आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार्‍या मानसिक समस्यांवरील काही उपाययोजना

पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. अशा प्रसंगी सर्वत्र विध्वंस होणे, आगी लागणेे, गल्लोगल्ली मृतदेह पडलेले असणे यांसारख्या घटना घडतात. अशा घटना पाहून वा ऐकून अनेकांना मन अस्थिर होणे, मनावर ताण येणे, काळजी वाटणे, भीती वाटणे, परिस्थिती स्वीकारता न येणे इत्यादी त्रास होतात. बर्‍याच जणांना नातेवाइकांतही भावनिकदृष्ट्या अडकायला होते. असे झाल्यास मानसोपचारतज्ञाचे साहाय्य घ्यावे. याचसमवेत अशा प्रकारचे त्रास होऊ नयेत, म्हणजेच मनाचे संतुलन ढळू न देता प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी करायच्या उपाययोजना पुढे सांगितल्या आहेत. २५ एप्रिल २०२१ या दिवशी यातील काही भाग आपण पाहिला. आता पुढील भाग पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : sanatanprabhat.org/marathi/471372.html

दंगल चालू असतांना घ्यायची स्वयंसूचना

जेव्हा मी रहात असलेल्या शहरात दंगल चालू होईल, तेव्हा हे आपत्काळ चालू झाल्याचे लक्षण आहे आणि केवळ साधनाच माझे रक्षण करू शकेल, याची मला जाणीव होईल. त्यामुळे मी आवश्यक ती सुरक्षेची उपाययोजना करून भावपूर्ण नामजप करीन.

नातेवाइकांमध्ये भावनिकदृष्ट्या न अडकण्यासाठी स्वयंसूचना

१. प्रसंग : भविष्यात होणार्‍या तिसर्‍या महायुद्धाच्या काळात माझ्या कुटुंबियांचे काय होईल ?, असा विचार केल्यामुळे मला चिंता वाटते.

आणीबाणीच्या काळात घ्यायची स्वयंसूचना

स्वयंसूचना १ : जेव्हा माझे कुटुंबीय तिसर्‍या जागतिक महायुद्धात/ युद्धात वाचतील का ?, या विचाराने मला चिंता वाटेल, तेव्हा मी त्यांना यापूर्वीच युद्धकाळात घ्यावयाची काळजी आणि साधनेचे महत्त्व यांविषयी सांगितले आहे, याची मला जाणीव होईल. त्यामुळे मी शांतपणे स्वतःच्या साधनेचे प्रयत्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करीन.

स्वयंसूचना २ : जेव्हा माझे कुटुंबीय तिसर्‍या जागतिक महायुद्धात/ युद्धात वाचतील का ?, या विचाराने मला चिंता वाटेल, तेव्हा कुटुंबियांनी साधना केल्यास देवच त्यांचे रक्षण करेल, याची मला जाणीव होईल. त्यामुळे मी त्यांना हे सूत्र सांगीन आणि माझे साधनेचे प्रयत्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करीन.

२. प्रसंग : माझे कुटुंबीय पूर येणार्‍या भागात रहात असल्यामुळे पूर आल्यास त्यांचे काय होईल ?, या विचाराने मला चिंता वाटते.

आणीबाणीच्या काळात घ्यायची स्वयंसूचना

स्वयंसूचना : जेव्हा माझे कुटुंबीय रहात असलेल्या भागात पूर येईल, तेव्हा त्यांचा जीव आणि आवश्यक वस्तू वाचवण्याविषयी सांगून तेथील स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करायला सांगणे, हेच माझ्याकडून त्यांना होणारे सर्वोत्तम साहाय्य आहे, याची मला जाणीव होईल आणि मी तसे करीन, तसेच मी त्यांना नामजप करण्याविषयी प्रोत्साहित करीन.

३. प्रसंग : शीघ्रतेने जवळ येत असलेल्या आपत्काळाचे माझे जावई आणि त्यांचे कुटुंबीय यांना गांभीर्य वाटत नाही, याचा मला ताण येतो.

