औषधी वनस्पतींची संख्या अगणित आहे. अशा वेळी कोणत्या वनस्पती लावाव्यात ? असा प्रश्न पडू शकतो. प्रस्तुत लेखात काही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? याविषयी माहिती दिली आहे. वाचक या लेखात दिलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त अन्यही वनस्पती लावू शकतात. आतापर्यंतच्या लेखात आपण तुळस, अडुळसा, पानवेल, माका, पुनर्नवा, ब्राह्मी आणि वेखंड आदी औषधी वनस्पतींची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/486887.html |
मार्गदर्शक : डॉ. दिगंबर मोकाट, साहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तथा प्रमुख संचालक, क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्चिम विभाग, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार.
संकलक : श्री. माधव रामचंद्र पराडकर आणि वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१९. शतावरी
१९ अ. महत्त्व : शतावरी एक उत्तम शक्तीवर्धक औषध आहे. घरगुती स्तरावर शतावरीची २ ते ४ रोपे लावली, तरी पुरेशी होतात. शतावरीच्या मुळ्यांचा ताजा रस औषध म्हणून वापरता येतो.
१९ आ. ओळख : कोकणात पावसाळ्यामध्ये आंबा-काजूच्या बागांमध्ये किंवा माळरानावर ही वनस्पती आपोआप उगवते. हिची पाने वैशिष्ट्यपूर्ण असतात. वेलीच्या मुळाशी खणले असता एका खोडाला ५० ते १०० मुळ्या सापडतात. १ मुळी लावल्यावर हिच्या १०० मुळ्या होतात, म्हणून हिचे नाव शतावरी पडले असावे.
१९ इ. लागवड : पावसाळा संपल्यावर हिला बारीक फळे येतात. फळांतील बियांपासून शतावरीची रोपे बनवल्यास लागवड चांगली होते. हिच्या मुळ्यांच्या झुपक्यातून एकेक मुळी वेगळी काढून लावल्यासही रोप तयार होते. साधारण दीड वर्षात एका मुळीपासून अनेक मुळ्या तयार होतात. हिची लागवड घरगुती स्वरूपाची करावी. महाराष्ट्रात अनेक शेतकर्यांनी व्यावसायिक स्तरावर शतावरीची लागवड केली आहे. त्यांच्याकडून शतावरीच्या मुळ्यांचा एखादा झुपका आणला, तरी त्यापासून जेवढ्या मुळ्या असतात, तेवढी (साधारण ५० ते १००) रोपे बनू शकतात. सांगली, सोलापूर, सातारा आणि पुणे या भागात अनेक शेतकर्यांनी शतावरीची व्यावसायिक स्तरावर लागवड केली आहे. पांढरी आणि पिवळी असे शतावरीचे २ प्रकार असतात. दोन्ही प्रकारची शतावरी औषधांमध्ये वापरतात.
१९ इ १. मोठ्या प्रमाणात लागवड करायची असल्यास शतावरी सोलण्याची व्यवस्था करणे आवश्यक असणे : व्यावसायिक स्तरावर शतावरी लागवड करायची असल्यास शतावरी सोलण्याचे यंत्र असणे अत्यंत आवश्यक आहे; कारण शतावरी हातांनी सोलणे पुष्कळ कष्टाचे आणि वेळखाऊ काम असते. शतावरीवरील साल काढल्याविना ती वाळत नाही आणि तशीच ठेवली, तर तिला बुरशी धरते. त्यामुळे शतावरी सोलण्याचे यंत्र नसेल, तर व्यावसायिक स्तरावर लागवड करू नये.
२०. हळद
२० अ. महत्त्व : ‘प्रतिदिन रात्री झोपतांना १ चमचा हळदपूड कोमट पाण्यासोबत घेतल्यास शरीर वज्रदेही (बळकट) बनते’, असे ज्येष्ठ वैद्य सांगतात. हळद रक्त शुद्ध करणारे, तसेच त्वचेवर कांती आणणारे औषध आहे. हिची पाने सुवासिक असतात. दूध तापवतांना किंवा लोणी कढवतांना त्यामध्ये एखादे हळदीचे पान घातल्यास दुधातुपाला त्याचा सुगंध येतो.
२० आ. लागवड : बाजारात हळद मिळत असली, तरी थोड्या प्रमाणात हळदीची लागवड आपण घरीही करावी; कारण बाजारात जी हळद मिळते, ती बनवतांना पाण्यामध्ये शिजवलेली असते. यामुळे तिच्यातील औषधी तत्त्व न्यून होते. हळदीचे बेणे (लागवडीसाठीचे कंद) हळदीची लागवड करणार्या शेतकर्यांकडे किंवा स्थानिक शेतकी कार्यालयांमध्ये मिळतात.
पावसाळ्याच्या आरंभी हळदीची लागवड करतात. साधारण ९ मासांनंतर हळदीचे कंद काढणीला येतात. हळदीची पाने वाळू लागली म्हणजे हळद काढणीला आली, असे समजतात. ४ जणांच्या कुटुंबासाठी केवळ औषधासाठी म्हणून लागवड करायची असल्यास हळदीचे अर्धा किलो बेणे पुरेसे होतात. घराभोवती जागा नसेल, तर एखाद दुसरे हळदीचे रोप कुंडीत लावावे, म्हणजे पानांसाठी त्या रोपांचा उपयोग होतो.
२१. कडूनिंब
२१ अ. महत्त्व : कडूनिंबाच्या काड्यांचा (फांदीच्या कोवळ्या टोकांचा) उपयोग नित्यनेमाने दात घासण्यासाठी केल्यास दातांचे आरोग्य टिकून रहाते. कडूनिंब रक्त शुद्ध करणारे असून त्वचा विकारांमध्ये अत्यंत उपयुक्त आहे.
२१ आ. लागवड : देशावर कडुनिंब मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे याची लागवड करण्याची आवश्यकता नसते; परंतु आपल्या आजूबाजूच्या परिसरात कडूनिंबाचे झाड नसेल, तर एखादे झाड आपण लावावे. कडूनिंबाची रोपे रोपवाटिकांमध्ये मिळतात. बियांपासून रोपे बनवली जातात.
२२. पारिजातक
२२ अ. महत्त्व : ताप, सांधेदुखी यांमध्ये पारिजातकाचा चांगला उपयोग होतो. घराशेजारी एखादे झाड असावे.
२२ आ. लागवड : याची फांद्यांपासून अभिवृद्धी करता येते. फेब्रुवारी – मार्च मासांत याच्या फांद्या रेतीत पुरून ठेवल्यास जूनपर्यंत चांगली रोपे तयार होतात आणि ती पावसाळ्यात लावता येतात.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
|
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/487492.html |