ईश्वरप्राप्तीच्या आत्यंतिक तळमळीमुळे संतपदी विराजमान झालेल्या ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे !

भौतिक सुखाची मर्यादा लक्षात आल्यावर साधनेला आरंभ करून ईश्वरप्राप्तीच्या आत्यंतिक तळमळीमुळे संतपदी विराजमान झालेल्या अमेरिकेतील ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे (वय ४९ वर्षे) !

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रो पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. आज आपण अमेरिकेतील ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दात येथे पाहूया.

२३.६.२०२१ या दिवशी आपण पू. (सौ.) भावना शिंदे यांचे बालपण, शालेय शिक्षण आणि अमेरिकेत मिळालेले अभूतपूर्व यश हा भाग पाहिला. आता आपण या साधनाप्रवासाचा पुढील भाग पाहूया !   

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/489125.html

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये सनातन आणि एस्.एस्.आर्.एफ्. संतांच्या संदर्भात येत असलेल्या लेखांमुळे ‘पुढे मी नसेन, तेव्हा साधकांना मार्गदर्शन कोण करणार ?’,  ही माझी काळजी पूर्णपणे दूर होऊन मी निश्चिंत झालो !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये सनातन आणि एस्.एस्.आर्.एफ्.च्या अनेक संतांच्या संदर्भात साधकांनी लिहिलेले लेख काही वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांत संत आणि साधक यांनी लिहिलेली संतांची गुणवैशिष्ट्ये, शिकवण, त्यांच्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती इत्यादी विषय वाचून ‘पुढे मी नसेन तेव्हा साधकांना मार्गदर्शन कोण करणार ?’, ही माझी काळजी पूर्णपणे दूर झाली आहे. उलट मला वाटले, ‘मी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कुठेच जाऊन साधकांना भेटू शकत नाही. याउलट सनातनचे संत साधकांना नियमितपणे भेटतात. या भेटींमुळे साधकांची प्रगती जलद होत आहे, तसेच संस्थेचे कार्यही झपाट्याने वाढत आहे.’ यामुळे मला आनंद झाला !

या आपत्काळातही सनातनच्या साधकांना संतांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे साधनेत लाभ होत आहे. सनातनची शिकवण अशीच पुढे वृद्धींगत होऊन साधक साधनेत पुढे पुढे जाणार आहेत आणि हिंदु राष्ट्राची धुरा सांभाळणार आहेत. त्यामुळे मला काळजी वाटत नाही. यासाठी मी माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या आणि देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. (सौ.) भावना शिंदे यांचा परिचय

पू. (सौ.) भावना शिंदे

पू. (सौ.) भावना शिंदे या सामान्य कुटुंबात जन्माला आल्या; मात्र ते कुटुंब सुसंस्कारी असल्यामुळे त्या परिस्थितीतही त्या आनंदी जीवन जगत होत्या. पुढे महाविद्यालयात गेल्यावर वर्ष १९९५ नंतर त्यांना भौतिक सुखाची ओढ निर्माण झाल्यामुळे ते मिळवण्यासाठी त्यांनी पुष्कळ कष्ट केले. त्यांनी अमेरिकेतही भौतिक यशाची शिखरे गाठली; मात्र लहानपणी अगदी सहजतेने मिळत असलेला आनंद त्यांना त्या यशातूनही मिळाला नाही. तेव्हा त्यांनी खर्‍या आनंदाचा शोध घ्यायला आरंभ केला आणि मार्च १९९९ मध्ये गुरुकृपायोगानुसार साधना चालू झाल्यावर तो शोध थांबला. त्यांना ‘खरा आनंद हा आत्मानंदात आहे’, हे उमजले. त्यानंतर त्यांनी अत्यंत तळमळीने साधना करत साधनेतील यशाचेही शिखर गाठले आणि त्या ३ जानेवारी २०१५ या दिवशी संतपदी विराजमान झाल्या. पू. (सौ.) भावना शिंदे एस्.एस्.आर्.एफ्.च्या देश-विदेशांतील साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. त्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने घेण्यात येणार्‍या सर्व सेवांचे, उदा. ऑनलाईन सत्संग, प्रवचने यांचे दायित्व पहातात. पू. (सौ.) भावना शिंदे यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभणे आणि त्यानंतर समष्टी साधना चालू होणे

३ अ. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर स्वतःला आध्यात्मिक त्रास असल्याचे समजणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नामजपादी उपायांच्या साहाय्याने त्रासाशी लढण्याचे अन् समष्टी साधनेचे महत्त्व समजावून सांगणे

जानेवारी २००६ मध्ये विदेशातील आम्ही काही साधक रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेव्हा ‘तुम्हाला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे’, असे मला सांगण्यात आले; पण त्यावर माझा विश्वास बसला नाही. या कालावधीत एके दिवशी आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग मिळाला. त्या वेळी मी त्यांना विचारले, ‘‘मी जानेवारी २००४ मध्येही आश्रमात आले होते. त्या वेळी मला जो आनंद मिळाला होता, तो या आश्रमभेटीच्या वेळी जाणवत नाही.’’ हे ऐकून त्यांनी मला नामजपादी उपायांच्या साहाय्याने त्रासाशी लढण्याचे महत्त्व सांगितले आणि ते म्हणाले, ‘‘आपल्यापैकी बहुतेक जण ‘मी आणि माझा भाव’, ‘मी अन् माझी आध्यात्मिक प्रगती’ यांसारख्या संकुचित विचारात अडकले आहेत. तुम्ही ज्या देशात रहात आहात, तेथील लोकांच्या आध्यात्मिक प्रगतीचे काय ?’’

