नगर – कोरोनाच्या तिसर्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचा अंदाज आहे. शासनाने त्यादृष्टीने उपाययोजना करणे चालू केले आहे; मात्र दुसर्या लाटेतही लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे नगर जिल्ह्यात आढळून आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नगर जिल्ह्यातील एप्रिल आणि मे मासाची तुलनात्मक आकडेवारी दिली. त्यानुसार हे प्रमाण ९.५ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर पोचले आहे; मात्र मुलांमधील संसर्ग वाढत असला, तरी बहुतांशी रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत.