ऑलिंपिक पदकाचे दावेदार ! 

जपानच्या ‘नॅशनल स्टेडियम’मध्ये २३ जुलै या दिवसापासून बहुचर्चित असणारी ‘टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा’ चालू झाली. साधारणतः २०० हून अधिक देश यांत सहभागी होतात. प्रत्येक ४ वर्षांनी घेतल्या जाणार्‍या या स्पर्धेमध्ये नेहेमीप्रमाणे भारताचाही समावेश आहे. ऑलिंपिक म्हणजे खेळाडूंना ‘स्वत:चे नाणे खणखणीत आहे का ?’, हे वाजवून पहाण्यासाठी मिळणारे भव्य व्यासपीठ ! ‘ऑलिंपिक’ विजेता खेळाडू म्हटले की, अर्थात्च त्या राष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जातो; कारण संपूर्ण विश्वामध्ये तो खेळाडू विजेता ठरलेला असतो. त्यामुळे त्या राष्ट्रासाठी ते निश्चितच गौरवास्पद आणि अभिमानास्पद ठरते. राष्ट्रीय सन्मान प्राप्त होण्यासाठी अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरतात. यंदा हा सन्मान भारताला खरोखर प्राप्त होणार का ? स्पर्धा चालू होऊन काही दिवसच झाले आहेत; पण भारतीय खेळाडूंची सध्याची सुमार कामगिरी निराशाजनकच ठरत आहे. भालाफेक, मुष्टीयुद्ध, तिरंदाजी, नेमबाजी, हॉकी, बॉक्सिंग, टेबल टेनिस, फेन्सिंग, रोईंग, बॅडमिंटन आणि पोहणे यांमध्ये भारतीय खेळाडूंना विशेष कामगिरी बजावता आलेली नाही. केवळ मिराबाई चानू यांनी भारताला ‘वेटलिफ्टिंग’मध्ये पहिले रौप्यपदक मिळवून दिले आहे. चीनच्या सुवर्णपदक प्राप्त खेळाडूच्या उत्तेजक द्रव्य चाचणीनंतर कदाचित् त्यांना सुवर्णपदक मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. असो. सध्याची स्थिती पहाता ‘पदकांची संख्या वाढायला हवी’, अशी नागरिकांची अपेक्षा आहे; पण ‘खेळाडू त्या अपेक्षा पूर्ण करण्यात कुठेतरी न्यून पडत आहेत कि काय ?’ असे वाटते. जलतरण स्पर्धेत भारताचा साजन प्रकाश उपांत्य फेरीत अपयशी ठरला. पुरुषांच्या ‘मिडलवेट’ स्पर्धेत आशिष कुमार पराभूत झाला. टेबल टेनिसमध्ये ऑस्ट्रियाच्या स्पर्धकाकडून महिला एकेरीच्या तिसर्‍या फेरीत मनिका बात्राचा पराभव झाला. भारताचा टेनिसपटू सुमित नागल हासुद्धा दुसर्‍या फेरीतून बाहेर पडला. त्यामुळे भारताचे टेनिसमधील आव्हान संपुष्टात आले. भारताचे अव्वल नेमबाज अपूर्वी चंडेला आणि इलेव्हनिल वलारीवन हे नेमबाजीच्या स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवू शकले नाहीत. याउलट चीनची युवा नेमबाज यांग किआन हिने ऑलिंपिकमधील पहिले सुवर्णपदक प्राप्त केले. ज्युडोच्या (कराटे) सामन्यातही भारताच्या सुशिला देवी हिचा पराभव झाला. ज्युडो स्पर्धेत ती भारताची एकमेव उमेदवार होती. ही स्थिती पहाता भारताच्या पदरी पदके नव्हे, तर निराशाच पडत आहे. ‘ऑलिंपिकच्या मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या खेळाडूंना वारंवार पराभवाचाच सामना का करावा लागतो ?’ याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. खरेतर भारतात क्रीडा, खेळ यांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध आहे. उच्च प्रशिक्षित तज्ञ मंडळी आहेत. खेळाडूही आपापल्या क्षेत्रांत निपुण, पारंगत आणि तरबेज आहेत. धनुर्विद्या, तलवारबाजी यांसारख्या अनेक युद्धकला आणि शस्त्रकला यांची निर्मितीही अतीप्राचीन भारतातूनच झालेली आहे. असे सर्व असतांना भारत क्रीडा विश्वात मागे का ? ही सर्व स्थिती १ अब्ज ३४ कोटी लोकसंख्या असणार्‍या भारतासाठी लज्जास्पदच नव्हे का ?

