गोव्यात १ ऑक्टोबरपासून पाणीदेयकात ५ टक्के वाढ

प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रारंभी होणार वाढ

गोवा सरकारचा १ ऑक्टोबरपासून पाण्याच्या देयकात ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय

पणजी, २ ऑक्टोबर (वार्ता.) – गोवा सरकारने १ ऑक्टोबरपासून पाण्याच्या देयकात (बिलात) ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारच्या पाणीदेयकांत ही वाढ होणार असून पुढे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पाणीदेयकात वाढ होणार आहे. आता केलेली दरवाढ मे २०२० पासून लागू होणार होती; पण ती आता १ ऑक्टोबरपासून लागू केली आहे. सध्याच्या वाढत्या महागाईत नागरिकांना आणखी एका संकटाला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या वर्षी १ सप्टेंबरपासून प्रत्येक पाणीमीटर जोडणीदाराने मासाला १६ सहस्र लिटर पाणी वापरले, तर ते त्याला विनामूल्य दिले जाईल, असे घोषित केले होते. पाण्याचा वापर १६ सहस्र लिटरहून अधिक झाला, तर मात्र ० ते १५ सहस्र लिटरपर्यंत ३ रुपये ५० पैसे प्रतिलिटर आणि १५ ते २५ सहस्र लिटरपर्यंत ९ रुपये प्रतिलिटर आकारले जातील, अशी योजना आहे. या दरांतही आता ५ टक्के वाढ होणार आहे. सरकारच्या पाणीदेयकातील वाढीच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आमदारांना विकत घेण्यासाठी आलेला खर्च वसूल करण्यासाठी वाढ ! – आमदार विजय सरदेसाई

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारच्या निर्णयावर टीका करतांना म्हटले, ‘‘गोव्यातील प्रत्येक घरात १६ सहस्र लिटरपर्यंत वापर केल्यास पाणी विनामूल्य मिळेल, असे भाजपने निवडणुकीपूर्वी सांगितले होते; मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर सहाच मासांत भाजप सरकारने वचनावर पलटी मारली आणि पाणीदेयकात वाढ केली आहे.

भाजपला मते दिले; म्हणून पाणीदेयकात वाढ करून मतदारांना दंड केला आहे. काँग्रेसच्या आमदारांना विकत घेण्यासाठी आलेला खर्च भाजप सरकार गरीब जनतेकडून वसूल करत आहे का ? असाही प्रश्न गोमंतकीय जनतेला पडला आहे.’’

काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्या नेत्यांनीही सरकार गरिबांना लूटत असल्याची टीका केली आहे.