राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करा !

  • अमोल मिटकरी यांनी कन्यादानाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण

  • ब्राह्मण ज्ञाती समाजाची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी खिल्ली उडवतांना आणि त्याला हसून प्रतिसाद देतांना जयंत पाटील आणि धनंजय मुंडे

रत्नागिरी – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर (सांगली) येथील ‘जनसंवाद यात्रे’मध्ये कन्यादान या विधीची, तसेच लग्नविधी, पूजाकार्य करणारे पुरोहित यांची खिल्ली उडवली. त्यांनी पुरोहितांविषयी खोटारडे वक्तव्य करून हिंदूंच्या देवतांचीही अपकीर्ती केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील ब्राह्मण ज्ञाती संघटनांनी केली आहे. कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा, अखिल चित्पावन ब्राह्मण साहाय्यक संघ, कर्‍हाडे ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण आणि देवरुखे ब्राह्मण ज्ञाती संघटनांनी याविषयीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या प्रतिनिधींकडे सुपुर्द केले. या वेळी सर्वश्री अनंत आगाशे, राजन पटवर्धन, रवींद्र इनामदार, माधव हिर्लेकर आणि सौ. तेजा मुळ्ये उपस्थित होत्या. निवेदन दिल्यानंतर याविषयी पत्रकार परिषदही घेण्यात आली.

निवेदन देतांना ब्राह्मण ज्ञाती संघटनांचे सदस्य आणि त्याचा स्वीकार करतांना रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी

हेतूपुरस्सर खिल्ली उडवून ब्राह्मण समाजाला कलंकित केले जात आहे ! – अनंत आगाशे, कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष, रत्नागिरी

श्री. अनंत आगाशे म्हणाले की, मागील अनेक पिढ्या ब्राह्मण समाज भारतातील जनतेची विविध माध्यमांतून सेवा करत आहे. इतिहासात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये, तसेच सामाजिक सलोखा कायम रहाण्यासाठी ब्राह्मणांनी योगदान दिले आहे; परंतु सत्ताधारी राजकीय पक्षांचे नेते, आमदार, हेतूपुरस्सर ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवून त्यांना कलंकित करत आहेत. ब्राह्मण समाजाचे बहुजन समाजाच्या मनात अवमूल्यन करण्याचा त्यांचा हेतू लक्षात येतो. यासाठी हिंदु धर्मातील काही मुलभूत संस्कारांचे विडंबन करून हिंदु धर्माला अवमानित केले जात आहेत. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.

हिंदुद्वेषी वक्तव्यास दाद देणार्‍या लोकप्रतिनिधींवर कारवाई करा ! – राजन पटवर्धन, चित्पावन ब्राह्मण संघ, रत्नागिरी

चित्पावन ब्राह्मण संघाचे श्री. राजन पटवर्धन म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधींच्या अशा वक्तव्यांमुळे हिंदु समाजात तेढ निर्माण होत आहे. परंपरागत हिंदु विवाह पद्धतीवर टीका करतांना आमदार मिटकरी यांनी हिंदु संस्कारांवर टीका केली. पोलिसांनी मिटकरी यांच्या वक्तव्याच्या व्हिडिओची पडताळणी करून आयोजक आणि मिटकरी यांच्या वक्तव्यास दाद देणार्‍या शासन प्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई करावी.’’