गोव्यात गोमेकॉ वगळता इतर औषधालयांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ आजारावरील औषध उपलब्ध नाही !

लोकहो, अशा संकटांपासून ‘देवच वाचवील’, या श्रद्धेने साधना कराल, तरच सर्वच संकटांतूनही वाचाल !

पणजी, २० मे (वार्ता.) –  गोव्यात सध्या ‘ब्लॅक फंगस’ नावाने ओळखल्या जाणार्‍या ‘म्युकरमायकोसिस’ या रोगावरील ‘अम्फोेटेरिसीन बी’ हे औषध गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही औषधालयात उपलब्ध नाही. गोव्यातील ‘केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष आल्बर्ट डिसा म्हणाले, ‘‘या आजाराचे रुग्ण जेव्हा इतर राज्यांत आढळू लागले, तेव्हा गोव्यातही या आजारावरील औषधाची आवश्यकता भासेल; असा अंदाज करून मी ‘सन फार्मा’ या आस्थापनाला या आजारावरील औषध पाठवण्यास सांगितले होते; परंतु या आस्थापनाकडेही ते औषध उपलब्ध नव्हते. गेल्या २ दिवसांत या औषधासाठी ६ जणांनी मला संपर्क केला; परंतु आमच्याकडे औषध उपलब्ध नव्हते. ‘अम्फोेटेरिसीन बी’ औषधाचा पुरवठा आस्थापनांकडून न होण्यात कोणतेही कारण नाही. मला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे (गोमेकॉचे) अधिष्ठाता(डीन) डॉ. बांदेकर यांच्याशी बोलून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात या औषधाचा साठा आहे का ? हे बघावे लागेल.’’

२ दिवसांपूर्वी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. संजय बांदेकर यांनी ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराचे ६ रुग्ण गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले होते. याशिवाय दक्षिण गोव्यातील खासगी रुग्णालयात २ रुग्ण या आजारावर उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे. पणजीतील एका औषधालयाचे मालक प्रसाद तांबा यांच्याकडे या आजारावरील ५ रुग्णांकडून ‘अम्फोेटेरिसीन बी’ या औषधाची मागणी करण्यात आली होती. ते म्हणाले की, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशिवाय अन्य कोणत्याही औषधालयात हे औषध उपलब्ध आहे, असे वाटत नाही.