणांपासून मुक्त करावेत ! – नितीन शिंदे, माजी आमदार आणि निमंत्रक, शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त ! अन्य गडांवरील अनधिकृत बांधकामांचे काय ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

मुंबई – आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘शिवप्रतापभूमी’वरील दर्गा, मशिद यांसह निर्माण केलेली अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यासाठी ‘शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलना’ची स्थापना करून संघटितपणे लढा दिला. सध्या विविध गडदुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आंदोलन करत आहे. विशेष करून विशाळगडावरील अतिक्रमणांच्या मुक्तीसाठी समिती लढा देत आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याला असणारे अतिक्रमण हटवले, त्याप्रमाणे सरकारने महाराष्ट्रातील अन्य गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करावे आणि या सर्व गडदुर्गांना पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी माजी आमदार, भाजप नेते आणि ‘शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक श्री. नितीन शिंदे यांनी केली.

श्री. नितीन शिंदे

ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त ! अन्य गडांवरील अनधिकृत बांधकामांचे काय ?’, या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.


श्रीमती विजयाताई भोसले

या वेळी वाई (सातारा) येथील प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले म्हणाल्या की, या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांना श्री भवानीमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद लाभले आहेत.

___________________________

अनधिकृत बांधकाम तोडले, ही शिवभक्तांना आनंद देणारी गोष्ट ! – डॉ. पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक

डॉ. पांडुरंग बलकवडे

अफझलखानाने अनेक मंदिराचा विध्वंस केला आणि अनेक हिंदूंना बाटवले. याच अफझलखानाच्या कबरीचे अनधिकृत बांधकाम प्रतापगडाच्या पायथ्याशी करून त्याचे उद्दात्तीकरण करण्यात आले. या गोष्टींची सर्व शिवभक्तांना चीड येत होती. मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश तत्कालीन राज्य सरकारला दिले असतांनाही त्याची कार्यवाही होत नव्हती. शेवटी सध्याच्या महाराष्ट्र सरकारने हे अनधिकृत बांधकाम तोडले, ही शिवभक्तांना आनंद देणारी गोष्ट आहे.


हे पहा –

हिंदु जनजागृती समिती आयोजित 🔊 विशेष मराठी संवाद

🟢 प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त ! अन्य किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामांचे काय ?

 _______________________________

महाराष्ट्रातील २० हून अधिक महत्त्वाच्या गडदुर्गांवरील अतिक्रमणे सरकारने हटवावीत ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

आताच्या सरकारने प्रतापगडावरील अतिक्रमण हटवले, ही सरकारची कृती अभिनंदनीय आहे. हा तर आरंभ आहे, असे आम्ही मानतो. महाराष्ट्रातील किमान २० ते २२ महत्त्वाच्या गडदुर्गांवर अतिक्रमणे झाली असून यांविषयी वनविभाग, राज्य आणि केंद्रीय पुरातत्व विभाग या सर्वांना माहिती असून ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. वन आणि पुरातत्व विभाग यांच्यासह महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व गडदुर्गांवरील अतिक्रमणे हटवावीत, अशी समस्त हिंदू संघटनांची मागणी आहे. प्रत्येक गडदुर्गांचे संवर्धन करून तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची स्मारके उभारली पाहिजेत. या संदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने लक्ष घालावे, अशी आमची मागणी आहे.