साधना केल्यामुळे नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मकता निर्माण होते. आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्यामुळे बहुसंख्य जनता नकारात्मकतेमध्ये जगत आहे, हे लक्षात घ्या !
नवी देहली – ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये माणसाची वृत्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती यांच्या संबंधांविषयी प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात १५ ते ५० वर्षे वयोगटातील ३ सहस्र लोकांचा सहभाग होता. सहभागी व्यक्तींना ‘तुम्ही तुमचे आरोग्य कोणत्या श्रेणीत ठेवता ?’, असे विचारण्यात आले. यासाठी ४ श्रेणी बनवण्यात आल्या होत्या. त्यात पुष्कळ वाईट ते पुष्कळ चांगले आरोग्य असे टप्पे होते. यात ज्या व्यक्तींनी ‘माझे आरोग्य वाईट आहे’, असे सांगितले, त्या तुलनेत ज्या लोकांनी ‘माझे आरोग्य चांगले आहे’, असे सांगितले, अशा व्यक्तींचा जिवंत रहाण्याचा दर ३ पट अधिक होता. या संशोधनात अशाच लोकांना सहभागी करून घेण्यात आले, ज्यांचे आरोग्य चांगले होते आणि त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा कर्करोग यांसारख्या कोणत्याही समस्या नव्हत्या.
१. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने याविषयी केलेल्या संशोधनात ६५ वर्षे वयापेक्षा अधिक वयोगटातील ५ सहस्र लोकांचा समावेश करण्यात आला होता. जे लोक स्वतःला कमकुवत समजत होते, त्यांचा मृत्यू ५ वर्षांच्या आत झाला. जे लोक स्वतःला सशक्त आणि सुदृढ समजत होते, ते लोक अनेक आजार असूनही चांगले जीवन जगत होते. आरोग्य आणि जीवनाविषयी नकारात्मक विचार हा एका वर्षात ५० पेक्षा अधिक सिगारेट पॅक ओढण्याइतका, तसेच हृदयगती बंद होण्याइतका वाईट परिणाम करतो.
२. आरोग्य किंवा जीवन यांच्या विषयी चुकीचे विचार केल्याने क्रॉनिक स्ट्रेस निर्माण होतो. याचा थेट परिणाम हार्मोन्सवर होतो. यामुळे आनंद वाटण्यासाठी पूरक ठरणार्या हार्मोन्सचा मेंदूतील स्राव घटतो. डोपामाईन हा हार्मोन जसा अल्प व्हायला लागतो, तसा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.
३. ‘तणाव आणि नकारात्मक विचार यांचा वाईट परिणाम डी.एन्.ए.वर होतो’, असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. या कारणाने योग्य वयापूर्वीच केस पांढरे होणे, हाडे ठिसूळ होणे ही लक्षणे दिसतात. यामुळे उच्च रक्तदाब, कार्डियोव्हॅस्क्युलर आजार, पचनक्रियेशी संबंधित आजार यांचा धोका वाढतो. या आजारांचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. संबंधित व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या संसर्गाला बळी पडते.
४. सकारात्मक विचार करणार्याचे आयुर्मान वाढते. असे लोक निराशेमध्ये जाण्याचा धोका अल्प असतो. अशा लोकांना हवेच्या माध्यमातून पसरणार्या आजारांचा धोका अल्प असतो. सतत आनंदी असणार्या आणि स्वतःला निरोगी मानणार्या व्यक्तींवर सर्दी, खोकल्यासारख्या आजारांचा फारसा परिणाम होत नाही.
५. सकारात्मकेसाठी सर्वांत प्रथम गोष्ट आहे व्यायाम ! आठवड्यात किमान ३ दिवस नियमित व्यायाम केल्याने डोपामाईन हार्मोन्सचा स्राव येण्यास प्रारंभ होतो. या हार्मोन्समुळे आपण आनंदी राहू शकतो आणि आपले आरोग्य तंदुरुस्त रहाते.