संभाजीनगर (महाराष्ट्र) येथील नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या भेटीचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

संभाजीनगर (महाराष्ट्र) जिल्ह्यातून आलेले नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या भेटीचे ६३ टक्के पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘संभाजीनगर, महाराष्ट्र येथील नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज हे त्यांची पत्नी सौ. वनिता शिवनगिरीकर यांच्यासह सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आले होते. या वेळी प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही आणि अत्यंत शारीरिक त्रास होत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी त्यांची भेट झाली. देवाच्या कृपेने मला या संतभेटीला उपस्थित राहून शिकण्याची संधी मिळाली. या संतभेटीच्या वेळी मला सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहे.

पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज

१. पू. शिवनगिरीकर महाराज यांनी गेली अनेक वर्षे खडतर साधना केल्यामुळे त्यांची ऋषींप्रमाणे तपस्या झाल्यामुळे त्यांच्या तोंडवळ्यावर तपस्येचे दिव्य तेज दिसणे

पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांनी गेली अनेक वर्षे खडतर साधना केल्यामुळे त्यांची ऋषींप्रमाणे तपस्याच झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडवळ्यावर तपस्येचे दिव्य तेज दिसत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये ऋषींप्रमाणे पुष्कळ तपोबळ आहे. या तपोबळाच्या साहाय्याने ते अनेक भक्तांवर स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर येणारी संकटे दूर करतात.

२. पू. शिवनगिरीकर महाराज यांच्या समवेत त्यांचे गुरु श्रीकानिफनाथ आणि त्यांना सूक्ष्मातून साहाय्य करणारे श्रीगोरक्षनाथ यांचे अस्तित्व जाणवून आध्यात्मिक उपाय होणे

जेव्हा पू. शिवनगिरीकर महाराज यांचे शुभागमन झाले, तेव्हा त्यांच्या समवेत त्यांचे गुरु श्री कानिफनाथ आणि त्यांना सूक्ष्मातून साहाय्य करणारे श्री गोरक्षनाथ यांचे अस्तित्व जाणवले. तेव्हा वातावरणात विभूतीचा सुगंध दरवळला आणि श्रीकानिफनाथ अन् श्रीगोरक्षनाथ यांनी त्यांच्या हातातील चिमटा वाजवल्याचे जाणवले. त्यामुळे वातावरणात पृथ्वीतत्त्वाच्या स्तरावरील विभूतीचा सुगंध आणि चिमट्याचा नाद यांच्या लहरी प्रक्षेपित झाल्यामुळे संतभेटीत उपस्थित असणार्‍या साधकांसाठी आध्यात्मिक लाभ होऊन त्यांचा आध्यात्मिक त्रास न्यून झाल्याचे जाणवले.

३. पू. शिवनगिरीकर महाराजांमध्ये त्यांचे गुरु श्री कानिफनाथ यांचा संचार झाल्यामुळे महाराजांच्या डोळ्यांतून प्रकट मारक शक्ती प्रक्षेपित झाल्यामुळे आश्रमातील विविध ठिकाणी साठलेल्या त्रासदायक शक्तीशी त्यांचे सूक्ष्म युद्ध होऊन आश्रमात सूक्ष्मातून जाणवणारा दाब न्यून होणे

संतभेटीच्या वेळी सनातनची साधिका कु. आरती तिवारी यांनी पू. शिवनगिरीकर महाराजांची गुणवैशिष्ट्ये सांगत असतांना ‘त्यांनी पुष्कळ उत्सुकतेने सनातनचा रामनाथी आश्रम पाहिला आणि प्रत्येक कानाकोपर्‍याचे निरीक्षण केले’, असे सांगितले. तेव्हा मला ते दृश्य दिसले. तेव्हा मला पू. महाराजांमध्ये त्यांचे गुरु श्री कानिफनाथ यांचा संचार झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून प्रगट मारक शक्ती प्रक्षेपित झाल्याचे जाणवले. त्यामुळे जेव्हा त्यांनी सनातनचा रामनाथी येथील आश्रम पाहिला, तेव्हा आश्रमातील विविध ठिकाणी साठलेल्या त्रासदायक शक्तीशी त्यांच्या डोळ्यांतून प्रक्षेपित झालेल्या मारक शक्तीच्या लहरीमुळे सूक्ष्म युद्ध झाले. त्यामुळे आश्रमात सूक्ष्मातून जाणवणारा दाब न्यून झाला.

