शांत, सहनशील, सेवेची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या राजापूर (रत्नागिरी) येथील सौ. स्मिता सुधाकर प्रभुदेसाई (वय ७२ वर्षे) !

राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या सौ. स्मिता सुधाकर प्रभुदेसाई यांच्याविषयी त्यांचे नातेवाइक आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. स्मिता प्रभुदेसाई

१. श्री. गजानन रामचंद्र धाक्रस (सौ. स्मिता सुधाकर प्रभुदेसाई यांचे धाकटे भाऊ)

१ अ. सौ. स्मिता सुधाकर प्रभुदेसाई यांनी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के गाठल्यामुळे भावाला त्यांचा सार्थ अभिमान वाटणे

‘१.१.२०२१ या दिवशी सौ. स्मिता सुधाकर प्रभुदेसाई यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे  सद्गुरु सत्यवान कदम यांनी ‘ऑनलाईन’ सत्संगात घोषित केले. पू. चंद्रसेन मयेकर यांनी तिच्या राजापूर येथील घरी जाऊन तिचा सत्कार केला’, यासाठी आम्ही धाक्रस कुटुंबीय त्यांच्याप्रती कृतज्ञ आहोत. माझ्या वडिलांची सर्व देवतांप्रती असलेली श्रद्धा आणि मंत्र यांचे लहानपणीच मिळालेले बाळकडू अन् योग्य वेळी विवाह होऊन नोकरी संसार सांभाळून तिने आध्यात्मिक उन्नती साधली. वडिलांनी उतारवयात आमच्या कुटुंबाचे दायित्व तिच्यावरच सोपवले होते; कारण तेव्हा आम्ही लहान होतो आणि आम्हाला आध्यात्मिक आकलन नव्हते. आई-वडिलांच्या पश्‍चात आम्हाला तिचाच मोठा आधार होता. आज आम्हाला तिचा सार्थ अभिमान वाटतो. तिच्या नि:स्वार्थी वृत्तीचे आणि सेवेचे फळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून तिला मिळाले. अशी बुद्धी कुटुंबातील सर्वांना मिळो आणि त्यायोगे समाजाचे कल्याण करण्याची संधी सर्वांना प्राप्त होवो.

२. श्रीमती अपर्णा अ. ठाकूरदेसाई (सौ. स्मिता प्रभुदेसाई यांची बहीण), बदलापूर, जिल्हा ठाणे.

२ अ. बहिणीने साधनेचा मार्ग दाखवल्यामुळे तिच्या प्रगतीमुळे आनंद होणे

माझी बहीण सौ. स्मिता प्रभुदेसाई हिची ६१ टक्के पातळी झाली, हे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला; कारण तिच्यामुळेच मी सनातन संस्थेत आले. माझ्या घरी आणि जवळपासही कुणी साधक नव्हते. त्या वेळी माझ्याकडे भ्रमणभाषही नव्हता; पण वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून तिनेच मला साधनेचे मार्गदर्शन केले आणि आमच्याकडे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू केला. प्रत्येक वेळी ती एक नवीन ग्रंथ भेट म्हणून देत असे. प्रत्येक वेळी भेटल्यानंतर पहिला प्रश्‍न विचारायची, ‘‘नामजप करतेस ना ? गुरुमाऊलीच्या चरणी शरण जा. मग एक दिवस सगळे तुझ्या मनासारखे होईल.’’ तिने साधनेचा मार्ग दाखवल्यामुळे आज मी साधनेचा आनंद अनुभवत आहे. अतिशय शांत, सहनशील, कष्टाळू आणि दुसर्‍यासाठी जीव तोडून करण्याची वृत्ती हे गुण तिच्यात असल्यामुळे तिची पातळी वाढली. त्यामुळे तिच्याहीपेक्षा मला अधिक आनंद झाला. लवकरच ती संतपदी विराजमान होवो, अशा माझ्या तिला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद अन् प.पू. गुरुदेवांना प्रार्थना !

३. श्री. प्रभाकर प्रभुदेसाई (दीर) आणि सौ. उल्का प्रभुदेसाई (जाऊ) 

३ अ. तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करणे

‘सौ. स्मितावहिनी गेली वीस-बावीस वर्षे सनातनच्या माध्यमातून  साधना करत आहेत. त्या किती तळमळीने आणि भावपूर्ण साधना करत आहेत’, हे आम्ही पाहिले आहे.

३ आ. राजापूर येथील त्यांचे घर म्हणजे सनातनचा आश्रम असणे

त्यांच्या घरी सनातनचे साहित्य आणि ग्रंथांचा साठा असल्यामुळे त्यांच्याकडे साहित्य नेण्यासाठी साधकांचे येणे-जाणे सतत चालू असते. अनेक वेळा त्यांच्या घरी सत्संग झाले आहेत आणि होत असतात, तसेच काही संतही त्यांच्या घरी राहून गेले आहेत. वहिनींचे आरोग्य फारसे चांगले नसतांनाही त्यांचे आदरातिथ्य त्या अतिशय प्रेमाने करत असतात. त्यांच्याकडे प्रसारातील साधक असायचे. त्या सकाळी महाप्रसाद घेऊन गावागावांत प्रचार प्रसाराला जात असत आणि रात्री उशिरा घरी येत असत. त्यांना येण्यास कितीही उशीर झाला, तरी त्या साधकांना गरम गरम जेवण करून घालत असत. यात त्यांचा साधक आणि संत यांच्याप्रती असलेला आदरभाव दिसतो.

३ इ. आश्रमात रहायला जाण्याची तीव्र इच्छा असणे

माझा मुलगा श्री. योगेश याचा विवाह काही वर्षांपूर्वी रामनाथी आश्रमात झाला होता. त्या वेळी विवाहाच्या दिवशी सायंकाळी आशीर्वाद घेण्यासाठी एका संतांची भेट झाली. त्या सत्संगाच्या वेळी स्मितावहिनींनी त्यांना सांगितले, ‘‘माझी आश्रमात येण्याची तीव्र इच्छा आहे.’’ अशी इच्छा कुणीही प्रदर्शित केल्यास संत त्यांना ‘या’ म्हणून सांगतात; पण वहिनींना मात्र ते म्हणाले, ‘‘तुम्ही राजापूर येथे राहूनच सेवा आणि साधना करायची आहे.’’ त्या वेळी मला वाटले, ‘त्या थोड्याशा दुःखी होतील’; पण तसे झाले नाही. आता त्यांनी राजापूर येथेच राहून साधना का करायला सांगितली, त्याचे उत्तर मिळाले. ‘तेथे राहूनच त्यांची प्रगती व्हायची होती’, हेच त्याचे उत्तर आहे.

३ ई. घराण्यातील सर्व कुलाचार आणि धर्माचरण करणे

आमचे कुटुंब मोठे असून त्या सर्वांत मोठ्या वहिनी आहेत. त्यामुळे घराण्यातील सर्व कुलाचार आणि धर्माचरण करण्याचे दायित्व त्यांच्यावर असते. त्या सर्व सणवार आणि कुलाचार अतिशय भावपूर्ण करतात.

३ उ. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यापेक्षा नामजपाला प्राधान्य देणे

आमच्या कुटुंबात मध्यंतरी एक कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची आखणी अमेरिकेत रहात असलेल्या आमच्या एका भाचीने केली होती. निरनिराळ्या ठिकाणी रहात असलेल्या सर्वांच्या वेळेचा विचार करून ती आखणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे तो कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सर्वजण भ्रमणभाषवर दिसत होते; मात्र वहिनी दिसल्या नाहीत; म्हणून ‘आम्ही मोठ्या भावाकडे विचारणा केली असता त्याने सांगितले, ‘‘ती नामजपाला गेली आहे.’’ आम्ही सर्वजण त्या कार्यक्रमात मग्न असतांना वहिनी नामजपाचे महत्त्व लक्षात घेऊन कार्यक्रमात गुंतून राहिल्या नाहीत.

३ ऊ. गुरूंप्रती भाव आणि साधनेची तीव्र तळमळ जाणवणे

त्यांच्याशी आमचे भ्रमणभाषवर किंवा प्रत्यक्ष बोलणे होत असे. त्या वेळी त्यांच्यात गुरूंप्रती भाव आणि साधनेची तळमळ दिसत असे. मध्यंतरी आमच्या गावी एक कुटुंबियांचा एकत्र भेटण्याचा दहा-बारा दिवसांचा कार्यक्रम झाला होता. त्या वेळी अनेक कुटुंबीय गावी जमले होते; पण वहिनी आणि त्यांच्या समवेत आम्हीही एका स्वतंत्र जागेत जाऊन ठरलेल्या वेळी नामजप करत असू.