३ आ. अध्यात्मप्रसाराच्या सेवेला आरंभ

परात्पर गुरु डॉक्टरांच्या या वाक्याचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यानंतर २ आठवड्यांनी मी अमेरिकेला परतले आणि माझे लक्ष ‘अध्यात्मप्रसाराचा आनंद अनुभवयाचा आहे’, याकडे केंद्रित झाले. त्या वेळी मी नियमितपणे प्रवचने आणि सत्संग घेऊ लागले, तसेच उत्तर अमेरिकेतील साधकांना साधनेत साहाय्य करू लागले. हे सर्व मी एक पालक असून आणि प्रतिदिन १० घंटे नोकरी करून करायचे. प्रत्येक आठवड्याला ३० ते ३५ घंटे सेवा पूर्ण करण्यासाठी मला अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे लागायचे.’

४. व्यष्टी साधनेची तळमळ तीव्र होणे आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होणे

४ अ. नोकरी आणि घर सांभाळत असतांना कित्येक घंटे नामजप करणे अन् स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी तळमळीने प्रयत्न करणे

‘मी उपलब्ध असलेल्या प्रत्येक क्षणी नामजप करण्याचा प्रयत्न करायचे, उदा. आगगाडीची वाट पहातांनाही मी नामजप करायचे आणि ‘त्यात संख्यात्मक अन् गुणात्मक वाढ होत आहे ना ?’, याचा आढावाही घ्यायचे. मी आगगाडीतून प्रवास करतांना खिडकीतून दिसणार्‍या निरभ्र आकाशाकडे पाहून नामजप करायचे. त्यामुळे माझा प्रतिदिन कित्येक घंटे नामजप व्हायचा. मी स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भातील लिखाण करायचे. मी त्या २ वर्षांत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या अंतर्गत जवळजवळ १ सहस्र पाने लिहून काढली. त्यामुळे माझ्यातील ‘चालढकल करणे’ हा तीव्र स्वभावदोष न्यून होऊ लागला.

४ आ. अनाहतचक्राच्या स्थानी अग्नीज्वालांच्या धगधगण्याचा आवाज ऐकू येणे, परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘हा ईश्वरप्राप्तीसाठी असणारा तळमळरूपी अग्नी आहे’, असे सांगणे

माझी साधनेची तळमळ पुष्कळ वाढली होती. शांत बसल्यावर मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी अग्नीच्या ज्वालांप्रमाणे धगधगण्याचा आवाज ऐकू यायचा. या अनुभूतीविषयी मी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी ‘हा ईश्वरप्राप्तीसाठी असणारा तळमळरूपी अग्नी आहे’, असे सांगून माझ्या जाणिवेला (विचारांना) पुष्टी दिली. या तळमळीमुळेच मी जानेवारी २००८ मध्ये ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठू शकले.

४ इ. आगगाडीच्या प्रवासात सभोवती प्रवासी असतांनाही देवाच्या आठवणीने रडू येणे आणि त्यानंतर आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होणे

त्यानंतर माझ्या साधनेच्या प्रयत्नांमध्ये पुष्कळ वाढ झाली. काही वेळा मला रात्रीची ३ – ४ घंटे झोप पुरेशी होई. काही वेळा तर मी रात्रभर जागीच रहायचे. अनेक वेळा आगगाडीने प्रवास करतांना सभोवती इतर प्रवासी असतांनाही देवाच्या आठवणीने मला रडू यायचे. याची फलश्रुती जानेवारी २००९ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होण्यात झाली.

५. आध्यात्मिक पातळी घसरणे

५ अ. आध्यात्मिक त्रास वाढल्याने साधनेवरून प्रसारकार्याकडे लक्ष वळणे, त्याची परिणती आध्यात्मिक पातळी न्यून होण्यात होणे  आणि तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक त्रास उणावल्यावर झपाट्याने प्रगती होईल’, या बोलांनी आश्वस्त होणे

या कालावधीत माझ्याकडे एस्.एस्.आर्.एफ्.च्या  देश-विदेशांतील प्रसाराचे दायित्व आले. याच काळात माझ्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली आणि माझे लक्ष साधनेवरून प्रसारकार्याकडे वळले. त्या वेळी माझ्याकडून सत्सेवा करतांना पुष्कळ चुका झाल्या आणि त्याचा परिणाम इतर साधकांवर झाला. परिणामस्वरूप जानेवारी २०१० मध्ये माझी आध्यात्मिक पातळी १ टक्का घटली. मला माझ्याकडून झालेल्या चुकांची जाणीव करून देण्यात आली. यातून मला ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूमुळे साधनेवरील लक्ष न्यून होते आणि आध्यात्मिक त्रास वाढतो’, हे महत्त्वाचे सूत्र शिकायला मिळाले. या कठीण काळातही परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘भावना यांच्या साधनेतील अडथळा ‘अहं’चा नसून आध्यात्मिक त्रास आहे. त्रास न्यून झाल्यावर त्या झपाट्याने प्रगती करतील’, या एका निरोपाने मला आश्वस्त केले.

