मुंबईतील दहीहंडी उत्सवात ७ व्या थरावरून पडून घायाळ झालेल्या गोविंदाचा मृत्यू !

संदेश दळवी

मुंबई – ३ दिवस मृत्यूशी झुंज देणारे ‘गोविंदा’ संदेश दळवी (वय २२ वर्षे) यांचा मृत्यू झाला. ते ‘शिवशंभो गोविंदा पथका’तील गोविंदा होते. दहीहंडी उत्सवात सहभागी झाल्यावर ते ७ व्या थरावरून पडून घायाळ झाले होते. त्यांची मान आणि मेंदू यांना पुष्कळ दुखापत झाली होती. त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते; पण उपचारांच्या काळातच त्यांचा मृत्यू झाला. घायाळ झाल्यावर त्यांना कोणतेही सरकारी साहाय्य मिळाले नाही. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि भावंडे आहेत. विलेपार्ले (पूर्व) येथे वाल्मिकी चौकातील दहीहंडीचे आयोजन रियाज शेख यांनी केले होते; पण त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी कोणतीही काळजी घेतली नाही, तसेच त्यांना कोणतीही साधनसामग्रीही पुरवली नाही. त्यामुळे दहीहंडी फोडतांना विनय रांबाडे (वय २० वर्षे), संदेश प्रकाश दळवी (वय २२ वर्षे) हे दोघेजण खाली पडून त्यांना गंभीर दुखापत झाली.

दहीहंडीत डोक्याला मार लागून २ गोविंदा गंभीर घायाळ झाल्याप्रकरणी आयोजकांवर विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. शासनाने घोषित केल्याप्रमाणे मृत गोविंदाच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देणार आहोत. आयोजकांनी नियमावलीचे पालन केले का ? याचीही चौकशी करू, असे क्रीडामंत्री गिरीश महाजन म्हणाले.