फडणवीस उपमुख्यमंत्री !
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चालू असलेल्या सत्तानाट्याला अत्यंत अनपेक्षित वळण मिळाले आहे. शिवसेनेपासून वेगळे झालेले नेते एकनाथ शिंदे यांनी ३० जून यादिवशी महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून राजभवन येथे शपथ घेतली. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सायंकाळी ७.३० वाजता हा शपथविधी पार पडला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी ! – एकनाथ शिंदे
मुख्यमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘भाजपकडे अधिक संख्याबळ असतांनाही देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. फडणवीस यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.’’ एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा !
‘शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २९ जूनला त्यागपत्र दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची आवश्यकता होती, ती आम्ही देत आहोत. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील. या सरकारला माझे समर्थन असेल’, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनला पत्रकार परिषदेत केली. या अनपेक्षित घोषणेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
LIVE | Oath ceremony at Raj Bhavan, Mumbai #Maharashtra https://t.co/9hufVo6lMq
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 30, 2022
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,
१. काही दिवसांपासून निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेच्या आमदारांची कुचंबणा होत होती. त्या वेळी एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांसमवेत न जाण्याचा निर्णय घेतला.
२. महाविकास आघाडी सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. या सरकारचे २ मंत्री कारागृहात जाणे, हे खेदजनक आहे.
३. एकीकडे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदला विरोध केला, तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्र्याला मंत्रीपदावरून काढण्यातही आले नाही.
४. शेवटच्या दिवशी जाता जाता या सरकारने औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर केले. राज्यपालांचे पत्र आल्यानंतर मंत्रीमंडळाची कोणतीही बैठक घेता येत नाही; पण तीही ठाकरे यांनी घेतली.
५. काँग्रेसने प्रतिदिन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला, तसेच हिंदुत्वाचा तिरस्कार केला.
६. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांना विरोध केला, अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी युती केली अन् भाजपला बाहेर ठेवले, हा खरेतर जनमताचा अवमान होता. जनतेचा कौल भाजप-शिवसेना युतीला होता; परंतु त्याचा अवमान करून महाविकास आघाडी अस्तित्वात आली होती.
७. प्रतिदिन आमदारांचा अवमान होत होता. ज्यांना आपण पराभूत केले, त्यांना निधी दिला जात होता. त्यामुळे ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तोडा, आम्ही त्यांच्यासमवेत रहायला सिद्ध नाही’, अशी भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी घेतली; परंतु दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी आमदारांपेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना शेवटपर्यंत धरून ठेवले. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे; परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यागपत्र दिल्यानंतर पर्यायी सरकार देणे आवश्यक होते.
राज्याचा विकास आणि महाराष्ट्राच्या सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करू ! – एकनाथ शिंदे, नूतन मुख्यमंत्री
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘हा शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. राज्याचा विकास आणि महाराष्ट्राच्या सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करू. सर्वांना समवेत आणि विश्वासात घेऊन काम करीन. आता देवेंद्र फडणवीसही समवेत आहेत. या सार्यांच्या साथीने विकासाचा गाढा हाकेन.’’
ही तत्त्व, हिंदुत्व आणि विचार यांची लढाई !
फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘सरकार पडले, तर आम्ही पर्यायी सरकार देऊ, असे वारंवार आम्ही सांगत होतो. लोकांवर निवडणुका लादणार नाही. भाजप-शिंदे गटाचे आमदार आमच्यासमवेत येत आहेत. आम्ही सत्तेच्या मागे लागलो नाही. कुठल्याही पदासाठी आम्ही काम करत नाही. ही तत्त्व, हिंदुत्व आणि विचार यांची लढाई आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपचे समर्थन आहे.’’
पंतप्रधानांच्या आग्रहानंतर फडणवीस मंत्रीमंडळात सहभागी !
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याची घोषणा करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ‘मी स्वत: मंत्रीमंडळात सहभागी होणार नाही’, असे स्पष्ट केले होते; परंतु यावर भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ‘फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे’, अशी पक्षाची इच्छा आहे, असे माध्यमांशी बोलतांना सांगितले. त्यानंतर थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करून ‘फडणवीस हे मंत्रीमंडळात असतील, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत’, असे सांगितले. सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ वेळा भ्रमणभाष करून देवेंद्र फडणवीस यांना मंत्रीमंडळात सहभागी होण्यास सांगितले. त्यामुळे मोदी यांच्या आग्रहानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला.