सद्गुरु स्वाती खाडये साधनेविषयीच्या मार्गदर्शनासाठी लातूर शहरात पोचल्यावर त्यांचे मार्गदर्शन होणार असलेल्या सभागृहातील १५ लाद्या आपोआप वर येणे : ‘५.५.२०२२ या दिवशी लातूर येथील ‘जानाई महिला नागरी पतसंस्थे’च्या सभागृहात गुरुपौर्णिमेनिमित्त धर्मप्रेमी, जिज्ञासू आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक यांच्यासाठी सद्गुरु स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शनासाठी सद्गुरु स्वातीताई आणि मी (सनातनच्या ११२ व्या संत पू.(कु.) दीपाली मतकर) लातूर शहरात पोचल्यानंतर काही कालावधीतच ‘जानाई महिला नागरी पतसंस्थे’च्या सभागृहातील १५ लाद्या आपोआप वर आल्या.
त्या वेळी ‘खड् ऽऽ खड्’, असा भूकंप झाल्याप्रमाणे आवाज आला. या आवाजामुळे सभागृहात कार्यक्रमाची पूर्वसिद्धता करणारे साधक घाबरून सभागृहातून बाहेर आले. या घटनेबद्दल सद्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे कार्य वाढू नये’, यासाठी सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींनी आक्रमण केले आहे.’’
– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर (मे २०२२)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |