दिवसभरात २४ रुग्णांचा मृत्यू, तर ६०२ नवीन कोरोनाबाधित
पणजी – गोव्यात ३१ मे या दिवशी २४ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ३ सहस्र ४ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ६०२ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण २०.०३ टक्के आहे. १ मासापूर्वी म्हणजे १ मे २०२१ ला हे प्रमाण ४४.७५ होते. ३१ मे या दिवशी दिवसभरात १ सहस्र ८२५ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १०६ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून १२ सहस्र ७६३ झाली आहे. मडगाव येथे सर्वांत अधिक १ सहस्र ७२ रुग्ण आहेत, तर त्यापाठोपाठ फोंडा येथे ७६० रुग्ण आहेत.
आतापर्यंतच्या एकूण मृत्यूंपैकी ५६ टक्के मृत्यू मे २०२१ मध्ये
पणजी – राज्यात कोरोनाचा संसर्ग चालू झाल्यापासून मागील ११ मासांमध्ये एकूण २ सहस्र ६४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर यामधील १ सहस्र ४८१ रुग्णांचा म्हणजे ५५.९ टक्के रुग्णांचा मृत्यू केवळ मे २०२१ मध्ये झालेला आहे. २२ जून २०२० ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत कोरोनामुळे एकूण १ सहस्र १६८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. गोव्यात २२ जून २०२० या दिवशी मोर्ले येथील एका ८५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हा गोव्यातील कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू होता.