धर्मांतर करणार्‍यांना पंचायत निवडणूक लढवता येणार नाही ! – जनजाती सुरक्षा मंचाची चेतावणी

  • केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा केल्यास अशी चेतावणी  देण्याची वेळ कोणत्याच संघटनेवर येणार नाही, हेही तितकेच खरे ! – संपादक 
  • धर्मांतर रोखण्यासाठी त्याविरोधात कायदा हवा, हे जाणून हिंदूंनी तशी मागणी करायला हवी ! – संपादक 

रांची (झारखंड) – धर्मांतर केलेल्या लोकांना पंचायत निवडणूक लढवता येणार नाही, अशी चेतावणी ‘जनजाती सुरक्षा मंचा’चे सहसंयोजक सोमा उरांव यांनी दिली आहे.

जातीजमातींच्या घटनात्मक अधिकारांविषयी जागृती करण्यासाठी तपकरा येथील बिरसा सरस्वती शिशू मंदिरामध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संबोधित करतांना उरांव म्हणाले, ‘‘सर्वांनी आपली धर्म, संस्कृती, प्रथा आणि परंपरा यांचे पालन केले पाहिजे. तसेच या गोष्टी पाळणार्‍या लोकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आपले अधिकार समजून घेण्यासाठी सर्वांनी शिक्षित होणे आवश्यक आहे. पाहन, महतो, मुंडा, पानी भरवा इत्यादी जमाती त्यांच्या परंपरा सोडून देत आहेत. त्यामुळे त्यांना योग्य मार्गावर आणले पाहिजे.’’ झारखंडमधील आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. त्यामुळे मूळ आदिवासी आणि धर्मांतरित यांच्यात खटके उडत आहेत. या पार्श्वभूमीवर जनजाती सुरक्षा मंचने दिलेल्या चेतावणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.