उद्या भाद्रपद कृष्ण पक्ष द्वादशी (३.१०.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या कु. गुलाबी धुरी यांचा २२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मोठी बहीण कु. पूजा धुरी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.
कु. गुलाबी धुरी यांना २२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. लहानपणापासून सनातन संस्थेच्या सत्संगात जाणे
‘माझी धाकटी बहीण कु. गुलाबी हिला शालेय जीवनापासूनच देवाविषयी ओढ होती. त्यामुळे ती सनातन संस्था घेत असलेल्या सत्संगामध्ये जायला लागल्यावर त्यात सांगितल्यानुसार तिने लगेच नामजप करायला आरंभ केला.
२. साधनेचे महत्त्व पटल्यावर महाविद्यालयीन शिक्षण न घेता पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे
तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्या समवेतच्या सर्व मैत्रिणींनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यावर ‘आपणही महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करावे’, अशी इच्छा तिच्या मनात होती. याविषयी तिने मला विचारले. तेव्हा ‘पुढे आपत्काळात आपल्याला साधनाच उपयोगी पडणार आहे. व्यावहारिक शिक्षण हे तात्कालिक स्वरूपाचे आहे’, हे मी तिला समजावून सांगितले. त्यानंतर तिने मला महाविद्यालयीन शिक्षणाविषयी पुन्हा विचारले नाही आणि पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला.
३. सेवाकेंद्रात शिकायला मिळालेल्या सूत्रांप्रमाणे बहिणीकडून प्रयत्न करवून घेणे
गुलाबी काही दिवस सनातनच्या कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी गेली होती. तिला तिथे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथून घरी आल्यानंतर तिने माझ्याकडूनही तसे प्रयत्न करवून घेतले.
४. तत्त्वनिष्ठता
अ. ती तत्त्वनिष्ठ राहून मला माझ्या लहान लहान चुकांची जाणीव करून देते.
आ. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठीच्या सारणीमधील लिखाण परिपूर्ण पाहिजे’, हे तिने स्वतःच्या सारणी लिखाणातून माझ्या लक्षात आणून दिले. ‘मोठ्या बहिणीला कसे सांगू ?’, असा कुठलाही भावनिक विचार न करता तिने मला त्याविषयीच्या माझ्या चुका सांगितल्या आणि ‘आपल्याला स्वभावदोषांवर मात करून साधनेत पुढे जायचे आहे’, याची जाणीव करून दिली.
५. रुग्णाईत साधकांची सेवा ‘संतसेवा’ या भावाने करणे
ती रामनाथी आश्रमामध्ये रुग्णाईत साधकांची सेवा करतांना ‘संतसेवाच करत आहे’, असा भाव ठेवते. त्यामुळे ‘सेवेतील ताण न्यून होऊन आनंद मिळतो’, हे तिने अनुभवले. त्यानंतर काही दिवसांनी घरी आल्यावर तिने मला सांगितले, ‘‘आपण आई-वडिलांची सेवाही ‘संतसेवा’च करत आहोत’, हा भाव ठेवून करू शकतो.’’
६. अल्प अहं
तिने रुग्णाईत साधक आणि संत यांची सेवा केली आहे; पण याविषयी तिच्या मनामध्ये अहं नाही. ‘कृतज्ञताभावात राहून सेवा कशी करायची ?’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळते.
७. त्यागी वृत्ती
‘विविध सेवांच्या माध्यमातून गुरुचरणांची अखंड सेवा करता यावी, श्री गुरूंना अपेक्षित अशी प्रत्येक कृती व्हावी आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी होता यावे’, यासाठी तिने लहान वयामध्ये शिक्षण, नोकरी आणि स्वतःच्या इच्छा-आकांक्षा यांचा त्याग केला आहे.
८. जाणवलेले पालट
८ अ. इतरांचा विचार करणे : घरामध्ये ती सर्वांत लहान असल्याने सर्वांची लाडकी आहे. त्यामुळे ‘एखाद्या वस्तूसाठी हट्ट करणे आणि संकुचितपणा’, हे स्वभावदोष तिच्यामध्ये प्रबळ होते. आता ती स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राववत असल्यामुळे ती इतरांचा विचार करू लागली आहे. रामनाथी आश्रमात असतांना ती तिच्या वेळेनुसार घरी भ्रमणभाष करून सर्वांची विचारपूस करते. घरी कुणी रुग्णाईत असल्यास ती त्यांना धीर देते आणि नामजपादी उपाय करण्यास सांगते.
८ आ. तिची भावनाशीलता न्यून झाली आहे.
८ इ. मनमोकळेपणाने बोलणे : ती तिच्या मनातील एखाद्या प्रसंगाविषयी माझ्याशी मोकळेपणाने बोलते. त्या प्रसंगात तिच्या मनाचा होणारा संघर्ष ती मनमोकळेपणाने सांगते.
८ ई. आता तिला आनंद मिळायला लागला आहे. आता ती माझी आध्यात्मिक मैत्रीण झाली आहे.
‘हे गुरुमाऊली, ‘आपल्या कृपेमुळे माझ्यातही चांगला पालट होण्यासाठी मला पदोपदी साहाय्य करणारी बहीण आध्यात्मिक मैत्रिणीच्या रूपात मिळाली’, याकरता मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. पूजा धुरी (मोठी बहीण), साळगाव, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (सप्टेंबर २०२१)