आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग ११)

पू. तनुजा ठाकूर

१. प्रसाद सिद्ध करतांना नामजप केल्याने पुष्कळ लाभ होणे, तसेच अन्नपूर्णादेवी आणि अग्निदेव अन् उपकरणे यांना प्रार्थना करणे

प्रसाद (स्वयंपाक) सिद्ध करत असतांना नामजप करण्याचा प्रयत्न करावा. नामजप केल्याने अन्न आणि भाज्या यांमध्ये असणारी अशुद्ध तत्त्वे नष्ट होतात अन् संबंधित पदार्थ देवतेच्या तत्त्वाने भारित होतो. जर प्रसाद (स्वयंपाक) बनवतांना तुमच्या मनात पुष्कळ विचार येऊ लागले, तर मोठ्याने नामजप करत स्वयंपाक करावा किंवा सात्त्विक वाणीत केलेला नामजप भ्रमणभाषवर लावून ठेवावा. त्यामुळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतील आणि तुमचाही नामजप होईल, तसेच वास्तूमध्ये चैतन्य येईल. अन्नपूर्णादेवीची पूजा करावी आणि तिला, तसेच अग्निदेव यांना प्रार्थना करावी. स्वयंपाकासाठीच्या उपयोगात येणार्‍या प्रत्येक वस्तू आणि उपकरणे यांनाही प्रार्थना करावी. सेवा पूर्ण झाल्यावर त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. सर्व कक्षाची स्वच्छता करून साहित्य नीटनेटके ठेवावे.

२. अन्नपूर्णादेवीची पूजा आणि स्वयंपाक करण्यापूर्वी अन्नपूर्णाकक्षाची स्वच्छता करावी !

अन्नपूर्णादेवीची पूजा आणि स्वयंपाक करण्यापूर्वी तेथील स्वच्छता अवश्य करावी. पारोशा (न झाडलेल्या) कक्षात पूजा करू नये किंवा ‘घरकाम करणारी बाई आल्यावर ती झाडून-पुसून घेईल’, असा विचार करून घराला पारोसे ठेवू नये. पारोशा (न झाडलेल्या) घरात अग्नि प्रज्वलित करू नये आणि पूजाही करू नये. हिंदूंकडून कोणत्या चुका कुठे होत आहेत, ते तुमच्या लक्षात येते ना ? आपले घर मंदिरासारखे पवित्र का रहात नाही, हेही आता तुमच्या लक्षात येते ना ?

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (१०.२.२०२२)