महामारीचे प्रमाण अल्प होईपर्यंत गोव्यातील ‘नाईटलाईफ’ बंद ठेवावे ! – मायकल लोबो, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री

‘नाईटलाईफ’ भारतीय संस्कृतीत बसत नसल्यामुळे ते कायमचेच बंद करावे !

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, ८ जून (वार्ता.)-  गोव्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण अल्प होईपर्यंत गोव्यातील ‘नाईटलाईफ’ बंद ठेवावे, असे मत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘‘जर राज्यशासन पर्यटन व्यवसाय चालू करणार असेल, तर नियमांची कडक कार्यवाही करावी लागेल.’’

मार्च मासात मंत्री लोबो यांनी याउलट विधान केले होते. त्या वेळी त्यांनी म्हटले होते की, पर्यटकांना आरोग्यविषयक नियमांची सक्ती केल्यास ते गोव्याला भेट देण्यापासून परावृत्त होतील. तुम्ही कडक मार्गदर्शक तत्त्वे ठेवल्यास गोव्यात पर्यटक कसे येतील ? आपण काळजी घेतली पाहिजे; परंतु कोरोनाचे प्रमाण वाढत असले, तरी पर्यटन व्यवसाय थांबवू शकत नाही. त्यानंतर मंत्री लोबो आमदार असलेला बागा आणि कळगुंट हा किनारपट्टी भाग कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ झाल्याचे दिसून आले.

गोव्यात येणार्‍या पर्यटकांना कोरोना ‘निगेटिव्ह’ असल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे नको म्हणणार्‍या लोबो यांनी आता म्हटले आहे, ‘‘हॉटेल्समध्ये येणार्‍या लोकांना कोरोनाची बाधा नसल्याचे (निगेटिव्ह) प्रमाणपत्र आवश्यक आहे. जर १५ जूनपासून शासन पर्यटन व्यवसाय चालू करणार असेल, तर संचारबंदी संपल्यानंतर कोरोनाविषयक सर्व नियम पाळून गोव्यात टप्प्याटप्प्याने पर्यटन चालू करण्यात यावे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती लोकहिताचा विचार करून याविषयी निर्णय घेऊ शकते. पर्यटनासाठी गोवा खुले करण्याआधी कोरोनाविषयक नियमांची कडक कार्यवाही करावी. आता पर्यटन व्यवसायाची स्थिती पूर्ववत् होण्यासाठी किमान १ वर्ष लागेल. आम्ही आर्थिक स्थिती खालावली, असे म्हणत होतो; परंतु त्यापेक्षाही जीवन महत्त्वाचे आहे. भारतामध्ये कोरोनाची लस घेणे सक्तीचे केले पाहिजे. जेव्हा मी लोकांना लस घेण्याविषयी सांगतो, तेव्हा ते ‘लस घ्यायची कि नाही, ते आम्ही ठरवू शकतो’, असे सांगतात.’’