-
मृतदेह बापगाव येथे फेकला
-
निषेध मोर्चाद्वारे नागरिकांचा संताप व्यक्त
कल्याण – येथील चक्कीनाका भागातील १३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मुख्य सूत्रधार विशाल गवळी याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून, तर त्याची पत्नी साक्षी गवळी हिला कल्याण शहरातून अटक केली आहे. विशाल याला पोलिसांनी अटक केल्यावर त्यांनी हाताच्या बोटांद्वारे जिंकल्याची निशाणी (व्हिक्टरी साईन) केली. (अशा निर्लज्जांना फासावरच चढवायला हवे ! – संपादक)
विशालने मुलीला बळजोरीने रिक्शात घालून पळवून नेल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. या प्रकरणी रिक्शाचालकालाही कह्यात घेण्यात आले आहे. यातील आणखी आरोपींचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेण्यात येत आहे. बदलापूर प्रकरणाप्रमाणे कल्याणच्या आरोपीवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
सप्टेंबर २०२४ मध्येही आरोपी विशालने एका मुलीचे अपहरण करत तिची हत्या केली होती. (तेव्हाच त्याच्यावर कठोर कारवाई केली असती, तर दुसर्या मुलीची हत्या झाली नसती ! – संपादक) ‘कल्याण येथे मुलीला उचलून नेतांना विशालला अनेकांनी पाहिले होते; पण भीतीने कुणीही पुढे आले नाही’, असा आरोप मुलीच्या आईने केला.
१. विशालवर यापूर्वी विनयभंग, जबरी चोरी, मारहाण असे एकूण ६ गुन्हे नोंदवलेले आहेत. यापूर्वी दोन प्रकरणांत त्याला तडीपारीची शिक्षा झाली होती. अलीकडेच तो जामिनावर बाहेर आला होता. त्याचे २ विवाह झाले आहेत.
२. अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर विशाल कल्याण शहरातून पळून गेला. तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे त्याच्या सासरी पोचला.
३. विशालला दाढी आहे; पण कुणी ओळखू नये, यासाठी त्याने केशकर्तनालयात दाढी केली. त्यानंतर पेहराव पालटून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पकडले.
नागरिकांचा निषेध मोर्चा
या घटनेनंतर कल्याण येथील नागरिकांनी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला. पीडित मृत मुलीच्या घरापासून हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी ‘देशात आणखी किती निर्भया (वर्ष २०१२ मधील देहली येथील सामूहिक बलात्कार प्रकरण) होणार आहेत ?’,‘कधी थांबणार महिलांची अवहेलना ?’ असे प्रश्न उपस्थित केले. ‘आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्या, बदलापूर येथील बलात्काराच्या प्रकरणाप्रमाणे त्याचेही एन्काऊंटर (चकमकीत ठार करणे) करा’, अशी मागणी नागरिकांनी केली.
काय आहे प्रकरण ?
२३ डिसेंबरच्या संध्याकाळी १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी तिच्या आईकडून २० रुपये घेऊन खाऊ आणायला गेली होती; पण ती घरी परतली नाही. आई-वडिलांनी शोध घेऊनही ती न सापडल्याने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर बापगाव येथे तिचा मृतदेह आढळला. मृतदेहाचा शवविच्छेदन केल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. |
संपादकीय भूमिका :
|