कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍याच्या कुटुंबियांना टाटा स्टील निवृत्तीच्या वयापर्यंत वेतन देणार !

अशी माणुसकी केवळ टाटा आस्थापनच दाखवू शकते, असेच जनतेला वाटणार !

नवी देहली – आमच्या कुठल्याही कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना त्या कर्मचार्‍याच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत (म्हणजे संबंधित कर्मचार्‍याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत) संपूर्ण वेतन देण्यात येईल. एवढेच नव्हे, तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण व्यवस्थादेखील आस्थापनच करील आणि अशा कुटुंबांना वैद्यकीय, तसेच निवासाची सुविधाही मिळत राहील, अशी घोषणा टाटा स्टीलने केली आहे. कर्तव्य बजावत असतांना एखाद्या फ्रंटलाईन कामगाराचा मृत्यू झाला, तर आस्थापन त्याच्या मुलांचा भारतात पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार आहे, असेही या आस्थापनाने म्हटले आहे.