सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !
‘व्याकरण ही हिंदु धर्मातील १४ विद्यांपैकी दहावी विद्या आहे. ‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी देवभाषा संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे सहस्रो वर्षांचा काळ लोटल्यावर संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी अनेक भाषांची निर्मिती झाली. कालांतराने या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असण्ो अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे फार अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे. १० आणि १७ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘शब्दांची ‘सामान्यरूपे’ कशी सिद्ध होतात ?’, ‘विभक्ती, विभक्ती प्रत्यय आणि सामान्यरूपे यांच्यातील परस्परसंबंध’, ‘शब्दयोगी अव्यये’ आणि ‘पुल्लिंगी (पुरुषवाचक) शब्दांची सामान्यरूपे’, यांविषयी माहिती पाहिली. आजच्या लेखात त्यापुढील भाग देत आहोत.
(लेखांक ५)
५. स्त्रीलिंगी (स्त्रीवाचक) शब्दांची सामान्यरूपे
५ अ. अ-कारांत स्त्रीलिंगी शब्द एकवचनी असेल, तर त्याचे सामान्यरूप ए-कारांत होते आणि अनेकवचनी असेल, तर त्याचे सामान्यरूप आ-कारांत होणे : ‘अटक’ हा अ-कारांत स्त्रीलिंगी (स्त्रीवाचक) शब्द आहे. आपण ‘ती अटक’, असे म्हणतो. ‘अटक’ हा शब्द एकवचनी आहे. या शब्दाचे ‘अटकेपूर्वी’ असे सामान्यरूप होतांना ‘क’ या ‘अ’कार असलेल्या अक्षराचे ‘के’ हे ‘ए’कार असलेले रूप होते.
‘अटक’ या शब्दाचे अनेकवचन ‘अटका’ असे ‘आ’कार असलेले आहे. त्याचे सामान्यरूप ‘अटकांपूर्वी’ असे ‘आ’कारांत होते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
५ आ. काही अ-कारांत स्त्रीलिंगी शब्दांचे सामान्यरूप ई-कारांत होते, उदा. गुंतवणूक – गुंतवणुकीत, चूक – चुकीनंतर, बैठक – बैठकीपूर्वी, नेमणूक – नेमणुकीपासून, ओळख – ओळखीचा इत्यादी.
५ इ. आ-कारांत स्त्रीलिंगी शब्दांचे सामान्यरूप ए-कारांत होणे : याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
राधा – राधेसमोर, गंगा – गंगेत, शाखा – शाखेबाहेर, त्वचा – त्वचेवर, इच्छा – इच्छेपुढे, पूजा – पूजेमध्ये इत्यादी.
५ ई. ई-कारांत स्त्रीलिंगी शब्द एकवचनी असल्यास त्याचे सामान्यरूप ई-कारांतच रहाणे आणि अनेकवचनी असल्यास त्याचे सामान्यरूप ई-कारांत किंवा या-कारांत होणे : ‘स्त्री’ हे ई-कारांत स्त्रीलिंगी नाम आहे. ते ‘एक स्त्री’ असे एकवचनी असेल, तर त्याच्या ‘स्त्रीचे’ या सामान्यरूपात ‘स्त्री’ या जोडाक्षरात कोणताही पालट होत नाही. ते उच्चारानुसार दीर्घच रहाते. ‘स्त्री’ या शब्दाचे अनेकवचन ‘स्त्रिया’ असे होते. या अनेकवचनाचे सामान्यरूप ‘या-कारांत’ होते, उदा. स्त्रियांनी.
भाषेमध्ये अक्षराचा उच्चार फार महत्त्वाचा असतो. उच्चारानुसार शब्दाचे रूप पालटते. ‘स्त्री’ हा शब्द दीर्घ उच्चारला जातो, तर ‘स्त्रिया’ या शब्दातील ‘स्त्रि’ र्हस्व उच्चारला जातो. या उच्चारांनुसार हे शब्द लिहिले जातात.
ई-कारांत स्त्रीलिंगी शब्दांच्या सामान्यरूपांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
५ उ. ऊ-कारांत स्त्रीलिंगी शब्दाचे सामान्यरूप होत नाही, उदा. वेणू – वेणूमुळे, वधू – वधूसाठी, वास्तू – वास्तूला, वस्तू – वस्तूवर, काकू – काकूस इत्यादी.
५ ऊ. ऊ-कारांत स्त्रीलिंगी शब्दाचे अनेकवचन आणि त्याचे सामान्यरूप क्वचित् प्रसंगी वा-कारांत होते, उदा. सासू – सासवा – सासवांसंबंधी, जाऊ (पतीची भावजय) – जावा – जावांपैकी इत्यादी.
५ ए. ओ-कारांत स्त्रीलिंगी शब्दाचे सामान्यरूप एकवचनात होत नाही; परंतु अनेकवचनात आ-कारांत होते. याचे उदाहरण पुढे दिले आहे.
५ ऐ. पहिल्या अक्षरावर अनुस्वार आणि दुसरे अक्षर ‘म’ असलेल्या तीन अक्षरी स्त्रीलिंगी शब्दाचे सामान्यरूप : तीन अक्षरी स्त्रीलिंगी शब्दाच्या पहिल्या अक्षरावर अनुस्वार असेल आणि दुसरे अक्षर ‘म’ असेल, तर सामान्यरूप होतांना पहिल्या अक्षरावरील अनुस्वार जातो, उदा. गंमत – गमतीने, अंमल – अमलात, किंमत – किमतीला इत्यादी.
