सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !
‘व्याकरण ही हिंदु धर्मातील १४ विद्यांपैकी दहावी विद्या आहे. ‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी देवभाषा संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे सहस्रो वर्षांचा काळ लोटल्यावर संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी अनेक भाषांची निर्मिती झाली. कालांतराने या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असण्ो अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे फार अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे. मागच्या लेखात आपण ‘शब्दांची ‘सामान्यरूपे’ कशी सिद्ध होतात ?’, विभक्ती, विभक्ती प्रत्यय आणि सामान्यरूपे यांच्यातील परस्परसंबंध’ आणि ‘शब्दयोगी अव्यये’ यांविषयी माहिती पाहिली. आजच्या लेखात त्यापुढील भाग देत आहोत. (लेखांक ५)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/517797.html
४. पुल्लिंगी (पुरुषवाचक) शब्दांची सामान्यरूपे
४ अ. अ-कारांत (शेवटच्या अक्षरात ‘अ’ हा स्वर मिसळलेला शब्द) पुल्लिंगी (पुरुषवाचक) शब्दाचे सामान्यरूप आ-कारांत होणे : ‘अंक’ हा अ-कारांत शब्द आहे. त्याच्या ‘क’ या शेवटच्या अक्षरात ‘क् + अ = क’ याप्रमाणे ‘अ’ हा स्वर मिसळलेला आहे. त्याचबरोबर हा शब्द पुल्लिंगीही (पुरुषवाचकही) आहे; कारण आपण ‘तो अंक’, असे म्हणतो. या शब्दाला ‘स’ हा विभक्तीचा प्रत्यय लागल्यावर हा शब्द ‘अंकास’ असा होतो, म्हणजे ‘अंक’चे ‘अंका’ असे सामान्यरूप होते. या रूपात ‘क’ या अक्षराचा ‘क् + आ = का’ याप्रमाणे ‘आ’कार झाला आहे. अशा प्रकारे सामान्यरूप होतांना ‘आ’कारयुक्त होणारे आणखी काही पुल्लिंगी शब्द पुढे दिले आहेत.
जप – जपाला, प्रदेश – प्रदेशाशी, आकार – आकारास, अभिषेक – अभिषेकासाठी, ढीग – ढिगाखाली इत्यादी.
४ आ. व्यक्तींची अ-कारांत पुल्लिंगी नावे आ-कारांत उच्चारल्यास उच्चारतांना सोपी आणि ऐकतांना चांगली वाटत असतील, तर आ-कारांतच लिहावीत ! : ‘दशरथाचा पुत्र’ यामध्ये ‘दशरथ’ या अ-कारांत पुल्लिंगी नावाचे ‘दशरथा’ असे सामान्यरूप झाले आहे. ते उच्चारायला सोपे आहे आणि ऐकायलाही चांगले वाटते. अशा अ-कारांत पुल्लिंगी नावांची सामान्यरूपे आ-कारांत लिहावीत. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
राम – रामाला, गोविंद – गोविंदाची, वसंत – वसंतास, अर्जुन – अर्जुनाने, भरत – भरतासाठी इत्यादी.
काही नावांची मात्र या प्रकारे सामान्यरूपे होत नाहीत. ‘नितीन’ या नावाचे सामान्यरूप ‘नितिनासमोर’ असे होत नाही. येथे ‘नितीनसमोर’ असेच म्हणावे लागते. अशी काही नावे पुढे दिली आहेत.
सचिन – सचिनला, राहुल – राहुलपेक्षा, रोहित – रोहितमुळे, शेखर – शेखरनंतर, अमित – अमितपर्यंत इत्यादी.
४ इ. आ-कारांत पुल्लिंगी शब्दाचे सामान्यरूप ‘या-कारांत’ होणे : ‘आकडा’ हा आ-कारांत शब्द आहे, म्हणजे त्याच्या शेवटच्या अक्षरामध्ये ‘ड् + आ = डा’ याप्रमाणे ‘आ’ स्वर मिसळला आहे. त्याचबरोबर हा पुल्लिंगी शब्दही आहे. या शब्दाचे सामान्यरूप ‘आकड्याला’ असे होते. यात ‘डा’ या अक्षरात ‘ड्या’ असा पालट होतो. अशा प्रकारे सामान्यरूप होतांना ‘या-कारांत’ होणारे काही पुल्लिंगी शब्द पुढे दिले आहेत.
उंबरठा – उंबरठ्यावर, ओटा – ओट्याचा, (पाठीचा) कणा – कण्याचे, डोळा – डोळ्याला, दिवा – दिव्याने इत्यादी.
