ईश्वरप्राप्तीच्या आत्यंतिक तळमळीमुळे संतपदी विराजमान झालेल्या ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे !

भौतिक सुखाची मर्यादा लक्षात आल्यावर साधनेला आरंभ करून ईश्वरप्राप्तीच्या आत्यंतिक तळमळीमुळे संतपदी विराजमान झालेल्या अमेरिकेतील ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे (वय ४९ वर्षे)!

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रो पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. आज आपण ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दात येथे पाहूया.    

(भाग १)

पू. (सौ.) भावना शिंदे यांचा जन्मदिनांक : ३ मे १९७२

वाढदिवस : अधिक वैशाख कृष्ण पक्ष पंचमी (३० मे २०२१) या दिवशी वाढदिवस झाला.

साधकांनो, ‘सनातन’चे आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संत हे केवळ संत नाहीत, तर गुरुच असल्याने त्यांच्याकडून शिका अन् ते कृतीत आणून त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ करून घ्या आणि साधनेत शीघ्र गतीने पुढे जा !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘आतापर्यंत सनातनचे आणि सनातनच्या शिकवणीप्रमाणे साधना करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे मिळून १११ साधक संत झाले आहेत. यांतील काहीजण ठिकठिकाणी जाऊन साधकांना साधनेसंदर्भात अगदी देहत्याग होईपर्यंत मार्गदर्शन करतात. आपण त्यांना ‘समष्टी संत’ म्हणतो. त्यांचे कार्य गुरूंप्रमाणेच साधनेत मार्गदर्शन करण्याचे आहे; म्हणून त्यांची माहिती सर्व साधकांना व्हावी आणि साधकांना संतांकडूनकाहीतरी शिकायला मिळावे, यासाठी त्यांच्याविषयीचे जागेनुसार काही लिखाण ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करत आहोत. त्या माहितीत काही संत आणि साधक यांनी लिहिलेली संतांची गुणवैशिष्ट्ये; शिकवण; त्यांच्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती; त्यांनी स्वतःविषयी, कुटुंबियांविषयी, इतर साधकांविषयी आणि संतांविषयी लिहिलेले लिखाण; त्यांनी केलेल्या कविता किंवा त्यांच्यावर इतर साधकांनी केलेल्या कविता इत्यादी विषयांवर लिखाण आहे. हे लिखाण वाचून त्यांच्याविषयी सर्वांनाच जवळीक वाटण्यास साहाय्य होईल आणि जगभरातील सर्वच साधकांना त्यांची तोंडओळख होईल. संतांची वैशिष्ट्ये केवळ वाचू नका, तर ती स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या लेखमालेचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. (सौ.) भावना शिंदे यांचा परिचय

पू. (सौ.) भावना शिंदे या सामान्य कुटुंबात जन्माला आल्या; मात्र ते कुटुंब सुसंस्कारी असल्यामुळे त्या परिस्थितीतही त्या आनंदी जीवन जगत होत्या. पुढे महाविद्यालयात गेल्यावर वर्ष १९९५ नंतर त्यांना भौतिक सुखाची ओढ निर्माण झाल्यामुळे ते मिळवण्यासाठी त्यांनी पुष्कळ कष्ट केले. त्यांनी अमेरिकेतही भौतिक यशाची शिखरे गाठली; मात्र लहानपणी अगदी सहजतेने मिळत असलेला आनंद त्यांना त्या यशातूनही मिळाला नाही. तेव्हा त्यांनी खर्‍या आनंदाचा शोध घ्यायला आरंभ केला आणि मार्च १९९९ मध्ये ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ चालू झाल्यावर तो शोध थांबला. त्यांना ‘खरा आनंद हा आत्मानंदात आहे’, हे उमजले. त्यानंतर त्यांनी अत्यंत तळमळीने साधना करत साधनेतील यशाचेही शिखर गाठले आणि त्या ३ जानेवारी २०१५ या दिवशी संतपदी विराजमान झाल्या. पू. (सौ.) भावना शिंदे एस्.एस्.आर्.एफ्.च्या देश-विदेशांतील साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. त्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने घेण्यात येणार्‍या सर्व सेवांचे, उदा. ऑनलाईन सत्संग, प्रवचने यांचे दायित्व पहातात. पू. (सौ.) भावना शिंदे यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.

