पुणे येथे ३ वर्षांच्या मुलीवर ९ वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केला. ३ वर्षांची मुलगी ‘दादा’, ‘दादा’ म्हणत ज्या मुलासमवेत खेळत होती, त्याच मुलाकडून त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर त्या बालमनावर काय बेतले असेल, याची कल्पनाही करवत नाही. प्रतिदिनच काही दिवसांनी अशा घटना घडतात याविषयी अनेक जण हळहळतात, त्याची चर्चा होते आणि सर्व सामसूम होते. पुन्हा दुसरी घटना घडल्यानंतर जनता, प्रशासन जागे होते; पण ज्या मुलीवर लैंगिक अत्याचार होतात, ती मुलगी आणि ते कुटुंब यांना मात्र कठीण परिस्थितीतून जावे लागते.
आतापर्यंत अल्पवयीन मुलींवर तरुण किंवा वयस्कर अत्याचार करत होते, अशा घटना घडत होत्या. आता ३ वर्षांची मुलगी आणि ९ वर्षांचा मुलगा हे समीकरण ऐकल्यावरच लहान मुलांवर काय संस्कार होत असतील, याची कल्पना येते. काही दिवसांपूर्वी इयत्ता पाचवीतील मुलगी आपल्या आईला सांगत होती की, आमच्या वर्गात एका मुलाचे आणि मुलीचे ‘लव्ह’ (प्रेम) आहे. आईने ‘काही कळले नाही’, अशा आविर्भावात मुलीला विचारले, ‘‘लव्ह’ म्हणजे नेमके काय ?’’ त्या वेळी ती मुलगी म्हणाली, ‘‘लव्ह म्हणजे वेगळे प्रेम !’’ त्यावर आई म्हणाली की, आपणही सर्वजण एकमेकांवर प्रेम करतो, मग वर्गातील त्या मुला-मुलीमध्ये वेगळे काय ‘लव्ह’ आहे ? त्या वेळी ती मुलगी आईला ‘ते वेगळे आहे’, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होती. जसे काही आईला काही कळत नाही, या दृष्टीने ती सांगण्याचा प्रयत्न करत होती. मुलीचे बोलणे ऐकून आई थक्क झाली. आईने डोक्यालाच हात लावला. आपण मुलीला शाळेत शिकण्यासाठी पाठवत आहोत; परंतु सध्याचे शाळेतील वातावरण किती बिघडत चाललेले आहे, या विचाराने आईही चिंतेत पडली; पण करणार काय ?
ज्या वयात लहान मुला-मुलांनी एकत्र खेळणे, बागडणे असे करणे अपेक्षित असतांना ही मुले अनावश्यक मोठी होऊन ज्या गोष्टी समजतही नाहीत, त्याचा विचार नव्हे, तर कृतीच करत आहेत, हे धक्कादायक आहे. ‘पुणे येथील घटना सामाजिक माध्यमांच्या प्रभावामुळे झालेली आहे’, असे सांगण्यात येत आहे. सर्वांनाही असेच वाटते. सामाजिक माध्यमांमुळे आजच्या मुलांवर असे संस्कार होत असतील, तर त्याविषयी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. बाल लैंगिक अत्याचार ही घटना सामाजिक माध्यमांचा दुष्परिणाम म्हणून समोर आली; परंतु अन्य अनेक दुष्परिणामही समोर येत आहेत. असे असूनही ‘विकास’ या नावाखाली आपण त्याकडे दुर्लक्ष करतो; परंतु आताची पिढी विकासाच्या नावाखाली कुठे चालली आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे. बालिकाही असुरक्षित असतांना अशा विकासाचा काय उपयोग ?
– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.