गोव्यात दहावीच्या परीक्षा रहित : आंतरिक परीक्षांच्या गुणांवरून उत्तीर्ण करणार

पणजी, २३ मे (वार्ता.) – गोवा शासनाने २३ मे या दिवशी महत्त्वपूर्ण निर्णय घेतांना गोवा शालांत मंडळाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षा रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री पद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘इयत्ता १० वीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या आंतरिक (शाळेने वर्षभरात घेतलेल्या) परीक्षांतील गुणांवरून उत्तीर्ण करण्याचे ठरवण्यात येणार आहे.’’ डॉ. सावंत यांनी २३ मे या दिवशी प्रारंभी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या ‘व्हर्च्यूअल’ बैठकीत उपस्थिती लावली. या बैठकीला देशातील बहुतेक राज्यातील शिक्षणमंत्र्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर सायंकाळी गोमंतकियांना संबोधित करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलेली अन्य महत्त्वाची सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

डॉ. प्रमोद सावंत

१. आंतरिक परीक्षांचे मूल्यांकन केल्यानंतर एखादा विद्यार्थी १ किंवा २ विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेला असल्यास त्याला ‘एटीकेटी’ सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

२. ज्या विद्यार्थ्यांना ११ वी इयत्तेत विज्ञान शाखेत किंवा डिप्लोमा कोर्स यांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांना ३ घंटा अवधीची एक प्रवेशपरीक्षा द्यावी लागणार आहे. ही प्रवेशपरीक्षा जुलै मासाच्या अखेर घेण्यात येईल.

३. आयटीआय विद्यार्थ्यांना आंतरिक गुण पद्धत नाही. या विद्यार्थ्यांसाठी १ किंवा ३ दिवस कालावधी असलेली परीक्षा घेण्यात येणार आहे. याविषयी पुढील निर्णय गोवा शालांत मंडळ घेईल.

४. विद्यार्थीवर्ग आणि त्यांचे पालक यांना विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरून प्रचंड ताण आहे. विद्यमान स्थितीत तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या शिक्षणतज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारसीवरून आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाशी समन्वय करून गोवा शासनाने हा निर्णय घेतला आहे.

केंद्राशी समन्वय करून पुढील २ दिवसांत १२ वीच्या परीक्षांविषयी निर्णय घेणार

गोवा शालांत मंडळाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा घेण्यासंबंधी अजूनही निर्णय झालेला नाही. पुढील २ दिवसांत यासंबंधी निर्णय घेतला जाणार आहे. १२ वीतील विद्यार्थी ‘जीईई’ आणि ‘एन्.इ.इ.टी.’ परीक्षा देतात. त्यामुळे गोवा शालांत मंडळाच्या १२ वीच्या परीक्षांचा निर्णय केंद्रशासनाशी समन्वय करून घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.