महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आणि अध्यात्मप्रसार !

सोलापूर, १ मार्च (वार्ता.) – महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात विविध शहरांत आणि ग्रामीण भागांत ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शन कक्ष उभारण्यात आणि ग्रंथांचा प्रसार करण्यात धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांचा सक्रीय सहभाग होता.

सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील श्री उत्तरेश्वर मंदिरासह अनेक शिव मंदिरांची स्वच्छताही करण्यात आली, तर काही मंदिरांमध्ये ध्वनीक्षेपकावर ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप लावण्यात आला होता.

महाशिवरात्रीच्या दिवशी लहान मुलांकडून ‘ॐ नम: शिवाय ।’ हा सामूहिक नामजप करून घेतांना सनातनची साधिका
बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील श्री उत्तरेश्वर मंदिराची स्वच्छता करतांना धर्मप्रेमी
धाराशिव येथे ग्रंथप्रदर्शनाला भेट देतांना जिज्ञासू

महाशिवरात्रीचे शास्त्र समाजाला कळावे यासाठी ३८० हून अधिक ठिकाणी फलकप्रसिद्धीच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला, तर जिल्ह्यात १६७ हून अधिक ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त प्रवचने घेण्यात आली. शहरांतील मुख्य ठिकाणी, तसेच मंदिरांमध्ये शिव पूजेविषयी शास्त्रोक्त माहिती असलेली भित्तीपत्रके मोठ्या प्रमाणात लावण्यात आली होती.

फलक लिखाणाद्वारे अध्यात्मप्रसार करणारी सनातनची साधिका

१. म्हसवड (जिल्हा सातारा) येथील सिद्धनाथ मंदिर, लासुर्णे (जिल्हा सातारा) येथील नंदिकेश्वर मंदिर येथे उपस्थित भाविकांसह हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.

परळी वैजनाथ (जिल्हा बीड) येथे ग्रंथप्रदर्शनाला भेट देतांना जिज्ञासू

२. परळी (जिल्हा बीड) येथील वैजनाथ मंदिर येथील ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंनी मोठ्या प्रमाणात भेट दिली. या वेळी अनेकांनी सनातन संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले,  तसेच या प्रदर्शन कक्षावरील अध्यात्म आणि धर्माचरण याविषयीचे ग्रंथ जिज्ञासूंचे विशेष आकर्षण ठरले.

पू. चरणानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले !

चिंचगांव टेकडी, कुर्डूवाडी येथील पू. चरणानंद सरस्वती महाराज यांना ग्रंथ भेट देतांना श्री. विक्रम घोडके

चिंचगांव टेकडी, कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) येथील सत्संग आश्रमाचे प.पू. रामानंद सरस्वती महाराज यांचे उत्तराधिकारी पू. चरणानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके यांनी पू. चरणानंद सरस्वती महाराज यांना ‘हिंदु-राष्ट्र आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट दिला.