४. पू. शिवनगिरीकर महाराजांमध्ये एकाच वेळी मारक भावामुळे प्रकट अवस्थेतील मारक शक्ती आणि तारक भावामुळे वात्सल्य या परस्परविरुद्ध गुणांची प्रचीती येणे

त्यांच्या हृदयात त्यांचे शिष्य आणि भक्त यांच्या प्रती पुष्कळ वात्सल्यभाव जाणवतो. यावरून त्यांचे त्यांच्या भक्तांसाठी गुरुमाऊलीचे रूप कार्यरत असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून जरी श्री कानिफनाथांची शक्ती प्रक्षेपित होत असली, तरी त्यांची दृष्टी कृपाळू असल्याचेही जाणवले. एकाच वेळी मारक भावामुळे प्रकट अवस्थेतील मारक शक्ती आणि तारक भावामुळे वात्सल्य या परस्परविरुद्ध गुणांची प्रचीती आली.

५. पू. शिवनगिरीकर महाराजांची दृष्टी उर्ध्व दिशेला असण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

त्यांची दृष्टी उर्ध्वदिशेला (वरच्या दिशेला) जात होती. तेव्हा ते ध्यानावस्थेत असून त्यांचे त्यांच्या गुरूंशी, म्हणजे श्री कानिफनाथांशी अखंड अनुसंधान असल्याचे जाणवले. त्यामुळे जेव्हा भक्तगणांना आवश्यकता असते, तेव्हा पू. महाराजांच्या माध्यमातून श्री कानिफनाथांची दैवी शक्ती कार्यरत होते. (श्री. निषाद देशमुख यांनाही अशीच अनुभूती आल्याचे जाणवले. – कु. मधुरा)

६. पू. शिवनगिरीकर महाराजांमध्ये त्यांचे गुरु श्री कानिफनाथ यांचा संचार होऊन त्यांच्या देहामध्ये पुष्कळ प्रमाणात दैवी शक्ती कार्यरत होणे

जेव्हा त्यांच्यामध्ये त्यांचे गुरु श्री कानिफनाथ यांचा संचार होतो, तेव्हा त्यांच्या देहामध्ये पुष्कळ प्रमाणात दैवी शक्ती कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या सहवासात येणार्‍या व्यक्तीच्या देहामध्ये कंप निर्माण होऊन तिचे आज्ञाचक्र जागृत होऊन तिला ध्यान लागते. पू. महाराजांच्या सत्संगात मला अशीच अनुभूती आली.

७. शिष्याच्या मनामध्ये श्रीगुरूंप्रतीच्या भावानुसार त्याच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असल्याची प्रचीती येणे

त्यांनी जेव्हा त्यांच्या गुरूंचे स्मरण करून श्लोक म्हटला, तेव्हा त्यांच्या गुरूंचे त्यांच्या ठिकाणी सूक्ष्मातून अस्तित्व अधिक प्रमाणात कार्यरत झाल्याचे जाणवले. यावरून ‘शिष्याच्या मनामध्ये श्रीगुरूंप्रती असणार्‍या भावानुसार त्याच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, याची मला प्रचीती आली.

८. पू. शिवनगिरीकर महाराजांच्या समष्टी भक्तीभावामुळे त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी केलेली प्रार्थना त्यांचे गुरु आणि श्रीजगदंबादेवी पूर्ण करणार असल्याचे जाणवणे

त्यांच्यामध्ये त्यांचे गुरु श्री कानिफनाथ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती इतका निस्सीम भाव आहे की, त्यांनी समष्टी भक्तीभावामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी केलेली प्रार्थना त्यांचे गुरु आणि श्रीजगदंबादेवी पूर्ण करणार असल्याचे जाणवले.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

९. सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळकाका यांच्या माध्यमातून श्रीगणेशाने शिवस्वरूप पू. महाराजांचा सन्मान केल्याचे जाणवणे

जेव्हा सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळकाका यांनी पू. महाराजांचा सन्मान केला, तेव्हा पू. गाडगीळकाका यांच्या स्थानी श्रीगणेशाचे अस्तित्व जाणवले आणि श्रीगणेशाने शिवस्वरूप पू. महाराजांचा सन्मान केल्याचे जाणवले. त्या वेळी पू. महाराजांच्या ठिकाणी शिवस्वरूप असणार्‍या श्री कानिफनाथांचे अस्तित्व जाणवून त्यांचाच सन्मान झाल्याचे जाणवले.

सौ. वनिता शिवनगिरीकर

१०. सौ. वनिता शिवनगिरीकर या पू. शिवनगिरीकर महाराज यांच्या आध्यात्मिकदृष्ट्याही अर्धांगिनी असणे

पू. शिवनगिरीकर महाराज यांच्या पत्नी सौ. वनिता शिवनगिरीकर या जगदंबेच्या भक्त असून त्या देवीची भक्तीभावाने उपासना करतात. त्यांच्यातील निस्सीम भक्तीभावामुळे त्यांच्यावर श्रीरेणुकादेवीची कृपा झाली आहे. त्यामुळे जेव्हा पू. शिवनगिरीकर महाराजांमध्ये श्री कानिफनाथांचा संचार होतो, तेव्हा त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारी मारक प्रकट शक्ती सौ. वनिता शिवनगिरीकर ग्रहण करतात आणि त्यानंतर ती आवश्यकतेनुसार समष्टीमध्ये, म्हणजे भक्तगणांकडे प्रक्षेपित होते. अशा प्रकारे सौ. वनिता शिवनगिरीकर या पू. शिवनगिरीकर महाराज यांना आध्यात्मिकदृष्ट्या पूरक असून त्या त्यांच्या साधनेत साहाय्यक आहेत. त्यामुळे त्या आध्यात्मिकदृष्ट्या पू. शिवनगिरीकर महाराजांच्या अर्धांगिनी आहेत.

११. सौ. देवी कापडिया यांच्या माध्यमातून श्री. अन्नपूर्णादेवीनेच श्रीरेणुकादेवीस्वरूप असणार्‍या सौ. वनिता शिवनगिरीकर यांचा सन्मान केल्याचे जाणवणे

सौ. देवी कापडिया यांनी जेव्हा सौ. वनिता शिवनगिरीकर यांचा सन्मान केला, तेव्हा सौ. वनिता शिवनगिरीकर यांच्या ठिकाणी रेणुकादेवीचे अस्तित्व जाणवले. तेव्हा सौ. देवी कापडिया यांच्या माध्यमातून श्री. अन्नपूर्णादेवीनेच सौ. वनिता शिवनगिरीकर यांचा सन्मान केल्याचे जाणवले. सौ. वनिता शिवनगिरीकर यांचा सन्मान करण्यापूर्वी त्यांची सूर्यनाडी चालू असल्यामुळे त्यांच्यामध्ये कार्यरत झालेल्या मारक शक्तीमुळे कुंकवाचा आणि सन्मानानंतर त्यांची चंद्रनाडी चालू झाल्यामुळे त्यांच्यामध्ये कार्यरत झालेल्या देवीच्या तारक शक्तीमुळे हळदीचा सुगंध वातावरणात दरवळला. (श्री. निषाद देशमुख यांनाही सौ. अनिता शिवनगिरीकर काकूंमध्ये देवीतत्त्व जाणवून कुंकवाच्या दैवीसुगंधाची अनुभूती आल्याचे सांगितले. – कु. मधुरा)

डावीकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर दोरा बांधतांना पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज

१२. पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सन्मान केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे

१२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कुंकवाचा गोल टिळा लावणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कुंकवाचा गोल टिळा लावला, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञाचक्र जागृत होऊन त्यांच्या आज्ञाचक्रातून निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्याचा प्रवाह वायुमंडलात प्रक्षेपित झाला.

१२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सन्मानार्थ त्यांच्या डोक्यावर लोकरीची टोपी घालणे : जेव्हा पू. शिवनगिरीकर यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सन्मानार्थ त्यांच्या डोक्यावर लोकरीची टोपी घातली, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या ठिकाणी तिरुपति बालाजीचे दर्शन होऊन त्यांच्या डोक्यावर शिवस्वरूप पू. शिवनगिरीकर यांनी मुकुट ठेवल्याचे जाणवले. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सहस्रारचक्रातून प्रक्षेपित झालेले चैतन्य त्यांच्या डोक्यावरील मुकुटाने ग्रहण केले आणि त्यानंतर या मुकुटातून समष्टीकडे आवश्यकतेनुसार हे चैतन्य दशदिशांना प्रक्षेपित झाल्याचे जाणवले.

१२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या खांद्यावर शाल पांघरणे : जेव्हा पू. शिवनगिरीकर महाराजांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या खांद्यावर शाल पांघरली, तेव्हा श्रीहालसिद्धनाथ यांच्या खांद्यावर ज्याप्रमाणे घोंगडे असते, त्याप्रमाणे परात्पर गुरुदेवांच्या खांद्यावर श्री मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या खांद्यावरील घोंगडे पांघरल्याचे दिसले. या शालीमध्ये पुष्कळ प्रमाणात तारक-मारक शक्ती प्रकट स्थितीमध्ये कार्यरत असल्यामुळे ही शाल पांघरल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सूर्यनाडी चालू होऊन त्यांच्याकडून संपूर्ण वातावरणात पुष्कळ प्रमाणात मारक शक्ती प्रक्षेपित झाल्याचे जाणवले. त्यामुळे वातावरणातील रज-तम प्रधान लहरींचे उच्चाटन होऊन सात्त्विकता वाढल्याचे जाणवले.