४ ई. काही आ-कारांत पुल्लिंगी शब्दांची सामान्यरूपे होतांना मात्र त्या शब्दांच्या मूळ रूपांत कोणताही पालट होत नसणे : असे शब्द पुढीलप्रमाणे आहेत.
दादा – दादाशी, काका – काकास, अण्णा – अण्णाला, अप्पा – अप्पाहून, मामा – मामाचा इत्यादी.
४ उ. इ-कारांत आणि उ-कारांत तत्सम (संस्कृतमधून जशाच्या तशा आलेल्या) पुल्लिंगी शब्दांची सामान्यरूपे होतांना त्यांचे ‘इ’कार अन् ‘उ’कार दीर्घ होणे : ‘मारुति’ हा तत्सम (संस्कृतमधून जसाच्या तसा आलेला) शब्द आहे. यातील शेवटचे अक्षर ‘ति’ हे र्हस्व ‘इ’कार मिसळलेले आहे. या शब्दाचे ‘मारुतीत’ हे सामान्यरूप होतांना मूळ शब्दात र्हस्व असलेला ‘ति’ दीर्घ ई-कारांत, म्हणजे ‘ती’ असा होतो. अशीच प्रक्रिया उ-कारांत तत्सम शब्दांच्या संदर्भातही घडते. अशा प्रकारचे पालट होणारे काही शब्द पुढे दिले आहेत.
गणपति – गणपतीने, वाल्मीकि – वाल्मीकींचे, मरीचि (एका ऋषींचे नाव) – मरीचींना, गुरु – गुरूंस, श्रीविष्णु – श्रीविष्णूची, भृगु (एका ऋषींचे नाव) – भृगूंचा इत्यादी.
४ ऊ. ई-कारांत (शेवटच्या अक्षरात ‘ई’ मिसळलेल्या) पुल्लिंगी शब्दाचे सामान्यरूप ‘या-कारांत’ होते, उदा. योगी – योग्यांचे, मणी – मण्याला, राजकारणी – राजकारण्याने, प्राणी – प्राण्याचा, धोबी – धोब्याकडून इत्यादी.
४ ए. काही ई-कारांत पुल्लिंगी शब्दांचे सामान्यरूप होतांना मात्र मूळ शब्दामध्ये कोणताही पालट होत नसणे : या नियमाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
कालावधी – कालावधीने, गुरुजी – गुरुजींना, पती – पतीचे, विधी – विधीत, अतिथी – अतिथीला इत्यादी.
४ ऐ. ऊ-कारांत पुल्लिंगी शब्दाचे सामान्यरूप होतांना शब्दामध्ये कोणताही पालट होत नाही, उदा. खाऊ – खाऊत, राजू – राजूने, चेंडू – चेंडूला, बिंदू – बिंदूत, बंधू – बंधूसाठी इत्यादी.
४ ओ. काही ऊ-कारांत पुल्लिंगी नामांची सामान्यरूपे मात्र ‘वा-कारांत’ होत असणे : ‘भाऊ’ हे ऊ-कारांत पुल्लिंगी नाम आहे. ‘भावाचा’ या शब्दातील ‘भावा’ हे त्याचे सामान्यरूप आहे. यात ‘भाऊ’ शब्दातील ‘ऊ’ अक्षराच्या जागी ‘वा’कार आला आहे. या पद्धतीने सामान्यरूप होणारी उदाहरणे पुढे दिली आहेत.
विंचू – विंचवात, नातू – नातवास इत्यादी.
४ औ. पुल्लिंगी शब्दाचे शेवटचे अक्षर ‘सा’ असल्यास सामान्यरूप होतांना होणारे पालट : एकवचनी पुल्लिंगी शब्दाचे शेवटचे अक्षर ‘सा’ असल्यास सामान्यरूप होतांना त्याचे ‘शा’ होते. ‘श्या’ होत नाही. हा पुल्लिंगी शब्द अनेकवचनी झाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर ‘से’ होते आणि सामान्यरूप होतांना ‘से’चे ‘शां’ होते. ‘श्यां’ होत नाही. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
४ अं. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी ‘जा’ हे अक्षर असल्यास सामान्यरूप होतांना होणारे पालट : एकवचनी पुल्लिंगी शब्दाचे शेवटचे अक्षर ‘जा’ असल्यास सामान्यरूप होतांना ते तसेच रहाते. त्याचा ‘ज्या’ होत नाही. हा पुल्लिंगी शब्द अनेकवचनी झाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर ‘जे’ होते आणि सामान्यरूप होतांना ‘जे’चे ‘जां’ होते. ‘ज्यां’ होत नाही. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– कु. सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०२१)