प्रसंग घडतांना घ्यायच्या स्वयंसूचना

अ. जेव्हा शीघ्रतेने जवळ येत असलेल्या आपत्काळाविषयी माझे जावई आणि त्यांचे कुटुंबीय यांना गांभीर्य वाटत नाही आणि त्यामुळे माझ्या मुलीला त्रास सहन करावा लागू शकतो, याचा मला ताण येईल, तेव्हा याविषयी पुनःपुन्हा सांगितल्यास संघर्ष निर्माण होईल, याची मला जाणीव होईल आणि मी माझ्या मुलीला आवश्यक ती सिद्धता करायला सांगीन/ आपत्काळात टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारी साधना करायला सांगीन.

आ. जेव्हा शीघ्रतेने जवळ येत असलेल्या आपत्काळाविषयी माझे जावई आणि त्यांचे कुटुंबीय यांना गांभीर्य वाटत नाही, या विचाराने मला ताण येईल, तेव्हा मी त्यांना याविषयी माहिती देण्याचे कर्तव्य केले आहे आणि देव त्यांच्यासाठी जे योग्य आहे, तेच करेल, याची मला जाणीव होईल अन् मी शांतपणे माझे इतर आवश्यक प्रयत्न चालू ठेवीन.

इ. जेव्हा शीघ्रतेने जवळ येत असलेल्या आपत्काळाविषयी माझे जावई आणि त्यांचे कुटुंबीय यांना गांभीर्य वाटत नाही, या विचाराने मला ताण येईल, तेव्हा मी त्यांना याविषयी माहिती देण्याचे कर्तव्य केले आहे, याची मला जाणीव होईल आणि त्यांनी काय करावे ?, हा त्यांचा निर्णय असेल, असा विचार करून मी मला आणि माझ्या कुटुंबियांना येणार्‍या काळाला तोंड देता यावे, यासाठी आवश्यक ते प्रयत्न करीन.

अ. परिस्थिती पालटणे अशक्य असल्याने प्रसंगाकडे तत्त्वज्ञाच्या भूमिकेतून पहाणे, यानुसार द्यावयाच्या स्वयंसूचनांची उदाहरणे

दंगल होत असतांना द्यायची स्वयंसूचना

ज्या वेळी मी रहात असलेल्या भागात मोठी दंगल होत असेल, त्या वेळी सध्या समष्टी पाप वाढल्यामुळे अशा नकारात्मक घटनांत वृद्धी होत आहे आणि या समष्टी प्रारब्धातून देवच आम्हाला सोडवणार आहे, याची मला जाणीव होईल अन् मी श्रद्धेने आणि भावपूर्ण नामजप करीन.

(वरील स्वयंसूचनांच्या धर्तीवर मित्रमंडळी, शेजारी इत्यादींमध्येही भावनिकदृष्ट्या अडकू नये, यासाठी स्वयंसूचना बनवता येतील.)

आ. आपत्काळाच्या विचाराने मनाची अस्वस्थता पुष्कळ वाढल्यास मनाला आपत्काळाच्या संदर्भात स्वयंसूचना स्वीकारण्याच्या सकारात्मक स्थितीत आणण्यासाठी करायचे उपाय : काही जण अती भावनाशील वा मनाने पुष्कळ दुर्बल असतात. पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी संकटे पाहून ते गर्भगळीत होतात. त्यांना या आपत्काळाच्या संदर्भातील स्वयंसूचना देणेही नको वाटते. काहींचे मन अस्वस्थ असल्यामुळे त्यांना स्वयंसूचना देेण्याची आठवणही रहात नाही. अशा व्यक्तींच्या मनाला आपत्काळाच्या संदर्भात स्वयंसूचना स्वीकारण्याच्या सकारात्मक स्थितीत आणण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या प्रोत्साहनपर स्वयंसूचना आणि आपत्कालीन स्थितीतून तरून जाण्याकरता गुरु किंवा देव यांच्यावरील श्रद्धा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारी काही प्रेरक वाक्ये सनातनचा ग्रंथ आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर करायच्या सिद्धता यात दिली आहेत.

(समाप्त)