१. बालपण

१ अ. आई-वडिलांनी चांगले संस्कार करणे

‘माझ्या लहानपणी आमच्या घरची परिस्थिती कठीण होती; मात्र देवाच्या कृपेने कठीण काळात विविध समस्यांना एकजुटीने आणि धिराने सामोरे जाणारे कुटुंबीय मला लाभले होते. माझ्या आई-वडिलांनी आम्हा तिन्ही भावंडांवर चांगले संस्कार केले, उदा. आम्हाला दूरचित्रवाणीवर संतांच्या चरित्रांविना अन्य कुठलेही कार्यक्रम किंवा हिंदी चित्रपट पहाण्याची अनुमती नव्हती. त्यामुळे माझ्या मनावर ‘मला संतांसारखे व्हायचे आहे’, असा संस्कार दृढ झाला.

१ आ. कठीण परिस्थितीतही आनंद अनुभवता येणे आणि देवतांची चित्रे किंवा ऐतिहासिक व्यक्तीरेखांच्या छायाचित्रांकडे पहातांना चांगली किंवा नकारात्मक स्पंदने जाणवणे

घरातील परिस्थिती कशीही असली, तरी वार्‍याच्या समवेत पळतांना, झाडांकडे पहातांना आणि हिरवळीवर पहुडल्यावर किंवा घरात कठीण प्रसंग असतांनाही मला आनंद मिळायचा. बालवयातही मला सूक्ष्मातील स्पंदने जाणवायची. देवतांची चित्रे किंवा म. गांधी किंवा स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या ऐतिहासिक व्यक्तीरेखांच्या छायाचित्राकडे पहातांना मला चांगली किंवा नकारात्मक स्पंदने जाणवायची; मात्र त्या वेळी या मागे असणार्‍या अध्यात्मशास्त्राविषयी मी अनभिज्ञ होते.

१ इ. शिक्षण

१ इ १. ‘बालमोहन विद्यामंदिर’ या शाळेतील सांस्कृतिक वातावरण आवडणे आणि त्यामुळे घरची परिस्थिती कठीण असतांनाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे : मला दादर (मुंबई) येथील मराठी माध्यमाच्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ या शाळेत जायला आवडायचे; कारण तिथे चांगल्या सवयी, म्हणजे अभ्यासाची आवड, संस्कृतचा अभ्यास आणि गीतेतील अध्यायांचे पाठांतर शिकवायचे, तसेच शाळेत सण अन् उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरे केले जायचे. मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महान आणि सात्त्विक व्यक्तीरेखांच्या जीवनचरित्रावरील नाटकांमध्ये भाग घेता यायचा. त्यामुळे माझ्या घरची परिस्थिती कठीण असतांनाही विद्यामंदिरातून मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.

१ इ २. कनिष्ठ महाविद्यालयातील आधुनिक वातावरणाचा त्रास होणे : कनिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येक गोष्टीवर आधुनिक आणि भोगवादी जीवनशैलीचा प्रभाव असल्यामुळे हा काळ माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरला. या सर्व गोष्टींना यशस्वीपणे तोंड देणे आणि इंग्रजी भाषेचा अतीवापर यांमुळे माझ्यासाठी ती परिस्थिती अधिकच आव्हानात्मक ठरत होती. या महाविद्यालयात संस्कृतची आवड असणारे विद्यार्थी अत्यल्प असल्यामुळे मी माझे संस्कृतचे शिक्षण पुढे चालू ठेवू शकले नाही.

