उत्तरप्रदेशातील धार्मिक स्थळांवरील ११ सहस्र भोंगे उतरवले !

३५ सहस्र मंदिर आणि मशिदी यांच्यावरील भोंग्यांच्या आवाजावर बंधन !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील धार्मिक स्थळांवरील ११ सहस्र भोंगे  काढण्यात आले आहेत, तर ३५ सहस्र धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्‍चित करून देण्यात आली आहे. गेल्या ४ दिवसांमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजाच्या संदर्भात तातडीने कारवाई करण्याच्या संदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्यांच्या विरोधातील मोहीम चालू करण्यात आली आहे.

१. मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विषयाच्या संदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठकीत ‘प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक मान्यतांचे पालन करण्याचा अधिकार आहे; मात्र त्याचा दुसर्‍यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे. भोंगे वापरण्याला अडचण नाही; मात्र भोंग्यांचा आवाज त्या धार्मिक स्थळांच्या परिसरापुरता मर्यादित राहील, याची काळजी घ्या. याचा इतर लोकांना काही त्रास होता कामा नये’, असे म्हटले होते. त्यानंतर गृह विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत हिंदू आणि मुसलमान धर्मीय नेत्यांनी चर्चा केली. या चर्चेच्या वेळी त्यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज अल्प करण्यावर सहमती दर्शवली.

२. लक्ष्मणपुरी येथील इदगाहचे इमाम असणार्‍या मौलाना खलिद रशिद फिरंगी महाली यांनी  ‘सर्व सुन्नी मशिदींना भोंग्यांचे आवाज अल्प करण्याचे निर्देश दिले असून आवाज मशिदीबाहेर येणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे’, अशी माहिती दिली.

संपादकीय भूमिका

  • भाजप सत्तेवर असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये असे होऊ शकते, तर संपूर्ण देशात असे का होऊ शकत नाही ?
  • ध्वनीप्रदूषणाचा त्रास देशातील प्रत्येक नागरिकाला होत असतांना शासनकर्त्यांना जे शक्य आहे, ते करण्याचे धाडस ते का करत नाहीत ? जनतेने आता प्रत्येक राज्यातील शासनकर्त्यांना याविषयी जाब विचारला पाहिजे !