अपवाद : संमत – संमतीने
६. नपुंसकलिंगी शब्दांचे सामान्यरूप
अ. अ-कारांत नपुंसकलिंगी शब्दाचे सामान्यरूप आ-कारांत होणे : ‘लाकूड’ हा अ-कारांत नपुंसकलिंगी शब्द आहे. आपण ‘ते लाकूड’ असे म्हणतो. त्याचे ‘लाकडाला’ हे सामान्यरूप होतांना त्यातील ‘ड’ या अक्षराचा ‘डा’ होतो, म्हणजे ते रूप आ-कारयुक्त होते. अशा प्रकारे रूप होणारे काही शब्द पुढे दिले आहेत.
गणित – गणिताचा, कौतुक – कौतुकाने, कीर्तन – कीर्तनात, अंतर – अंतरावर, कूळ – कुळातील, तूप – तुपाची इत्यादी.
आ. ई-कारांत नपुंसकलिंगी शब्दाचे सामान्यरूप या-कारांत होते, उदा. पाणी – पाण्याची, दही – दह्याचे, लोणी – लोण्याचा इत्यादी.
इ. ऊ-कारांत नपुंसकलिंगी शब्दाचे सामान्यरूप आ-कारांत होते, उदा. लिंबू – लिंबाचा, वासरू – वासराने, पिल्लू – पिल्लासमोर इत्यादी.
ई. काही वेळा ऊ-कारांत नपुंसकलिंगी शब्दाचे सामान्यरूप वा-कारांत होते, उदा. कुंकू – कुंकवाचा, गळू – गळवाला, अळू – अळवावरचे इत्यादी.
उ. ए-कारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप या-कारांत होते, उदा. डोके – डोक्याभोवती, वांगे – वांग्याचे, ओझे – ओझ्याचा, भांडे – भांड्याला, मडके – मडक्यात इत्यादी.
७. ऊ-कारांत ‘विशेषनामा’चे सामान्यरूप होत नसणे
ज्या नामामुळे मनुष्य, प्राणी, वनस्पती, पदार्थ इत्यादींपैकी एखाद्या वर्गाचा नव्हे, तर एखाद्या वर्गातील विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्यास ‘विशेषनाम’ असे म्हणतात. विशेषनामांपैकी ऊ-कारांत नामांचे सामान्यरूप होत नाही, उदा. गणू – गणूने, विजू – विजूपेक्षा, मनू – मनूला, तेजू – तेजूकडून, भालू – भालूसाठी इत्यादी.
८. ए-कारांत आडनावाचे सामान्यरूप या-कारांत होणे
काही व्यक्तींची आडनावे ए-कारांत असतात, उदा. ‘वझे, माने, मुळ्ये, वाघमारे इत्यादी.’ या आडनावांची सामान्यरूपे अनुक्रमे ‘वझ्यांचे, मान्यांना, मुळ्यांनी, वाघमार्यांस’ अशी या-कारांत होतात.
९. धातूला ‘ऊ’ किंवा ‘ऊन’ हे प्रत्यय लागतांना त्याच्या रूपात होणारा पालट !
९ अ. क्रियापदातील मूळ शब्दाला ‘धातू’ म्हणतात ! : ‘तो समरसून गातो’, या वाक्यात ‘गातो’ हे क्रियापद आहे. या क्रियापदातील ‘तो’ हा प्रत्यय काढला, तर केवळ ‘गा’ हा शब्द उरतो. या प्रत्यय नसलेल्या ‘गा’ शब्दाला ‘धातू’ असे म्हणतात. मराठी भाषेत ‘हस’, ‘खा’, ‘बुड’, ‘मार’, ‘हो’ असे अनेक धातू आहेत.
९ आ. धातूला ‘ऊ’ किंवा ‘ऊन’ प्रत्यय लागतांना धातूच्या शेवटी ‘व’ हे अक्षर असेल, तर त्या ‘व’चे ‘वू’ किंवा ‘वून’ असे रूप होणे : ‘धाव’ हा धातू आहे. त्याच्या शेवटी ‘व’ हे अक्षर आहे. त्यामुळे या धातूला ‘ऊ’ हा प्रत्यय लागला, तर धातूचे रूप ‘धावू’ असे होते. याच धातूला ‘ऊन’ हा प्रत्यय लागला, तर धातूचे रूप ‘धावून’ असे होते. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
९ इ. धातूला ‘ऊ’ किंवा ‘ऊन’ प्रत्यय लागतांना त्याच्या शेवटी ‘व’ हे अक्षर नसेल, तर त्या धातूची ‘ऊ’ किंवा ‘ऊन’ असलेली अथवा मिसळलेली रूपे सिद्ध होणे : ‘जा’ हा धातू आहे. त्याच्यापुढे ‘व’ हे अक्षर लागलेले नाही. त्यामुळे त्याचे ‘ऊ’ किंवा ‘ऊन’ प्रत्यय लागून सामान्यरूप होतांना ‘जाऊ’ किंवा ‘जाऊन’ अशी रूपे सिद्ध होतात. ‘जावू’ किंवा ‘जावून’ अशी रूपे सिद्ध होत नाहीत. या नियमाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१०. इंग्रजी शब्दाचे सामान्यरूप लिहितांना मूळ शब्दात पालट करू नये !
‘पेन’ या इंग्रजी शब्दाचे सामान्यरूप ‘पेनने’ असे लिहावे. ‘पेनाने’ असे लिहू नये. इंग्रजी शब्दाच्या सामान्यरूपात मूळ इंग्रजी शब्द आहे तसाच ठेवावा. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
बस – बसने, बाइक – बाइकवरून, कूलर – कूलरचे, फोन – फोनची, फिल्टर – फिल्टरपेक्षा इत्यादी.’
– कु. सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०२१)