सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या अन्य घडामोडी

अनावश्यक फिरणार्‍यांच्या ५ दुचाकी पोलिसांच्या कह्यात

मालवण – संचारबंदी आणि दळणवळण बंदीच्या कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई केली. या वेळी पोलिसांनी ५ दुचाकी कह्यात घेतल्या, तर कणकवली येथे अनावश्यक फिरणार्‍या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मालवण येथे लसीकरण केंद्रावर गोंधळ होऊ नये, यासाठी नावनोंदणी करण्याचा निर्णय

मालवण – येथील मामा वरेरकर नाट्यगृहात लसीकरणासाठी योग्य नियोजन नसल्याने मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले अन् गोंधळ झाला. त्यामुळे आता ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांना कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घ्यायचा आहे, त्यांची नावनोंदणी मालवण ग्रामीण रुग्णालयात सकाळी ९ ते १ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत ०२३६५-२५२०३२ या दूरभाष क्रमांकावर करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्यांना लस उपलब्ध झाल्यावर बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला.

कणकवलीमध्ये ‘रॅपिड टेस्ट’मध्ये ८ जण कोरोनाबाधित असल्याचे उघड

कणकवली – गेल्या १३ दिवसांनंतर कणकवली तालुक्यातील दळणवळण बंदी शिथिल करण्यात आल्यानंतर शहरातील बाजारपेठेत गर्दी उसळली. या वेळी आरोग्य विभागाच्या वतीने ‘रॅपिड टेस्ट’ करण्यात येत होती. या तपासणीत ८ जण कोरोनाबाधित असल्याचे उघड झाले. दळणवळण बंदी उठताच बाजारपेठांतून होणार्‍या गर्दीमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.