४. सौ. राधा प्रभुदेसाई (सौ. स्मिता प्रभुदेसाई यांची चुलत सून), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

४ अ. स्वच्छता आणि व्यवस्थितपणा

‘दोन वर्षांपूर्वी मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांच्या घरात स्वच्छता आणि व्यवस्थितपणा दिसला. मला पुष्कळ आश्‍चर्य वाटले की, ‘एवढे वय असूनही काकू घरातील सर्व कामे चांगल्या प्रकारे कशा करू शकतात ? काकूंनी घर सांभाळतांना पुष्कळ कष्ट घेतले आहेत. त्याचमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना त्याचे फळ दिले आहे.’

४ आ. दुसर्‍यांचा विचार करणे

काकूंमध्ये असलेला दुसर्‍यांचा विचार करणे हा गुण माझ्या लक्षात आला. मी देवद आश्रमात रहात असतांना काकू कोणत्याही कामासाठी भ्रमणभाष करायचा असेल, तर आधी विचारतात, ‘‘तुझी सेवा चालू असेल का ? म्हणून मी तुला आधी भ्रमणभाष केला नाही.’’

४ इ. आज्ञापालन

सौ. स्मिता प्रभुदेसाई या साधकांसाठी साधनेविषयी ज्या काही सूचना दिल्या जातात किंवा नामजप सांगितला जातो, त्याचे संपूर्णपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात. ‘दळणवळण बंदीच्या काळात सांगितलेेले मंत्रजप पूर्ण कसे होतील ?’, याचा काकू सतत प्रयत्न करत होत्या. काकू स्वतःसह घरातील सदस्यांनासुद्धा तो मंत्रजप पूर्ण करण्यासाठी सांगत होत्या. काकू कधी कधी त्यांना स्वतःसमवेत घेऊन मंत्रजप करायच्या. काकूंनी नियमितपणे मंत्रजप आणि नामजप केला. काकू पहाटे ५ वाजता उठून सामूहिक जप करत होत्या आणि सर्वांना घेऊन अग्निहोत्र करण्याचा प्रयत्न करत होत्या.

४ ई. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रिया चांगल्या प्रकारे होत नसल्याची खंत वाटणे

काकूंच्या मनात नेहमी असते, ‘मी अल्प पडते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व करायला सांगितले आहे; परंतु माझ्याकडून तसे होत नाही.’ त्यांच्या मनात नेहमी खंत असतेे, ‘माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया होत नाही.’

४ उ. सेवेची तळमळ असणे

त्यांची सेवेप्रती तळमळ दिसून येते. काकूंचे वय ७२ वर्षें आहे. काम करतांना त्यांचे हात थरथरतात. त्यामुळे त्यांना एकेक काम करायला बराच वेळ लागतो. घरात एकट्याच असूनही घरातील सर्व कामे करून वेळ काढून त्या घरातच सेवा करतात.

४ ऊ. साधनेची तळमळ असणे

काकूंमध्ये साधनेप्रती पुष्कळ तळमळसुद्धा आहे. ‘साधनेत आणखी काय करू ? आणखी काय करायला पाहिजे ?’, याविषयी त्या सतर्कतेने नेहमी विचारतात. ‘संतांनी काय सांगितले आहे ? साधनेमध्ये काही नवीन प्रयत्न करायला सांगितले आहेत का ?’, असे त्या मला विचारतात.

साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. सौ. श्‍वेता राजीव सिनकर, राजापूर  

१ अ. शिकण्याची वृत्ती

अहवाल, आढावे इत्यादी ‘ऑनलाईन’ पाठवण्यासाठी आपल्याला टंकलेखन करता आले पाहिजे; म्हणून शारीरिक क्षमता नसतांनाही त्या टंकलेखन (टायपिंग) शिकण्याकरता चालत शाळेपर्यंत जात होत्या.

१ आ. गुरुकार्याची तळमळ

त्यांना सत्संग घेण्याची तळमळ होती. ‘गुरूंचेे अमूल्य ज्ञान समाजापर्यंत पोचावे’, असेच त्यांना वाटत होते; म्हणून त्या ‘ऑनलाईन’ होणार्‍या सत्संगाच्या अभ्यासवर्गांना नियमित उपस्थित रहायच्या.