प्रशासन आणि सरकार यांची भूमिका !

खेळ, स्पर्धा यांच्या संदर्भातील क्षेत्रांमध्ये काही मोजकीच नावे भारतियांच्या तोंडी रहातात, उदा. पी.व्ही. सिंधू, अभिनव बिंद्रा, साक्षी मलिक, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत इत्यादी. क्रिकेटपटूंची नावे मात्र सर्वांनाच तोंडपाठ असतात. याचे कारण म्हणजे क्रिकेट या खेळाला दिले जाणारे अवास्तव आणि अवाजवी महत्त्व ! त्यामुळे नेमबाजी, तलवारबाजी, हॉकी इत्यादी खेळ क्रिकेटच्या तुलनेत अगदीच नगण्य ठरतात. क्रिकेटसाठी जसे व्यासपीठ आणि आर्थिक बळ, तसेच प्रशिक्षित तज्ञ उपलब्ध असतात, त्या तुलनेत अन्य खेळांसाठी ती उपलब्धता शक्य होत नाही. त्यामुळे यश संपादन करता येत नाही. एरव्ही क्रिकेटचा गवगवा केला जातो; पण जेव्हा क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते, त्यात केवळ १० ते १२ देशच उतरलेले असतात. ऑलिंपिकमध्ये मात्र २०० हून अधिक देश सहभागी होतात. त्यामुळे खेळासाठीची कसोटी खरेतर ऑलिंपिकमध्ये असते. या कसोटीस पात्र ठरण्यासाठी, तसेच जेथे कौशल्याचा कस लागतो, तेथे भारताने सर्वंकष दृष्टीने विचार करायला हवा. खेळांमध्ये होणारा भ्रष्टाचार, खेळाडूंना प्रशिक्षित करण्यासाठी आवश्यक असणार्‍या सोयीसुविधांचा अभाव, क्रीडा क्षेत्राला (क्रिकेट सोडून) मिळणारे आर्थिक साहाय्य, प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील नातेसंबंध अशा सर्वच गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आजच्या आरक्षणाच्या युगात खेळाडूंची निवड कशा प्रकारे होते ? हेही पहाणे महत्त्वाचे ठरते. यांसह खेळाडूंमध्ये असणारी जिद्द, चिकाटी, तसेच सुवर्णपदक मिळवण्याचे मनी बाळगलेले स्वप्न पूर्ण होण्यासाठी असणारा सततचा ध्यास यांची पुंजीही आहे का ? तेही पडताळायला हवे. सर्वाेत्तम कामगिरी करून भारतासाठी पदे जिंकून आणणार्‍या खेळाडूंना शारीरिक, मानसिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अशा सर्वच स्तरांवर बळ पुरवणे, तसेच प्रोत्साहन देणे हे सर्वस्वी प्रशासन अन् सरकार यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनीही त्या दृष्टीने भूमिका घेऊन कृतीशील व्हायला हवे. शेवटी प्रश्न आहे तो राष्ट्रीय अस्मितेचा !

भारताने बोध घ्यावा !

यंदा ऑलिंपिकसाठी भारतातून १२६ खेळाडू गेलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात खेळाडू पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीन किंवा ब्रिटन या प्रगत आणि समृद्ध देशांतून ५०० ते ६०० खेळाडू ऑलिंपिकमध्ये उतरतात. यावरूनच अन्य देशांची जागतिक स्तरावरील वर्चस्वाची चुणूक दिसून येते आणि भारताची क्रीडा क्षेत्रातील असमर्थता अधोरेखित होते. वर्ष २०१६ च्या ऑलिंपिकमध्ये फिजीसारखा लहानसा देश रगबी खेळात सुवर्णपदाचा मानकरी ठरला. भारताने यातून बोध घ्यावा. भारत स्वतंत्र झाल्यांनतर आतापर्यंत केवळ ९ सुवर्ण, ७ रौप्य आणि १२ कांस्य पदके जिंकता आली. ऑलिंपिकमधील ही सुमार कामगिरी भारतासाठी लज्जास्पद आहे !