अखिल मानवजातीसाठी उपयोगी असणार्‍या ज्योतिषशास्त्राचा प्रसार होण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाने उचलले स्तुत्य पाऊल !

  • ‘विरोधासाठी विरोध करणार्‍या अंनिस’च्या विरोधात महाराष्ट्रातील ज्योतिषाचार्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया !

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात चालू झालेल्या ज्योतिषशास्त्राच्या पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाच्या निमित्ताने…

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात वर्ष २०२१ पासून ज्योतिषशास्त्राचा पदव्युत्तर आणि पदविका अभ्यास चालू करण्यात येणार आहे. विद्यापिठाच्या ५७ प्रादेशिक केंद्रांवर हिंदी आणि संस्कृत भाषांतून हा अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे. खरे तर याचे स्वागत होणे आवश्यक असतांना या संदर्भातील कोणताही अभ्यास नसतांना जाणीवपूर्वक अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या अभ्यासक्रमाला विरोध दर्शवत अभ्यासक्रम रहित करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात महाराष्ट्रातील काही ज्योतिषांची मते आम्ही जाणून घेतली. ती आमच्या वाचकांसाठी देत आहोत !

संकलन – श्री. अजय केळकर, कोल्हापूर

१. ज्योतिषशास्त्राविषयी चुकीचे विचार पसरवणार्‍या अंनिसच्या विरोधात सर्वांनी संघटित होऊन विरोध करायलाच हवा ! – शिवाजी सापार, ज्योतिषाचार्य, पुणे

ज्योतिषशास्त्र हे अनादी काळापासून चालत आलेले शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र हा श्रद्धेचा भाग आहे. विदेशातील लोकांना सुद्धा वैदिक ज्योतिषशास्त्राचे महत्त्व पटत असून त्यांचा ज्योतिषशास्त्रावरील विश्वास वाढत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही देव आणि धर्म मानत नाही. त्यांना ज्योतिषशास्त्र विषयाचे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी या शास्त्राविषयी बोलणे म्हणजे हास्यास्पद आहे. विद्यापिठाने अंनिसच्या दबावाला बळी पडू नये. ज्योतिषशास्त्राविषयी चुकीचे विचार पसरवणार्‍या अंनिसच्या विरोधात सर्वांनी संघटित होऊन विरोध करायलाच हवा.

२. वर्ष १९८५ मध्ये प्रा. शाम मानव यांचा ज्योतिष अधिवेशनाला असलेला विरोध ज्योतिषशास्त्र प्रेमींनी मोडून काढला होता ! – चंद्रकांत शेवाळे, ज्योतिषाचार्य, पुणे

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ज्योतिषशास्त्राला असणारा विरोध हा केवळ विरोध करायचा म्हणून केलेला विरोध आहे; कारण मागील काही वर्षांपासून अंनिसवाले हा विरोध करत आहेत. त्यांच्या या विरोधामुळे काहीही परिणाम होणार नाही. वर्ष १९८५ मध्ये ज्योतिष अधिवेशन झाले होते, तेव्हा त्याला प्रा. शाम मानव यांनी विरोध केला होता. त्या वेळी ज्योतिषशास्त्र प्रेमींनी मानव यांचा हा विरोध मोडून काढला होता. इंदिरा गांधी विद्यापिठात ज्योतिषशास्त्र शिकवले गेले पाहिजे; कारण वाराणसी विद्यापीठ, मेवाड विद्यापीठ यांसह देश-विदेशातील अनेक विद्यापिठात हे शास्त्र शिकवले जाते. ज्योतिषशास्त्र विषयावर विदेशात मासिक, साप्ताहिक आणि विशेषांक निघतात अन् त्यांचे वितरण लाखोंमध्ये आहे.

३. ज्योतिष विषय विद्यापिठात शिकवला जाणे, ही सामाजिक पालटासाठी मोठी क्रांती ! – डॉ. (सौ.) स्वाती कुलकर्णी, पी.एच्डी., सुखकर्ता ज्योतिषालय, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष प्राज्ञ, वास्तू सल्लागार, मिरज.

इंदिरा गांधी मुक्त विद्यापिठाने घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. या अभ्यासक्रमामुळे अर्धवट ज्ञान असणार्‍या लोकांकडून होणारी समाजहानी थांबेल आणि त्याला एक मान्यता प्राप्त होईल. तसेच समाजातील लोकांची फसवणूक थांबेल आणि सामाजिक जागरूकता यायला साहाय्य होईल. बर्‍यापैकी वारसा हक्काने चालत आलेले ज्ञान हे पुस्तकी स्वरूपात समाजाला मिळेल. आपल्या पूर्वजांनी अभ्यासलेले ज्योतिष पराशरी, लघु पराशरी, यांसारखे मौल्यवान ग्रंथ भांडार कालानुरूप नष्ट न होता सर्व वर्गासाठी खुले होईल. खरेतर सामाजिक पालटासाठी हीच मोठी क्रांती म्हणता येईल. उलट अशा अभ्यासक्रमामुळे सामाजिक जागरूकता यायला साहाय्य होईल.

४. इंदिरा गांधी मुक्त विद्यापिठाचा निर्णय अगदी योग्य ! – रवींद्र शिरसीकर, ज्योतिषशास्त्री, सोलापूर

ज्योतिषशास्त्र हे अनादी काळापासून चालत आलेले शास्त्र आहे. अगदी रामायण आणि महाभारत यांमध्येही त्याचा उल्लेख आहे. ‘भविष्य पुराण’ हा एक स्वतंत्र ग्रंथच आहे. ज्योतिषशास्त्राला विरोध करण्यापूर्वी विरोधकांनी त्याचा अभ्यास करावा आणि त्यात काय खरे अन् काय खोटे ते ठरवावे. हे शास्त्र गणिती आणि खगोलशास्त्रावर आधारित आहे. ज्यांनी त्याचा अभ्यासच केलेला नाही, असे लोक विरोध करत आहेत. इंदिरा गांधी मुक्त विद्यापिठाचा निर्णय अगदी योग्य आहे.

५. या अभ्यासक्रमामुळे समाजाला उत्तम मार्गदर्शक मिळतील ! – सिद्धेश्वर मारटकर, संचालक, ज्योतिष विद्या प्रसारक मंडळ आणि माजी अध्यक्ष, महाराष्ट्र ज्योतिष परिषद, पुणे

काहीजण अर्धवट ज्ञानातून सल्ला देतात. चुकीचे मार्गदर्शन करणे, हे जनतेच्या हानीचे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाने पदव्युत्तर अभ्यासक्रम राबल्याने निश्चितपणे समाजाचे भले होणार आहे. समाजाला उत्तम मार्गदर्शक मिळतील. या अभ्यासक्रमासाठी होणार्‍या विरोधाला काहीच अर्थ नसतो. ज्योतिषशास्त्राला विरोध हा अनेक शतकांपासून आहे. त्यामुळे ज्योतिषाकडे जाणार्‍यांची किंवा शिकणार्‍यांची संख्या अल्प होत नाही. हा विषय विद्यापिठामध्ये घेतल्याने चांगले संशोधन होऊन ज्योतिषशास्त्राचा उत्कर्षच होईल.

६. अभ्यासक्रमात काय असावे किंवा असू नये ? याविषयी अधिकार नसलेली माणसे सांगणार का ? – डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ अभ्यासक आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते

विज्ञानाचा भाग प्रथम प्रयोग करून नंतर निष्कर्ष काढण्याचा असतो. येथे प्रयोगही न करता सर्रास कोणत्याही गोष्टीला खोटे ठरवले जाते, हे कशाचे लक्षण आहे ? उद्या एखादी गोष्ट मला आवडत नाही म्हणून अभ्यासक्रमातून काढणे आणि अंनिसने सांगणे हे दोन्ही एकाच प्रकारचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्यांना अभ्यासक्रम शिकायचा नसेल, त्यांनी जाऊ नये. अभ्यासक्रमात काय असावे किंवा नसावे ? याविषयी ज्यांचा अधिकार नाही, ती माणसे सांगणार का ?

७. ज्योतिष ही डोळस श्रद्धा असून त्यासाठी आपल्याकडे विविध ग्रंथ साक्षीदार आहेत ! – अभिजीत शरद अत्रे, ज्योतिष पंडित, रायगड

ज्योतिष हे सखोल शास्त्र आहे. तसा त्याचा अनुभव घ्यावा लागेल; कारण शास्त्र जे आहे त्यावरती विश्‍वास हवा. आता हेच पहा ‘पंचाग’ म्हणजे काय ? हाच प्रश्‍न आहे, इथूनच प्रारंभ होतो. तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या पाच भागाने पंचांग सिद्ध होते. या प्रत्येक अंगाचा परिणाम होत आहे. जसे पौर्णिमा आणि अमावास्या या तिथीशी संबंधित आहेत, तसेच वारसुद्धा ग्रहांपासून निर्माण झाले आहेत. असे कित्येक दाखले देता येतील. हे शास्त्र मान्य करावेच लागेल. त्यासाठी आपल्याला विविध ग्रंथ साक्षीदार आहेत. ही डोळस श्रद्धा आहे; कारण त्याला आधार आहे.

ज्योतिषशास्त्रातील शिक्षण घेऊन सुसूत्रता आल्याने लोकांना मार्गदर्शन करणे समाजोपयोगी ठरेल ! – मोहन दाते, पंचांगकर्ते, सोलापूर

ज्योतिषशास्त्रात झालेले गणितीय सूत्रातील पालट स्वीकारून, तसेच फल ज्योतिषातही काळानुसार झालेल्या नवीन संकल्पनांचा विचार करून त्यासाठीचे नियम पालटून याचा अभ्यासक्रम सिद्ध करावा आणि त्यानुसार त्याचे शिक्षण देणे योग्य होईल. असे शिक्षण घेऊन सुसूत्रता आल्याने लोकांना मार्गदर्शन करणे समाजोपयोगी ठरेल !

ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमात अंतर्भूत करून  केंद्र सरकारने योग्य पाऊल उचलले आहे ! – सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

सौ. प्राजक्ता जोशी

वैज्ञानिक दृष्टीकोन, अंधश्रद्धा वा अन्य कोणत्याही मुखवट्याखाली ज्योतिषशास्त्र शिक्षणाला होणारा विरोध हा समाज, संस्कृती आणि महान राष्ट्र यांचे अहित करणारा आहे. महर्षि भृगु यांसह श्रेष्ठतम आचार्यांनी ज्योतिषशास्त्राचा ज्ञानदीप आपल्यापर्यंत आणून दिलेला आहे. हे ऋषिऋणच आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले पाऊल योग्यच आहे. ज्योतिषशास्त्राचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन अधिकाधिक होईल, तसे या शास्त्राच्या संदर्भातील गैरसमज दूर होऊन या शास्त्राचा विविध क्षेत्रांत अधिकाधिक लाभ करून घेता येईल. त्या दृष्टीने पूरक वातावरण निर्माण करणे, हा ऋषिऋण फेडण्याचा एक प्रयत्न आहे, असे मला वाटते.