माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय यांची ४ कोटी २१ लाख रुपयांची मालमत्ता कह्यात !

अंमलबजावणी संचालनालयाकडून कारवाई

राजकारण्यांकडे एवढी मालमत्ता येते कुठून ? याची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे !

अनिल देशमुख

मुंबई – पोलिसांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य दिल्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय यांची ४ कोटी २१ लाख रुपयांची मालमत्ता १५ जुलै या दिवशी धाड घालून कह्यात घेतली. कह्यात घेतलेल्या मालमत्तेमध्ये वरळी (मुंबई) येथील १ कोटी ५४ लाख रुपये किमतीची सदनिका आणि उरण (जिल्हा रायगड) येथील २ कोटी ६७ लाख रुपये किमतीची भूमी यांचा समावेश आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी धाड घातली होती.

वरळी येथील सदनिका अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावाने नोंदणीकृत आहे. वर्ष २००४ मध्ये या सदनिकेची पूर्ण रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली होती; मात्र या सदनिकेची विक्री अनिल देशमुख गृहमंत्री असतांना फेब्रुवारी २०२० मध्ये करण्यात आली होती. यासह अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय यांनी ‘प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाची ५० टक्के मालकी केवळ १७ लाख ९५ सहस्र रुपयांना खरेदी केली आहे. बाजारभावानुसार त्याची किंमत ५ कोटी ३४ लाख रुपये इतकी असल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाकडून देण्यात आली.

अंमलबजावणी संचालनालयाने देशमुख यांना अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्यासाठी ३ वेळा नोटीस पाठवली आहे; मात्र ते अद्याप अन्वेषणासाठी उपस्थित राहिलेले नाहीत. यासह देशमुख यांची पत्नी आणि मुलगा यांनाही नोटीस पाठवण्यात आली असून ते दोघेही अद्याप अन्वेषणासाठी उपस्थित राहिलेले नाहीत. अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका केली आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांच्या २ खासगी सचिवांना अटक केली असून अद्याप त्यांना जामीन मिळालेला नाही.

‘ईडी’ लवकरच अनिल देशमुख यांना अटक करील ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

(डावीकडे) अनिल देशमुख, (उजवीकडे) किरीट सोमय्या

अनिल देशमुख यांच्यावरील ‘ईडी’ची कारवाई, हा तर प्रारंभ आहे. माझ्या माहितीप्रमाणे १०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती ‘ईडी’कडे आली आहे. आज ४ कोटी रुपये जप्त झाले आहेत; पण येत्या काही दिवसांमध्ये ही रक्कम १०० कोटी रुपयांपर्यंत जाईल. त्यामुळे ‘ईडी’ लवकरच अनिल देशमुख यांना अटक करील, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ‘ईडी’च्या वरील कारवाईविषयी व्यक्त केली.

‘ईडी’ कुणाच्या सांगण्यावरून अनिल देशमुख यांच्यावर ही कारवाई करत आहे ? – शशिकांत शिंदे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कुणाच्या सांगण्यावरून देशमुख यांना पाठीशी घालत आहेत’, असा प्रश्न जनतेला पडल्यास आश्चर्य ते काय ?

‘ईडी’ कुणाच्या सांगण्यावरून अनिल देशमुख यांच्यावर ही कारवाई करत आहे ? ते सर्वांना समजले पाहिजे. परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या आरोपांच्या संदर्भात जर चौकशी चालू होती, तर इतक्या जुन्या व्यवहारांची चौकशी का केली जात आहे ? असे जर असेल, तर किरीट सोमय्या यांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करायला हवी. ‘ईडी’ अन्य लोकांवरही धाड घालते; पण त्यांची वृत्ते येत नाहीत, असे का ?