१ इ. संतसेवा भावपूर्ण करणे

राजापूरमध्ये संत यायचे, तेव्हा त्यांची निवासव्यवस्था सौ. प्रभुदेसाईबाईंकडे असायची. त्या वेळी मला सेवेची संधी मिळायची. तेव्हा असे लक्षात आले, ‘त्या अगदी बारीक गोष्टींचे नियोजन करायच्या. त्यातून त्यांचा गुरूंप्रती असलेला भाव दिसून यायचा. त्या रात्री उशिरापर्यंत जागून सेवा पूर्ण करायच्या. या सेवेत त्या त्यांचे यजमान आणि मुलगा यांनाही सहभागी करून घ्यायच्या.’

१ ई. स्वावलंबी होणे

आता बर्‍याच सेवा आणि सत्संग ‘ऑनलाईन’ असल्यामुळे त्यांनी ‘भ्रमणभाष कसा हाताळायचा ?’, हे शिकून घेतले. त्यासाठी अनेक वेळा त्या आमच्याकडे यायच्या. ‘दुसर्‍यावर अवलंबून न रहाता आपल्याला हे जमले पाहिजे’, असा त्यांचा ध्यास होता.

१ उ. ‘गुरूंचा संदेश घरोघर पोचावा’, अशी तळमळ असणे

साधकांना सेवेला उद्युक्त करण्यासाठी त्या आध्यात्मिक दृष्टीकोन देतात. एखादी मागणी घ्यायची झाल्यास त्या सतत पाठपुरावा करतात. ग्रंथ, उत्पादने, पंचांग, दैनिक ‘सनातन प्रभात’ समाजात अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावेत, यासाठी त्यांची धडपड असते. प्रत्येक विशेषांकाच्या वेळेला त्यांची दैनिक ‘सनातन प्रभात’ची मागणी अधिक असते. यातून ‘गुरूंचा संदेश घरोघर पोचावा’, असेच त्यांना वाटते.

१ ऊ. सेवेची तळमळ

वर्ष २०१२ मध्ये त्यांनी त्यांच्या यजमानांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या वेळी सनातनचे ग्रंथ आणि काही इतर आध्यात्मिक ग्रंथ यांची तुला केली होती. त्यानंतर त्यांनी त्या आध्यात्मिक ग्रंथांचे वितरण केले. शारीरिक क्षमता नसल्याने त्या बाहेर जाऊन सेवा करू शकत नाहीत; परंतु संपर्क करून ग्रंथांची मागणी घेणे, विज्ञापने घेणे, प्रवचन घेणे अशा विविध सेवा करतात. यातून त्यांची ईश्‍वरीकार्याची तळमळ दिसून येते.

सौ. बाईंकडे साधनेची तळमळ, सातत्य, प्रेमभाव, सेवावृत्ती, गुरुकार्याची ओढ, गुरूंप्रती श्रद्धा, भाव हे गुण दिसून येतात. त्यांच्या रूपाने एक साधक फूल गुरुदेवांच्या चरणी अर्पण झाल्यामुळे कृतज्ञता !

२. श्री. राजीव सिनकर, राजापूर

२ अ. सेवेची तळमळ

शारीरिक क्षमता नसतांनाही आणि सत्संगाचे ठिकाण दूर असले, तरी त्या चालत किंवा रिक्शाने जायच्या. ग्रंथ कक्षासाठी त्या रात्री जागरण करूनही साहित्य आणि ग्रंथसाठा काढत असत. ‘सर्व सत्संगांना उपस्थित रहावे’, अशी त्यांची तळमळ असे.

२ आ. ‘मी गुरुकार्य करण्यात न्यून पडते. मी बाहेर जाऊ शकत नाही’, याची त्यांना खंत वाटत असते.

या उतारवयात त्यांची सेवा आणि गुरुकार्याविषयी असलेली तळमळ अन् गुरूंविषयी असलेला भाव, हे सर्व आम्हाला आदर्शवत् आहे. त्यांची प्रगती लवकर होऊन त्या संतपदी पोचाव्यात, ही गुरुचरणी प्रार्थना !’