१२ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर मंत्र पुटपुटत लालसर पिवळ्या रंगाचा दोरा बांधणे : जेव्हा पू. शिवनगिरीकर महाराजांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर मंत्र पुटपुटत लालसर पिवळ्या रंगाचा दोरा बांधला, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याभोवती श्री कानिफनाथांच्या तपोबळातील दिव्य अग्नीचे संरक्षककवच निर्माण झाल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्रास देणार्‍या वाईट शक्तीवर श्री कानिफनाथांनी मंत्रशक्तीचे बंधन टाकल्याचे जाणवले. त्यामुळे ती वाईट शक्ती मंत्रशक्तीच्या बंधनात अडकल्याचे जाणवले. मंत्रबंधनात अडकलेली त्रासदायक शक्ती श्री कानिफनाथांच्या सामर्थ्याने काही काळानंतर विरघळून नष्ट होणार आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील मोठे गंडांतर टळणार आहे.

१२ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहावर विविध ठिकाणी शाबरी विद्येतील मंत्रोच्चार करत केलेल्या यज्ञातील विभूती लावणे : पू. शिवनगिरीकर महाराजांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहावर विविध ठिकाणी शाबरी विद्येतील मंत्रोच्चार करत केलेल्या यज्ञातील विभूती लावली. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहामध्ये शिवाची लयकारी शक्ती विभूतीच्या माध्यमातून प्रकट होऊन ती त्यांच्या संपूर्ण देहात कार्यरत झाली. त्यामुळे त्यांच्या देहातील प्रथम सूर्यनाडी, नंतर चंद्रनाडी आणि शेवटी सुषुम्नानाडी यांची शुद्धी होऊन त्यांच्या देहात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने दैवी शक्ती गोलाकारात कार्यरत झाली. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सातही कुंडलिनीचक्रे जागृत होऊन त्यांच्या कुंडलिनीचक्रांतून पुष्कळ प्रमाणात श्रीविष्णूची मारक-तारक शक्ती वायूमंडलात प्रक्षेपित होऊन वातावरणाची शुद्धी झाल्याचे जाणवले. त्याचबरोबर त्यांच्या स्थूल देहाभोवती सूक्ष्मातून दैवी शक्तीचे संरक्षककवच निर्माण होऊन त्यांचे पाताळातील वाईट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण झाल्याचे जाणवले.

१२ ऊ. श्रीविष्णूच्या अवतारी कार्याची पूर्तता करण्यासाठी शिवाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे एक मोठे संकट दूर करून श्रीविष्णूला साहाय्य केल्याचे जाणवणे : शिवस्वरूप असणार्‍या पू. शिवनगिरीकर महाराज यांच्या माध्यमातून विष्णुस्वरूप असणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वरीलप्रमाणे सन्मान केल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे एक मोठे संकट दूर झाल्याचे जाणवले. श्रीविष्णूच्या अवतारी कार्याची पूर्तता करण्यासाठी शिवाने श्रीविष्णूला साहाय्य केल्याचे जाणवले.

कु. मधुरा भोसले

१३. अन्य सूत्रे

१३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृतींनुसार त्यांच्यामध्ये कार्यरत होणार्‍या विविध आध्यात्मिक दशा : जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले पू. शिवनगिरीकर महाराज यांच्याशी संवाद साधत होते, तेव्हा ते शिवदशेत होते. पू. शिवनगिरीकर महाराज यांच्याशी बोलत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे डोळे आपोआप मिटले जाऊन ते ध्यानावस्थेत गेल्याचे जाणवले. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले शिवात्मा-शिवदशेत गेल्याचे जाणवले.

१३ आ. पू. शिवनगिरीकर महाराज यांच्या संदर्भात शक्ती, भाव, चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती एकाच वेळी अन् पहिल्यांदाच येणे : संपूर्ण संतभेटीच्या वेळी पू. शिवनगिरीकर महाराज भावावस्थेत असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून माझाही भाव जागृत होत होता. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून चांगली शक्तीही प्रक्षेपित होऊन मला आध्यात्मिक लाभ होत होते आणि त्यांच्या सहवासात चैतन्य जाणवत होते. त्याचप्रमाणे त्यांच्या कृपाळू दृष्टीकडे पाहून मला आनंद जाणवत होता. अशा प्रकारे ‘श्रीगुरूंच्या कृपेमुळे शक्ती, भाव, चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती एकाच वेळी अन् पहिल्यांदाच आली’, यासाठी मी श्रीगुरूचरणी कृतज्ञ आहे.

१४. कृतज्ञता

‘परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेमुळे पू. शिवनगिरीकर महाराज यांचे दर्शन होऊन आध्यात्मिक आणि भावस्पर्शी अनुभूती आल्या’, यासाठी मी श्रीगुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१.२०२२)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक