सैन्यदल भरतीचा पेपर फोडणारा अधिकारी आणि त्याचा साथीदार यांना अटक !

भ्रष्टाचाराची लागण सैन्याला होणे गंभीर आहे. अशा भ्रष्ट अधिकार्‍यांपासूनच देशाला धोका आहे. त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणे आवश्यक !

पुणे – भारताच्या स्थल सेनेमध्ये विविध पदांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाते. अशाप्रकारे भारतभर ४० केंद्रांमध्ये ‘आर्मी शिपाई’ या पदासाठी भरती प्रक्रिया चालू होती. त्याची लेखी परीक्षा २८ फेब्रुवारी २०२१ या दिवशी होणार होती; मात्र या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका काही व्यक्ती ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून खासगी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या घटनेविषयी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अधिकारी वसंत किलारी, प्रक्रिया प्रमुख अधिकारी भगतप्रितसिंग बेदी, नारनेपाटी विरप्रसाद, ‘आर्मी अधिकारी’ थिरू मुरगन यांच्यासह ९ आरोपींना अटक केली आहे.