१ इ ३. मुंबई विद्यापिठात संगणकीय अभियांत्रिकीचे शिक्षण घेतांना नास्तिक बनणे आणि त्या वेळी मानसिक स्थिती ढासळणे : पुढे संगणकीय अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी मी मुंबई विद्यापिठात प्रवेश घेतल्यावर परिस्थिती अधिकच कठीण झाली; कारण तिथे जाण्यासाठी मला प्रतिदिन ३ – ४ घंट्यांचा प्रवास करावा लागायचा. हा माझ्या जीवनातील अत्यंत वाईट काळ होता; कारण याच कालावधीत मी नास्तिक झाले. तेव्हा मी वारंवार प्रचंड चिडचिड अन् निराशा अनुभवत असे. या पार्श्वभूमीवर ‘मला संगणकीय अभियांत्रिकीची पदवी मिळणे’ हा एक चमत्कारच होता’, असे मला वाटते.

१ इ ४. अमेरिकेत मिळालेले अभूतपूर्व यश : वर्ष १९९५ मध्ये भौतिक सुखाची महत्त्वाकांक्षा बाळगून मी वडिलांच्या इच्छेविरुद्ध मियामी विद्यापिठाच्या शिष्यवृत्तीवर अमेरिकेला गेले आणि तेथे ‘एम्.बी.ए’ ही पदवी प्राप्त केली. अमेरिकेत गेल्यावर मला यशामागून यश मिळत गेले. तेथील विद्यापिठात शिकत असतांना पहिल्या सहामाहीत मला ८ आस्थापनांनी ‘इंटर्नशिप’ करण्याविषयी विचारणा केली. माझ्यासाठी हे सर्व अत्यंत अकल्पनीय अन् अभूतपूर्व होते.

१ इ ५. भौतिक सुख मिळवण्यासाठी परिश्रम करण्यामधील फोलपणा लक्षात येणे आणि बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसणार्‍या आनंदाच्या शोधाला प्रारंभ करणे : असे असले, तरी बाह्य परिस्थितीनुसार, म्हणजे ‘इतर लाेक माझ्याशी कसे वागतात ?’, यानुसार आतून मी कधी आनंदी आणि कधी दुःखी व्हायचे. हे यश मिळवण्यासाठी मी कठीण परिश्रम करूनही ‘लहानपणी सहजतेने मिळत असलेला आनंद आज मला अनुभवता येत नाही’, हे कटू सत्य मला स्वीकारता येत नव्हते. भौतिक सुख मिळवण्यासाठी परिश्रम करण्यामधील फोलपणा माझ्या लक्षात येऊ लागला आणि मी बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसणार्‍या आनंदाच्या शोधाला प्रारंभ केला.’

२. शोध आनंदाचा !

२ अ. अमेरिकेतील हिंदु मंदिरे आणि चर्च यांना भेटी देणे, बायबलचा अभ्यास करणे, मनातील प्रश्नांची उत्तरे चर्चमधील धर्मगुरूंना विचारल्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरांनी मनाचे समाधान न होणे अन् चर्चमधील मित्र-मैत्रिणींनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करूनही देवाला अनुभवता न येणे : ‘या आनंदाच्या शोधात मी जवळपासच्या अनेक हिंदु मंदिरांना भेटी दिल्या; पण तेथे माझ्या मनातील अध्यात्माविषयीच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यानंतर मी भारतात मला भेट मिळालेल्या ‘पवित्र बायबल’चा अभ्यास चालू केला. सलग २ वर्षे मी प्रतिदिन बायबलची काही पाने वाचून त्याविषयी माझ्या मनात निर्माण झालेल्या शंका लिहून ठेवत असे. या शंका मी बायबल अभ्यासवर्गाचे सदस्य किंवा चर्चमधील धर्मगुरु यांना विचारायचे; पण त्यांनी दिलेल्या उत्तरांनी माझे समाधान झाले नाही. माझ्या चर्चमधील मित्र-मैत्रिणी मला ‘शांत आणि स्थिर होऊन देवाला अनुभव किंवा देवाचा आवाज ऐक’, असे सांगायचे. मला तसे करायला पुष्कळ आवडले असते; पण पुष्कळ वेळ एकांतवासात घालवूनही मला देवाचा आवाज ऐकू आला नाही.

