शब्दांची ‘सामान्यरूपे’ आणि ती सिद्ध होतांना शब्दांत होणार्‍या पालटांविषयीचे नियम !

सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !

कु. सुप्रिया नवरंगे

‘व्याकरण ही हिंदु धर्मातील १४ विद्यांपैकी दहावी विद्या आहे. ‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी देवभाषा संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे सहस्रो वर्षांचा काळ लोटल्यावर संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी अनेक भाषांची निर्मिती झाली. कालांतराने या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असण्ो अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्‍या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे फार अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

आजच्या लेखात आपण ‘शब्दांची ‘सामान्यरूपे’ म्हणजे काय आणि ती कशी सिद्ध होतात ?’, यांविषयी जाणून घेऊ. (लेखांक ५)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/515970.html


१. वाक्यातील शब्दांना ‘विभक्ती प्रत्यय’, तसेच ‘शब्दयोगी अव्यये’ लागल्यास शब्दांची ‘सामान्यरूपे’ सिद्ध होणे

मराठी भाषेत शब्दांना विविध प्रकारचे प्रत्यय लागतात; पण ‘विभक्ती प्रत्यय’ किंवा ‘शब्दयोगी अव्यये’ लागल्यासच शब्दांची ‘सामान्यरूपे’ सिद्ध होतात. यासाठी ‘विभक्ती प्रत्यय’ आणि ‘शब्दयोगी अव्यये’ म्हणजे काय ?’ हे जाणून घेणे आवश्यक आहे.

२. विभक्ती, विभक्ती प्रत्यय आणि सामान्यरूपे यांच्यातील परस्परसंबंध

शब्द वाक्यात वापरले जातांना बर्‍याचदा त्यांच्या मूळ रूपांत पालट होतो, उदा. ‘पुण्याच्या तुळशीबागेत तांब्याची भांडी मिळतात’, या वाक्यामध्ये ‘पुणे’, ‘तुळशीबाग’ आणि ‘तांबे’ हे शब्द वाक्यामध्ये जसेच्या तसे आलेले नाहीत. त्यांत ‘पुणे’चे ‘पुण्याच्या’, ‘तुळशीबाग’चे ‘तुळशीबागेत’ आणि ‘तांबे’चे ‘तांब्याची’ असे पालट झाले आहेत. या पालटलेल्या रूपांना ‘विभक्ती’ असे म्हणतात. या रूपांतील ‘च्या’, ‘ना’ आणि ‘त’ या अक्षरांना ‘विभक्तीचे प्रत्यय’ म्हणतात आणि ‘पुण्या’, ‘तुळशीबागे’ अन् ‘तांब्या’ या रूपांना ‘सामान्यरूपे’ म्हणतात.

२ अ. विभक्तींचे प्रत्यय आणि त्यांतील सध्याच्या गद्य भाषेत अधिक प्रचलित असलेल्या प्रत्ययांनुसार ‘बालक’ या शब्दाची होणारी विविध रूपे

३. शब्दयोगी अव्यये

वाक्यात जे शब्द नेहमी अन्य शब्दांना जोडूनच येतात आणि ते जोडल्यामुळे त्या त्या शब्दाचा वाक्यातील अन्य शब्दांशी संबंध जोडला जातो, अशा शब्दांना ‘शब्दयोगी अव्यये’ म्हणतात.

याचे एक उदाहरण पुढे सविस्तर दिले आहे.

‘आनंद खुर्चीवर बसला. त्याने सहज खिडकीबाहेर पाहिले. समोरच्या घरात त्याचा मित्रही अभ्यासाला बसत होता. मित्राचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि दोघे एकमेकांकडे पाहून हसले. गेल्या काही दिवसांपासून परीक्षेमुळे त्यांना एकत्र खेळायला मिळाले नव्हते.’ या वाक्यांमध्ये ‘वर’, ‘बाहेर’, ‘ही’, ‘कडे’, ‘पासून’ आणि ‘मुळे’ हे शब्द अन्य शब्दांना जोडून आले आहेत. त्याचबरोबर या शब्दांमुळे ते ज्या शब्दांना जोडून आले आहेत, त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंधही जोडला जात आहे, उदा. ‘वरील वाक्यांमध्ये ‘वर’ हा शब्द ‘खुर्ची’ या शब्दाला जोडून आला आहे, तसेच हा शब्द ‘खुर्ची’ आणि ‘बसला’ या शब्दांचा संबंध जोडण्याचे कार्य करतो.’ अशा शब्दांना ‘शब्दयोगी अव्यये’ असे म्हणतात. मराठी भाषेत अनेक ‘शब्दयोगी अव्यये’ आहेत. त्यांपैकी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

खाली, मधून, मागे, पुढे, समोर, नंतर, साठी, पूर्वी, पर्यंत, पेक्षा, सुद्धा इत्यादी. (क्रमश: पुढच्या रविवारी)

– कु. सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०२१)