महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ?

औषधी वनस्पतींची संख्या अगणित आहे. अशा वेळी कोणत्या वनस्पती लावाव्यात ? असा प्रश्न पडू शकतो. प्रस्तुत लेखात काही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? याविषयी माहिती दिली आहे. वाचक या लेखात दिलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त अन्यही वनस्पती लावू शकतात.  आतापर्यंतच्या लेखात आपण तुळस, अडुळसा, गुळवेल, कोरफड, कालमेघ आणि जाई यांच्याविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/486664.html

मार्गदर्शक : डॉ. दिगंबर मोकाट, साहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तथा प्रमुख संचालक, क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्चिम विभाग, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार.

संकलक : श्री. माधव रामचंद्र पराडकर आणि वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१२. पानवेल (विड्याच्या पानांची वेल)

पानवेल (विड्याच्या पानांची वेल)

१२ अ. महत्त्व : पावसाच्या दिवसांत जेवणावर विडा खाल्ल्याने जेवण पचण्यास साहाय्य होते. खोकला, कफ, पचनशक्ती मंद असणे यांसाठी याचा उपयोग होतो. ४ जणांच्या कुटुंबासाठी एखादी वेल पुरेशी आहे.

१२ आ. लागवड : मोठ्या वेलीच्या फांद्या कापून लावल्यास त्यातून वाढ होते. ही वेल बहुतेक जणांकडे असते. याची रोपे रोपवाटिकांमध्ये विकतही मिळतात. वेलीला आधार लागतो. त्यामुळे ही वेल शेवगा, पांगारा, हादगा, नारळ, पोफळी यांसारख्या झाडाच्या मुळात लावावी. एकदा वेल झाल्यास ती पुष्कळ वाढते.

१३. पानफुटी (पर्णबीज)

पानफुटी (पर्णबीज)

१३ अ. महत्त्व : मूतखड्यावर हे चांगले औषध आहे. ४ जणांच्या कुटुंबासाठी एखादे झाड असावे.

१३ आ. लागवड : याचे पान मातीत उभे एक चतुर्थांश ते अर्धे पुरावे. यामुळे त्या पानाला नवीन रोपे येतात. पानापासून नवीन रोपे येतात, यासाठी याला पानफुटी किंवा पर्णबीज म्हणतात. बहुतेक जणांकडे हे झाड असते किंवा याची रोपे रोपवाटिकांमध्ये विकत मिळतात.

१४. माका

माका

१४ अ. महत्त्व : पोटाचे विकार, खोकला, दमा, तसेच केसांचे विकार यांसाठी हे फार मोठे औषध आहे. महालय पक्षात माका लागतो. त्यामुळे बरेच जण घरी याची लागवड करतात. ४ जणांच्या कुटुंबासाठी ८ ते १० झाडे असावीत.

१४ आ. लागवड : पाऊस पडल्यावर माक्याची रोपे आपोआप उगवतात. रस्त्याच्या बाजूने, काही ठिकाणी (अगदी शहरांतही) नाल्यांच्या किंवा गटारांच्या बाजूला माक्याची रोपे सापडतात. भातशेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे हे तण आहे. पावसाळ्यानंतर पाणी न मिळाल्यास हे तण मरून जाते. त्यामुळे जेव्हा मिळेल, तेव्हा आणून आपल्याजवळ याची लागवड करून ठेवावी. पावसाळ्यानंतर नियमित पाणी द्यावे.

१५. जास्वंद

जास्वंद

केसांच्या आरोग्यासाठी जास्वंदीचा उपयोग होतो. फांद्या लावून झाडे होतात. देशी जास्वंद लावावी. ४ जणांच्या कुटुंबासाठी १ झाड असले, तरी पुरेसे आहे.

१६. पुनर्नवा

पुनर्नवा

१६ अ. महत्त्व : मूत्रपिंडे निकामी होत असतील, तर त्यांच्यासाठी हे औषध संजीवनी आहे. मूतखडा, बद्धकोष्ठता, सूज यांवर अतिशय गुणकारी आहे. तुपाची फोडणी देऊन बनवलेली पुनर्नव्याच्या कोवळ्या पानांची भाजी वर्षातून एकदा तरी खावी, असे म्हणतात. याने पोटातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास साहाय्य होते. घराभोवती जागा असल्यास जास्तीतजास्त लागवड करावी.