२ आ. विवाह आणि साधनेस आरंभ

२ आ १. विवाह झाल्यावर एका साधिकेशी भेट होणे आणि मायेत गुरफटल्याने तिने सांगितलेली सूत्रे पटूनही नामजपाला आरंभ न करणे, तसेच सत्संगांनाही उपस्थित न रहाणे : याच सुमारास माझा विवाह झाला आणि मी अमेरिकेतील अटलांटा येथे रहायला गेले. वर्ष १९९८ मध्ये माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी माझी भेट एका साधिकेशी झाली. तिने मला नामजपाचे महत्त्व समजावून सांगितले आणि सत्संगांना उपस्थित रहाण्याचे आमंत्रण दिले. त्या साधिकेने सांगितलेली सर्व सूत्रे मला पटली होती; मात्र तरीही ३ मास मी नामजपाला आरंभ केला नाही आणि सत्संगांनाही उपस्थित राहिले नाही. मी मायेत पूर्ण गुरफटून गेले होते.

२ आ २. श्री रामकृष्ण परमहंस यांचे जीवनचरित्र वाचतांना ‘देवाला अनुभवण्यासाठी पुष्कळ परिश्रम घ्यायला हवेत’, हे लक्षात येणे : त्यानंतर एक दिवस मी माझ्या मोठ्या भावाने मला भेट दिलेले श्री रामकृष्ण परमहंस यांचे जीवनचरित्र वाचायला घेतले. या पुस्तकात मी ‘श्री रामकृष्ण हे देवीच्या दर्शनासाठी व्याकुळ होऊन रात्रभर रडत होते’, हे वाक्य वाचले. ‘श्री रामकृष्णांनी ‘देवीचे दर्शन व्हावे’, यासाठी तिला ज्या व्याकुळतेने आळवले होते, त्याप्रमाणे मीही ईश्वराला अनुभवण्यासाठी पुष्कळ परिश्रम घ्यायला हवेत’, असे मला वाटले.

२ आ ३. सत्संगांना उपस्थित रहाणे आणि शंकानिरसन झाल्यामुळे साधनेला आरंभ करणे : मार्च १९९९ मध्ये मी सत्संगांना उपस्थित रहाण्यास आरंभ केला. या सत्संगांत माझ्या मनातील अध्यात्माविषयीच्या सर्व शंकांचे निरसन झाले आणि माझा आनंदाचा शोध संपला अन् साधनाप्रवासाला आरंभ झाला. ‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली याच जन्मात ईश्वरप्राप्तीचे ध्येय गाठणार’, याविषयी माझी निश्चिती झाली.

२ आ ४. साधना चालू केल्यानंतर ‘पुष्कळ राग येणे’ हा स्वभावदोष उणावणे, ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर भीतीदायक स्वप्न पडणे बंद होणे आणि त्यानंतर सत्सेवेला आरंभ करणे : त्यानंतर जीवनात आलेल्या अत्यंत कठीण परिस्थितीतही मी कधी कुठल्याही कारणांसाठी सत्संग किंवा सत्सेवा चुकवली नाही. ‘पुढील काही वर्षे किती कठीण परिस्थिती आहे ?’, हे देवाला ठाऊक होते. त्याचा अंत वर्ष २००५ मध्ये माझा घटस्फोट होण्यात झाला. या कालावधीत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यात पुष्कळ आंतरिक पालट घडले आहेत’, असे मी अनुभवत होते. माझ्यातील ‘पुष्कळ राग येणे’ हा स्वभावदोष काही मास सातत्याने स्वयंसूचना दिल्यामुळे पुष्कळच उणावला आणि मला शांत रहाणे जमू लागले, तसेच युवावस्थेपासून मला ‘माझा कुणीतरी पाठलाग करत आहे’, असे भीतीदायक स्वप्न पडायचे. दोन मास ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर हे स्वप्न पडणे बंद झाले. नंतर मी ‘अध्यात्माविषयीच्या लेखांचे मराठीतून इंग्रजीत भाषांतर करणे आणि अभ्यासवर्ग घेणे’ या सेवा करायला आरंभ केला.

– (पू.) सौ. भावना शिंदे (जुलै २०१८)

(क्रमशः उद्याच्या अंकात)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/489447.html
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक