‘‘राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे ‘ऑडिट’ (नोंदींचे परीक्षण) करा !’’

दक्षिण गोवा अधिवक्ता संघटनेची गोवा खंडपिठाकडे मागणी

पणजी, १४ जून (वार्ता.) – ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू पावलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्या निकटवर्तियांना त्यांच्या परिस्थितीनुरूप हानीभरपाई द्यावी. आणि यासाठी न्यायालयीन अन्वेषण आयोग नेमावा. राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे ‘ऑडिट’ (नोंदींचे परीक्षण) करावे, अशा मागण्या दक्षिण गोवा अधिवक्ता संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाकडे केल्या आहेत. राज्यशासनाने याविषयी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. पुढील सुनावणी १७ जून या दिवशी होणार आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची चिन्हे असली, तरी मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ राज्यातील कोरोना व्यवस्थापनाला अनुसरून न्यायालयात प्रविष्ट झालेल्या सुमारे १० याचिकांवर एकत्रित सुनावणी घेत आहे.

यामधील काही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे पुढील मागण्या केल्या आहेत.

१. आधुनिक वैद्य आणि अन्य क्षेत्रांतील तज्ञ यांचा सहभाग असलेल्या समितीच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांचे ‘ऑडिट’ करावे.

२. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी ‘मेडिकल ऑक्सिजन’ आणि औषधे यांचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध करावा.

३. ‘व्हेंटिलेटर’, अतीदक्षता विभाग आणि अन्य वैद्यकीय सामग्री यांचे नित्यनेमाने ‘ऑडिट’ करावे.

४. आरोग्य क्षेत्रातील तज्ञांची कंत्राटी पद्धतीवर आणि शक्य झाल्यास कायमस्वरूपी नेमणूक करावी.

५. रेल्वेतून येणार्‍या प्रत्येक प्रवाशाचा ‘कोरोना निगेटिव्ह’ दाखला तपासण्याविषयी कोकण रेल्वे प्रशासनाला निर्देश द्यावे.

६. चित्रपटगृहे, मॉल, मार्केट आणि खेळांच्या स्पर्धा टप्प्याटप्प्याने चालू कराव्या, तसेच या ठिकाणी लोकांच्या उपस्थितीवर मर्यादा घालावी.