गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला २५ सहस्र रुपयांचा दंड

कचर्‍याची योग्य विल्हेवाट न लावणे आणि कचरा जाळणे यांसाठी धरले उत्तरदायी

पणजी, ११ जून (वार्ता.)-  गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील ‘बायोमेडिकल’ (जैववैद्यकीय) कचर्‍याची योग्य तर्‍हेने विल्हेवाट न लावता कचरा साठवणे, तसेच कचरा जाळणे यांसाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला उत्तरदायी ठरवले असून यापोटी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला २५ सहस्र रुपयांचा दंड आकारला आहे. प्रूडंट वाहिनीने याआधी याविषयीचे वृत्त प्रसारित केले होते. याविषयी प्रूडंट वाहिनीने उघड केलेली सर्व सूत्रे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालात आहेत. या कचर्‍याची विल्हेवाट लावून हा प्रश्‍न कसा सोडवावा ? याविषयी या मंडळाने सूचना दिल्या आहेत. ७ दिवसांत या सूचनांचे पालन करावे, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला सांगितले आहे.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. गणेश शेटगावकर म्हणाले, ‘‘गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने कचरा व्यवस्थापनामध्ये शिस्त आणली पाहिजे. कचर्‍याचे वर्गीकरण केले पाहिजे. सुका कचरा जाळू शकतो. ओल्या कचर्‍याचे ते खत बनवू शकतात आणि जैववैद्यकीय (बायोमेडिकल) कचर्‍याचे व्यवस्थापन ते स्वत: हाताळत आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने गोवा कचरा व्यवस्थापनाला विनंती केली पाहिजे की, कुंडई येथील जैववैद्यकीय कचरा हाताळण्याविषयीची सुविधा लवकर चालू करावी. यामुळे त्यांच्यावरील भार अल्प होईल. सध्या सर्व रुग्णालयांतील जैववैद्यकीय कचरा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेला जातो.’’