चीनने प्रथम सीमेवरून सैन्य हटवावे, तरच द्विपक्षीय संबंध सामान्य होतील !

अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना सुनावले !

‘भारताने सांगितले आणि चीनने ऐकले’, असे होणार नसल्याने चीनला त्याच्याच भाषेत समजवा !

वांग यी आणि अजित डोवाल

नवी देहली – लडाखच्या उर्वरित भागातून चीनने तात्काळ सैन्य मागे घ्यावे, त्याखेरीज द्विपक्षीय संबंध सामान्य होणार नाहीत. सीमेवर शांतता प्रस्थापित करूनच परस्परांवरचा विश्वास वाढेल. सध्याची परिस्थिती दोन्ही देशांच्या हिताची नाही, असे परखड मत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भारताच्या भेटीवर आलेले चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासमोर मांडले. या दोघांमध्ये सुमारे एक घंटा चर्चा झाली. चर्चा पुढे नेण्यासाठी चीनने अजित डोवाल यांना चीन भेटीचे निमंत्रण दिले आहे. निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद देत डोवाल म्हणाले, ‘‘तातडीचे प्रश्न यशस्वीरित्या सोडवल्यानंतर चीनला भेट देऊ.’’ वर्ष २०२० च्या गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांतील सर्वोच्च स्तरावरील ही पहिलीच चर्चा आहे. दोन्ही देशांनी सीमावाद सोडवण्यासाठी अनेक वेळा चर्चा केल्या आहेत. प्रत्येक वेळी भारताने पूर्व लडाखमध्ये चीनने सैन्य पूर्णपणे मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

अजित डोवाल पुढे म्हणाले की, द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यासाठी राजनैतिक आणि सैनिकी पातळ्यांवर सकारात्मक संवाद साधणे ही पूर्वअट आहे. कोणत्याही कृतीतून दोन्ही देशांच्या सुरक्षेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

या भेटीनंतर परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनीही चीनच्या परराष्ट्रमंत्र्याशी अनेक सूत्रांवर चर्चा केली.

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतात येण्यापूर्वी काश्मीरविषयी केले होते  पाकधार्जिणे विधान !

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी भारतात येण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या बैठकीत भाग घेतला होता. तेथे ते म्हणाले, ‘‘काश्मीरवर आज आम्हाला आमच्या अनेक इस्लामी मित्रांचा आवाज पुन्हा ऐकू आला. चीनलाही हीच अपेक्षा आहे.’’

त्यानंतर भारताने काश्मीरवरील त्यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत ‘चीनसह इतर देशांना आमच्या अंतर्गत गोष्टींवर भाष्य करण्याचा अधिकार नाही’, अशा शब्दांत खडसावले होते.