५ आ. नामजपादी उपायांकडे लक्ष न दिल्यामुळे पुन्हा आध्यात्मिक पातळी घसरणे आणि त्यानंतर सर्व सेवा थांबवून प्रतिदिन केवळ नामजपादी उपाय करण्यास सांगण्यात येणे

मी नामजपादी उपायांकडे दुर्लक्ष करून केवळ स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. परिणामस्वरूप माझा आध्यात्मिक त्रास वाढतच राहिला आणि प्रतिवर्षी १ टक्का या प्रमाणात माझी आध्यात्मिक पातळी घसरत गेली. त्यामुळे जानेवारी २०१३ पासून मला सर्व सेवा थांबवून केवळ नामजपादी उपायांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले. त्या वर्षी मला रामनाथी (गोवा) येथील आश्रमात ६ मास रहाण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत मला प्रतिदिन ५ ते ८ घंटे नामजपादी उपाय करायला सांगण्यात आले होते. हे उपायच माझ्या साधनाप्रवासाला महत्त्वाचे वळण देणारे ठरले.

६. संतपदी विराजमान होणे

जानेवारी २०१४ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘तुमच्या अनिष्ट शक्तींच्या त्रासाविरुद्ध चालू असलेल्या सूक्ष्म लढ्याचा निर्णायक टप्पा जवळ आला असून त्याचे परिणाम ६ मासांत दिसतील’, असा निरोप पाठवून मला पुन्हा आश्वस्त केले. गुरुदेवांच्या वचनाप्रमाणे जुलै २०१४ च्या गुरुपौर्णिमेला माझी आध्यात्मिक पातळी एकदम २ टक्क्यांनी वाढून ६९ टक्के झाली आणि जानेवारी २०१५ मध्ये ती ७१ टक्के झाली. त्यामुळे ‘मला संतपद प्राप्त झाले आहे’, असे घोषित करण्यात आले.

७. परात्पर गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे साधनाप्रवासात प्रगतीचे टप्पे अनुभवता येणे

वर्ष २००९ पासून मला ‘या साधनाप्रवासात परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीकृष्णाच्या रूपात सदैव माझ्या समवेत आहेत’, तसेच ‘श्रीकृष्ण आहे. त्यामुळे मी आहे’, असे अनुभवता येऊ लागले. परात्पर गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे मला अनेक अनुभूती आल्या आणि पुष्कळ वेळा श्रीकृष्णाचे दर्शनही झाले. मला ईश्वराशी साधता येणारे भावपूर्ण अनुसंधान आणि त्यातून मिळणारा आनंद, स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनामुळे स्वतःमध्ये झालेले परिवर्तन आणि अंतर्मनापासून वाटणारी कृतज्ञता हे सर्व टप्पे गाठणे गुरुदेवांच्या अपार कृपेमुळेच शक्य झाले.

८. ‘सर्व काही श्रीकृष्णच करत आहे’, याची अनुभूती येऊन समष्टी सेवेतून आनंद अनुभवता येऊ लागणे

वर्ष २०१७ पासून ‘श्रीकृष्ण साधकांच्या रूपात सतत माझ्यासमवेत आहे’, असे मला जाणवू लागले. ‘माझ्या सभोवती असणारी ‘साधकरूपी सुंदर समष्टी’ हे त्याचेच रूप आहे आणि त्या रूपाने तो मला घडवत आहे’, अशा अनुभूती येऊ लागल्या. समष्टी नसती, तर मला साधना करण्याची संधीच मिळाली नसती. गेले काही दिवस कृष्णाच्या कृपावर्षावामुळे मला शरणागतीमधील आनंद अनुभवता येत आहे. त्यामुळे ‘सर्व काही श्रीकृष्णच करत आहे’, याची मी सतत अनुभूती घेत आहे. तो माझी सेवा करतो आणि मी त्याच्या समष्टी रूपाची सेवा करण्याचा आनंद अनुभवते.

‘परात्पर गुरु डॉक्टर, आपण परम दयाळू आणि सर्वज्ञानी आहात. ‘आपल्याच कृपेने मला समष्टीचे वरदान प्राप्त झाले आणि माझ्या आध्यात्मिक त्रासाचे निवारण झाले’, यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

(क्रमश: उद्याच्या अंकात)

– (पू.) सौ. भावना शिंदे, अमेरिका (जुलै २०१८)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक