‘माझ्याकडे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या बंड्या शिवण्याची सेवा होती. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने सात्त्विक कपड्यांची शिवण कशी असावी, याचा अभ्यास करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या बंड्यांच्या शिवणाचे संशोधन करण्यात आले. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे, झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
शिवणकामाची सेवा करून साधनेत वेगाने प्रगती करणार्या सौ. पार्वती जनार्दन !सौ. पार्वती जनार्दन हिने एका बंडीमध्ये १३ वेळा आणि दुसर्या बंडीमध्ये ८ वेळा रात्रं-दिवस जागून न कंटाळता दुरुस्त्या केल्या. प्रत्येक दुरुस्तीच्या वेळी ‘आपल्याला नवीन शिकायला मिळत आहे’, या दृष्टीकोनामुळे तिला आनंद होत होता. ती अखंड हसतमुख आणि उत्साही होती. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, असा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार साधना म्हणून शिवणकामाची सेवा करणारी सौ. पार्वती जनार्दन हिने ६१ टक्के पातळी गाठली आहे. अशीच शिलाईच्या माध्यमातून साधना करत ती पुढे संतपदालाही पोचू शकेल ! विविध मार्गांनी साधना करून सनातनचे साधक कशी प्रगती करत आहेत, हे सौ. पार्वतीच्या उदाहरणावरून लक्षात येईल. यावरून हिंदु धर्माचे महत्त्वही लक्षात येते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी बंड्या शिवायची सेवा करतांना भ्रमणभाष बिघडल्यामुळे समन्वय करण्यात अडचणी येणे
मी शिवत असलेल्या गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) बंड्यांची निरीक्षणे नोंद करण्याची सेवा संशोधनाच्या दृष्टीने चालू झाली आणि त्याच दिवशी माझा भ्रमणभाष बिघडला. त्यामुळे मला ही सेवा करण्यासाठी सेवेचा समन्वय करण्यात अडचणी आल्या. मला ‘हा आध्यात्मिक स्वरूपाचा त्रास असावा’, असे वाटले.
२. ‘जे काही घडते, ते आपल्या भल्यासाठीच घडत असते’, असा सकारात्मक विचार येणे
भ्रमणभाषमध्ये काही प्रमाणात नकारात्मकता असते. त्यामुळे मन आणि बुद्धी यांवर आवरण येते. ‘जे काही घडते, ते आपल्या भल्यासाठीच घडत असते’, असा सकारात्मक विचार करून ‘भ्रमणभाष बिघडला, ते एका दृष्टीने चांगलेच झाले’, असे मला वाटले. माझा भ्रमणभाष चालू असता, तर माझ्याकडून माहितीजाल (इंटरनेट) आणि ‘व्हॉटस्अॅप’ यांचा अनावश्यक वापर होऊ शकला असता. त्यामुळे माझ्यावर त्रासदायक आवरण आले असते. भ्रमणभाष बंद असल्यामुळे देवाला अपेक्षित अशी महत्त्वाची निरीक्षणे नोंदवण्याची सेवा अचूकपणे झाली.
३. देवाच्या सतत अनुसंधानात राहून सेवा अचूक आणि परिपूर्ण करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व !
३ अ. ‘ओव्हरलॉक’ करण्यासाठीचे शिलाईयंत्र रामनाथी आश्रमात नसल्यामुळे बंड्या ‘ओव्हरलॉक’ करण्यासाठी अन्य ठिकाणी पाठवायचेे ठरवणे : ‘ओव्हरलॉक’ करण्यासाठीचे शिलाईयंत्र रामनाथी आश्रमात नाही; म्हणून बंड्या शिवून पूर्ण झाल्यानंतर ती ‘ओव्हरलॉक’ करण्यासाठी अन्य ठिकाणी पाठवण्याचे नियोजन करायचे होते. त्यासाठी मी संशोधन सेवा करणार्या एका साधकाला ‘‘तुम्ही घरी जातांना त्या मार्गाने जाणार का ?’’, असे विचारले. तेव्हा त्याने आधी ‘‘नाही’’, असे मला सांगितले.
३ आ. संशोधन सेवेतील साधकाने ‘स्थळ, व्यक्ती किंवा यंत्र’, यांत पालट झाल्यास, त्याचा परिणाम निरीक्षणांवर होतो’, असे सांगणे, तेव्हा ‘बंडी ‘ओव्हरलॉक’ करण्यासाठी पाठवून न देता स्वतःच तिकडे जाऊन ती सेवा करायला हवी’, असे लक्षात येणे : थोड्या वेळाने तो साधक घरी जायला निघतांना त्याने ‘‘बंडी ‘ओव्हरलॉकींग’साठी देता का ? तिकडे ‘ओव्हरलॉक’ची शिलाई कोण करणार ?’’, असे मला विचारले. ‘‘तेथे असलेले एक साधक करतील’’, असे मी त्यांना सांगितले. हे सगळे नियोजन झाल्यावर शेवटच्या क्षणाला संशोधन विभागातील साधक मला म्हणाले, ‘‘स्थळ, व्यक्ती किंवा यंत्र (‘ओव्हरलॉकींग’चे यंत्र) पालटले, तर त्याचा निरीक्षणांच्या नोंदींवर परिणाम होऊन अपेक्षित संशोधन होत नाही.’’ तोपर्यंत ‘हे महत्त्वाचे सूत्र मला सांगावे’, हे त्यांनाही सुचले नव्हते. त्यानंतर मी नियोजन करून स्वतः ‘ओव्हरलॉकींग’चे यंत्र असलेल्या ठिकाणी जाऊन ती सेवा पूर्ण केली.
३ इ. देवाने संशोधन सेवेतील साधकाच्या माध्यमातून वरील महत्त्वाचे सूत्र सांगून मोठी चूक होण्यापासून मला वाचवणे : देवानेच त्या साधकाच्या माध्यमातून हे सूत्र सांगून गंभीर चूक होण्यापासून मला वाचवले. देवाच्या कृपेनेच ‘ओव्हरलॉकींग’चे यंत्र असलेल्या ठिकाणी जाण्याच्या नियोजनाचा समन्वय अगदी अल्प वेळेत झाला. देवाने त्या साधकाच्या माध्यमातून हे सूत्र मला सांगितले नसते, तर गुरुदेवांनी प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही बंड्यांचे संशोधन करण्यासाठी दिलेला वेळ आणि संशोधन सेवेतील साधकांचा अन् माझाही वेळ वाया गेला असता. तसेच पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे संशोधन करतांना शेवटच्या क्षणाला झालेल्या चुकीमुळे किती मोठी हानी झाली असती.
३ ई. चुका झाल्यानंतर त्यातून शिकण्यापेक्षाही देवाच्या सतत अनुसंधानात राहून ‘चुका होऊ नयेत’, यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे असणे : माझ्याकडून ती चूक झाली असती, तर माझ्या साधनेची हानी झाली असती. यातून ‘चुका झाल्यानंतर त्यातून शिकून सुधारणा करून साधना करण्याइतकेच ‘चूक न होण्यासाठी देवाचा ध्यास धरून सतर्क रहाणे’ महत्त्वाचे आहे’, हे मला शिकायला मिळाले. अशा प्रसंगांमध्ये चूक झाल्यानंतर ती सुधारणे कठीण असते. त्यामुळे ‘अशा काही सेवांमध्ये आपल्याला चूक न होण्यासाठीच प्रयत्न करायला पाहिजेत’, हे शिकायला मिळाले.
४. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’च्या नोंदी करतांना जाणवलेली सूत्रे
४ अ. एक बंडी शिवून पूर्ण झाल्यावर मध्ये थोडा वेळ अंतर ठेवून नंतर दुसरी बंडी शिवण्यापूर्वीचे निरीक्षण घ्यायचे असणे, ‘ते निरीक्षण योग्य यावे’, यासाठी साधनेतील कृती करायच्या नसणे : बंडीमधील सुरकुत्या (चुण्या) न्यून करण्यासाठी सुधारणा करायची होती. तेव्हा संशोधनाच्या दृष्टीने बंडी शिवण्यापूर्वी मी आणि बंडी यांचे ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करायची होती. त्यासाठी एक बंडी शिवून झाल्यानंतर त्याच्या निरीक्षणांची नोंद करून झाल्यावर दुसरी बंडी शिवण्यापूर्वी मध्ये थोडा वेळ अंतर ठेवायचे होते. गुरुदेवांच्या बंडीतील चैतन्यामुळे माझ्यातील सकारात्मक ऊर्जा वाढत होती; म्हणून दुसरी बंडी शिवण्यापूर्वी माझे सामान्यतः (baseline) असलेले सकारात्मक ऊर्जेचे निरीक्षण नोंदवता येण्यासाठी मी काही सात्त्विक कृती, उदा. नामजप, सत्र, गुरुस्मरण इत्यादी कृती करायच्या नव्हत्या.
४ आ. सात्त्विक कृती करायच्या नसल्याने गावातील साधकाशी बोलतांना साधना सोडून इतर विषयावर बोलायचेे ठरवणे; मात्र नकळत साधनेविषयीच बोलणे होणे, तेव्हा गुरुदेवांनी केलेल्या साधनेच्या संस्कारांमुळे ‘साधनेविषयी न बोलता राहूच शकत नाही’, असे लक्षात येणे : संशोधन सेवेतील साधकाने मला ‘घरच्या नातेवाइकांशी बोलू शकतेस’, असे सांगितले. तेव्हा मी आमच्या गावातील एका साधकांना भ्रमणभाष केला आणि त्यांना म्हणाले, ‘‘आत्ता मला साधना सोडून इतर विषयांवर सहजच बोलायचे आहे.’’ मी त्यांची विचारपूस करत होते. त्यांच्याशी बोलतांना मध्येच मी साधनेविषयी बोलायला लागले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘साधनेविषयी बोलायचे नाही ना ? तुम्ही साधनेविषयी बोलत आहात.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘गुरुदेवांनी आपल्या मनावर साधनेचे एवढे संस्कार केले आहेत की, आपण साधनेविषयी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही.
४ इ. प्रथमच ‘यू.ए.एस्.’द्वारे निरीक्षण नोंद करतांना पुष्कळ उत्सुकता वाटणे, ‘मन अस्थिर झाल्याचा परिणाम नोंदीवर होऊ नये’, यासाठी प्रयत्नपूर्वक नामजप करणे, तरीही थोडी नकारात्मक नोंद येणे : ‘मी परात्पर गुरुदेवांसाठी बंड्या शिवण्याची सेवा करतांना त्या बंडीचे आणि माझेही निरीक्षण नोंद करायचे आहे’, असे मला कळले. मला ‘यू.ए.एस्.’च्या निरीक्षणांच्या नोंदींविषयी पुष्कळ उत्सुकता आणि जिज्ञासा होती. माझी पहिल्यांदाच ‘यू.ए.एस.’द्वारे नोंद केली जाणार होती; पण त्याच्या आदल्या दिवशी माझा भ्रमणभाष बिघडल्यामुळे माझ्या सेवेत अडचणी येऊन माझे मन अस्थिर झाले होते. ‘त्याचा या नोंदींवर परिणाम होऊ नये’; म्हणून मी प्रयत्नपूर्वक नामजप करत ‘यू.ए.एस.’द्वारे नोंद घेण्यासाठी गेले. तरीही पहिल्या निरीक्षणामध्ये माझी थोडी नकारात्मक नोंद आली.
४ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ती नोंद पाहून ‘आमचा विश्वास खोटा ठरला’, असे म्हटल्यावर ‘स्वतःचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प पडल्याने नोंद नकारात्मक आली’, या विचाराने रडू येणे : ती नोंद पाहिल्यावर परात्पर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘आम्हांला वाटले, ‘तू पूर्ण सकारात्मक आहेस.’ यंत्राने खरे दाखवले ना ?, म्हणजे आमचा विश्वास खोटा ठरला का ?’’ हे ऐकून मला फार दुःख झाले. ‘श्रीगुरूंनी माझ्यावर विश्वास ठेवला; पण मी व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्ये न्यून पडल्याने माझी नोंद नकारात्मक आली’, या विचाराने मला पुष्कळ रडू आले.
५. वाईट शक्तींना सूक्ष्मातून या संशोधनाचे महत्त्व ठाऊक असल्यामुळे त्यांनी सेवेत अडथळे आणणे
५ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘‘तू करत असलेली श्रीगुरूंची सेवा आणि तुझ्यातील भावनाशीलता यांमुळे वाईट शक्ती त्या माध्यमातून त्रास वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यासाठी स्वयंसूचना सत्रे कर आणि एवढी भाग्याची सेवा मिळाल्याविषयी देवाच्या चरणी अखंड कृतज्ञताभावात रहाण्यासाठी प्रयत्न कर’, असे सांगणे : त्यानंतर अर्ध्या घंट्याने एका सेवेसाठी मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे गेले होते. तेव्हा मी त्यांना वरील प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, ‘‘तू महत्त्वाची समष्टी आणि श्रीगुरूंची सेवा करत आहेस. त्यामुळे तुझ्यावर वाईट शक्तींची आक्रमणे होत आहेत. तुला बुद्धीने किंवा शरिराने काही अडचण नाही. तुझे मन थोडे संवेदनशील असल्याने अनिष्ट शक्ती त्या स्तरावरचा तुझा त्रास वाढवत आहेत. त्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि स्वयंसूचना सत्रे वाढव. तुझे किती भाग्य आहे ? देवाची एवढी सेवा कुणाला मिळत नाही. ती तुला मिळाली आहे. यासाठी देवाच्या चरणी अखंड कृतज्ञताभावात रहाण्यासाठी प्रयत्न कर.’’
५ आ. ‘या संशोधनामुळे पुढील पिढ्यांना सात्त्विक कपड्यांची माहिती मिळून ते सात्त्विक कपडे वापरतील, त्यामुळे त्यांच्यातील सत्त्वगुण वाढेल’, हे अनिष्ट शक्तींना नको असल्यामुळे ते संशोधनात अडथळे आणत असणे : तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘कपडे परिधान करणे’, ही मनुष्याची प्राथमिक आवश्यकता आहे. सात्त्विक कपडे शिवण्याच्या या प्रयोगातून समाजाला त्याचे महत्त्व कळेल आणि पुढे सर्व जण सात्त्विक कपडे शिवतील. सात्त्विक कपडे परिधान केल्यामुळे सर्वांमध्ये सत्त्वगुण अन् सत्विचार वाढेल आणि सर्व जण साधनेकडे वळतील. ‘असे होऊ नये’, यासाठी वाईट शक्ती त्रास देतात. ‘आपल्याला देवाचे नियोजन किंवा संशोधनाचे महत्त्व कळत नाही; पण ते वाईट शक्तींना कळते.’ त्यानंतर मी त्या प्रसंगातून बाहेर पडून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करायला आरंभ केला.
६. सूक्ष्मातून कळणारे संत आणि श्रीगुरु यांनी सांगितलेलेच परिपूर्ण असण्याविषयी मनाची झालेली विचारप्रक्रिया !
६ अ. ‘यू.ए.एस्.’ किंवा अन्य उपकरणे यांनी दर्शवलेल्या नोंदी परिपूर्ण नसणे, स्थळ-काळ अशा अनेक गोष्टींवर ते अवलंबून असणे : नंतर ‘यू.ए.एस्.’ यंत्रामध्ये दाखवल्या जाणार्या सकारात्मक किंवा नकारात्मक नोंदी या परिपूर्ण नाहीत; कारण त्या नोंदी घेतांना स्थिती, काळ, वातावरण, ज्याची नोंद मोजायची आहे, त्याची मनःस्थिती किंवा त्याने नोंदीच्या आधी केलेल्या कृती, उदा. नाम, सेवा किंवा इतर कृती या सर्व गोष्टींवर नोंदी अवलंबून असल्याने त्या नोंदी परिपूर्ण नाहीत. त्यापेक्षा ‘सूक्ष्मातील कळणारे संत, श्रीगुरु आणि देव हेच परिपूर्ण आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
६ आ. या नोंदींपेक्षा संतांनी सांगितलेले अधिक परिपूर्ण असणे; मात्र ‘सध्याच्या आधुनिक समाजाला सात्त्विकतेचे महत्त्व समजावे’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे सर्व करत असणे : सध्याच्या काळानुसार समाजाला वैज्ञानिक परिभाषेमध्ये अध्यात्म समजावून सांगण्यासाठी गुरुदेव हे सर्व करत आहेत. आपली प्रत्येक क्षणाची कृती, उदा. ‘आपली नोंद कोण घेणार ? कधी घेणार ?’, अशा प्रत्येक क्षणाचे नियोजन भगवंताने आधीच करून ठेवलेले असते’, असे विचार माझ्या मनात तीव्रतेने आले. या विचारांमुळे या वेळी मी ‘यू.ए.एस्.’च्या निरीक्षणासाठी जातांना पहिल्या वेळी असलेली माझी उत्सुकता न्यून झाली. ‘सर्व ईश्वरी नियोजनाप्रमाणेच घडणार आहे’, या विचाराने माझे मन शांत होतेेे आणि मनात कुठलेही विचार नव्हते. मी ही विचारप्रक्रिया गुरुदेवांना सांगितल्यावर ते ‘छान’, असे म्हणाले.
७. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेली सूत्रे आठवून येणार्या अडथळ्यांवर मात करून सेवा करण्याची प्रेरणा मिळणे
एक दिवस अकस्मात् माझ्याकडे अनेक सूत्रे आणि सेवा एकदम आल्यामुळे मी थोडी अस्थिर झाले होते. त्यामुळे माझ्या शारीरिक स्थितीवर त्याचा परिणाम झाला. थोड्या वेळाने मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेली सूत्रे आठवली आणि ‘वाईट शक्ती माझ्या सेवेत अडथळे आणत आहेत’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा ‘मला सकारात्मक राहून या अडथळ्यांवर मात करून पुढे जायचे आहे’, असा विचार करून मी सेवेतील महत्त्वाच्या कृती करायला घेतल्या. नंतर पुढच्या सर्व सेवा देवानेच साधकांच्या माध्यमातून सेवेमध्ये साहाय्य देऊन माझ्याकडून करवून घेतल्या. तेव्हा ‘आपले गुरुदेव महान आहेत’, असा विचार माझ्या मनात आला.
– सौ. पार्वती जनार्दन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|