मुंबई – उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आणि राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी कार्यवाही करणे, वाचन चळवळ वाढवणे, तसेच प्राध्यापकांचे प्रशिक्षण यांवर लक्ष केंद्रित करण्याचे घोषित केले. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम १ ते १५ जानेवारी २०२५ या काळात राबवण्यात येईल. त्यात पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धांचे आयोजन होईल. विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापकांनाही प्रशिक्षण दिले जाईल. हा उच्च शिक्षणातील सुधारणेचा त्रिसूत्री कार्यक्रम त्यांनी विभागाला दिला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची कार्यवाही केली जाईल. त्याचा उद्देश भारताला जागतिक ज्ञान आणि महासत्ता बनवणे हा आहे.
या वेळी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, विद्यापिठाचे कुलगुरु संबंधित अधिकारी उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्यानंतर ‘ई.डब्ल्यू.एस्.’ प्रमाणपत्राऐवजी ‘एस्.ई.बी.सी.’ प्रमाणपत्र लागू करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले होते. राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी २ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.