अवकाळीच्या वादळी वार्‍यासह झालेल्या मान्सूनमुळे डाळिंब आणि केळीच्या बागा भुईसपाट !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – मान्सून चालू होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी असला तरी २९ मे या दिवशी वादळी वार्‍यासह झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार अवकाळी पावसामुळे येथील शेळवे आणि वाखरी परिसरातील डाळिंब आणि केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. या पावसात बेदाणा शेडवरील कागद उडून बेदाणा भिजल्याने शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. त्याचे तातडीने पंचनामे करून त्वरित हानीभरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

मागील १५ दिवसांत सलग दुसर्‍यांदा वादळी वार्‍यासह मुसळधार अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या केळीच्या बागा उन्मळून पडल्या आहेत. अनेक द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना मागील २ वर्षांपासून दळणवळण बंदीमुळे खुल्या बाजारात स्वत:चा माल विकता आला नाही. त्यामुळे काही शेतकर्‍यांचा बेदाणा निर्मितीकडे कल आहे. अनेकांनी आपल्या बागा उतरून बेदाण्यासाठी पत्रा शेडमध्ये माल ठेवला आहे; मात्र वादळी वार्‍यामुळे या पत्रा शेडवरील पत्रे, प्लास्टिक कागद उडून गेल्यामुळे बेदाणा भिजून चिखल झाला आहे.