पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरातील नग्न छायाचित्रांचे प्रदर्शन विरोधानंतर बंद केले !

पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीच्या शहरात असे प्रदर्शन भरवले जाणे निषेधार्ह आहे. वाढत्या बलात्काराच्या घटना पाहता, हे लज्जास्पद आहे !

पुणे – येथील बालगंधर्व रंगमंदिरात छायाचित्रकार अक्षय माळी या तरुणाने ७ जानेवारी या दिवशी ३ दिवसांचे मानवी शरीर, नग्नता, मासिक पाळी, लैंगिकता या विषयांवर आयोजित चित्रे आणि छायाचित्रे यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. ‘प्रदर्शन बंद केले नाही, तर आम्ही ते बंद करू’, अशी धमकी येताच बालगंधर्व रंगमंदिर व्यवस्थापनाने हे प्रदर्शन बंद केले आहे. यामुळे अक्षयने अप्रसन्नता व्यक्त केली असून अशा प्रकारचे प्रदर्शन भविष्यातही आयोजित करणार असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. यापूर्वी पुण्यात असे प्रदर्शन कधी झाले नव्हते.

अक्षय माळी याने सांगितले की, आपण बालगंधर्व मंदिरात अर्ज देतांना त्यावर ‘न्यूड फोटो’ असा उल्लेख केला नव्हता; कारण आपल्याला ‘फोटोग्राफी’त भेद करायचा नव्हता. मी कोणतीही चुकीची गोष्ट केली नसून कुणालाही दुखावलेले नाही. या सर्व प्रकारानंतर समाजातील काही लोकांची मानसिकता समोर आली आहे. यापुढे शहरातील अन्य प्रदर्शनांच्या गॅलरीमध्ये अशा प्रकारचे प्रदर्शन निश्चित भरवणार आहे.

बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते यांनी सांगितले की, नग्न चित्रांचे प्रदर्शन आहे, हे आम्हाला सांगण्यात आले नाही. प्रदर्शनात वैयक्तिक छायाचित्रे होती. बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात असे प्रदर्शन कधीही भरवण्यात आले नाही. संबंधित तरुणाला पोलिसांची अनुमती घेण्यास सांगितले होते; पण ती नसल्याने प्रदर्शन बंद करायला लावले.