१६ आ. ओळख आणि लागवड : पावसाळ्यात ही झाडे आपोआप उगवतात. शहरातही ही वनस्पती नाल्यांच्या किंवा रस्त्याच्या बाजूला आढळते. खोड तांबूस असते. पाने गडद हिरव्या रंगाची असतात. (छायाचित्र ३) ही वनस्पती पसरणारी आहे. हिला गुलाबी रंगाची फुले येतात. पावसाळ्यानंतर पाणी नसल्यास झाड मरते; पण मूळ जिवंत रहाते. पुन्हा पावसाळ्यात पाणी मिळाल्यावर झाड तरारून येते. त्यामुळे याला ‘पुनर्नवा’ म्हणतात. याची २ ते ४ रोपे लावली, तरी वर्षभरात ती १० ते १२ वर्गमीटर परिसरात पसरतात. या वनस्पतीचे मूळ पुष्कळ खोल असते. त्यामुळे ही वनस्पती सापडल्यास ओढून न काढता खणून काढावी आणि तिची लागवड करावी.

१७. ब्राह्मी

जलब्राह्मी
मंडूकपर्णी

१७ अ. महत्त्व : स्मृतीवर्धक म्हणून प्रसिद्ध आहे. शांत झोप लागण्यासाठी, तसेच केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. ही रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास साहाय्यक आहे. ही घराभोवती जास्तीतजास्त प्रमाणात लागवड केलेली असावी.

१७ आ. प्रकार आणि लागवड : हिचे २ प्रकार असतात, जलब्राह्मी आणि मंडूकपर्णी. दोन्ही प्रकारांचे गुणधर्म समान आहेत. कोकणातील नारळ-पोफळींच्या बागेत मंडूकपर्णी उगवते. बरेच जण घराभोवती ‘लॉन’ऐवजी मंडूकपर्णीची लागवड करतात. ही वनस्पती भूमीवर पसरत जाते. कुणाकडे असेल, तर तिची ५ – ६ रोपे आणून लावल्यास थोड्याच दिवसांत पुष्कळ पसरते. हिची रोपे रोपवाटिकांमध्ये मिळू शकतात. भातशेतीत निसर्गतः उगवणारे हे तण असल्याने तेथे ही वनस्पती निश्चितच आढळते. हे गुरांचे आवडीचे खाद्य असल्याने ही वनस्पती जास्त काळ शेतात टिकत नाही; पण जिथे लाजाळूसारखी काटेरी वनस्पती पसरलेली असते, अशा ठिकाणी गुरे तोंड घालत नसल्याने भातशेतीमध्ये त्या ठिकाणी ब्राह्मीची रोपे मिळू शकतात. या रोपांची एखाद्या कुंडीतही लागवड करता येते. खोडाच्या तुकड्यांपासूनही ब्राह्मीची लागवड होते. ब्राह्मीच्या लागवडीसाठी पाण्याची उपलब्धता नेहमी राहील, अशी जागा निवडावी.

१८. वेखंड

वेखंड

१८ अ. महत्त्व : हे औषधांमध्ये नियमित लागत नसले, तरी एखादे रोप घरी असावे. हे ‘संज्ञास्थापन’ म्हणजे ‘बेशुद्ध पडलेल्याला शुद्धीवर आणणारे’ औषध आहे.

१८ आ. लागवड : याला भरपूर पाणी लागते. दलदल असेल, तर वेखंड चांगले होते. कुणाकडे वेखंडाची रोपे असतील, तर याचे कंद कापून लावता येतात. काही रोपवाटिकांमध्ये याची रोपे मिळतात.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

  • आपत्काळाच्या दृष्टीने महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? हे सांगणारी ही लेखमाला साधक आणि वाचक यांनी संग्रही ठेवावी.
  • ज्या व्यक्तींकडे मध्यम (३ – ४ एकर) किंवा मोठ्या प्रमाणात लागवड करण्यायोग्य भूमी आहे, अशा व्यक्तींनी समाजबांधवांचा विचार करून मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करावी. यामुळे अनेकांना आयुर्वेदाची औषधे उपलब्ध होऊन त्यांचे आरोग्यरक्षण होईल. या माध्यमातूनही समष्टी साधना होईल !   
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/487149.html