१. रामनाथी आश्रमात शिबिरासाठी जाण्याविषयी समजल्यावर झालेली मनाची स्थिती
‘मला रामनाथी आश्रमात शिबिरासाठी जायचे आहे’, असे समजल्यावर मला ‘वैकुंठभूमीत जायला मिळणार’, याचा आनंद झाला; पण ‘माझ्याकडे विज्ञापन सेवा आहे आणि याच कालावधीत ‘विज्ञापने येणे आणि त्यांची संरचना करून समयमर्यादेत पाठवणे’ ही सेवा आहे’, असे विचार माझ्या मनात चालू झाले. या वर्षी ‘संरचना करणार्या साधकाला नोकरी लागल्यामुळे सेवा कशी करायची ?’, ही अडचण होती; पण मनातून ‘आश्रमात शिबिराला जायचे’, अशी तीव्र इच्छा होती.
२. पूर्वी विज्ञापनाची सेवा केलेली साधिका दायित्व घ्यायला सिद्ध होणे आणि देवाची कृपा अन् संतांचे मार्गदर्शन यांमुळे रामनाथी आश्रमात जाण्यासंदर्भात येत असलेले अडथळे दूर होणे
रामनाथी आश्रमात जाण्याचे तिकीट काढल्यावर १५ दिवसांनी मला समजले, ‘लवकर, म्हणजे ८ जूनलाच रामनाथी आश्रमात जायचे आहे.’ माझ्या मनाचा संघर्ष चालू झाला. पू. (सौ.) संगीता जाधवकाकूंनी ‘विज्ञापन सेवा करायला अन्य कुणी साधक आहेत का ?’, हे पहायला सांगितले. तेव्हा पूर्वी ही सेवा केलेली साधिका दायित्व घ्यायला सिद्ध झाली आणि पाच जणांचा गट सिद्ध झाला. त्या वेळी माझ्याकडे कृतज्ञतेसाठी शब्दच नव्हते. ‘देवाला स्थिती पालटायची असेल, तर तो कसा पालट करू शकतो ?’, हे मी अनुभवत होते.
३. शिबिरासाठी रामनाथी आश्रमात असण्याच्या कालावधीत मुलाच्या शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे ठरणे, त्याने आधीच जाण्याची सिद्धता करायला सांगणे
मी रामनाथी आश्रमात जाण्यासाठी ८ जूनचे तिकीट काढले. त्यानंतर मला समजले, ‘गुरुराजला (मुलाला) कॉलेजकडून शिष्यवृत्ती मिळाली आहे आणि १७ जूनला त्याला विदेशात जायचे आहे.’ तेव्हा तो प्रथम म्हणाला, ‘‘मी गेल्यावर तू आश्रमात जा किंवा त्या वेळेपुरते घरी येऊन आश्रमात परत जा.’’ त्या वेळी पुन्हा संघर्ष चालू झाला. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘तुम्हीच आता या स्थितीत ‘काय निर्णय घ्यायचा ?’, ते सुचवा.’ त्यानंतर २ दिवसांनी गुरुराजने स्वतःहून सांगितले, ‘‘तू आहेस तोपर्यंत माझी सिद्धता करून दे आणि आश्रमात जा.’’ त्या वेळीही कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्दच नव्हते. देव जणू माझ्यासाठी वैकुंठलोकाला जाण्यासाठीचा पथ सुकर करत होता. मला एकीकडे देवाला भेटायची ओढ वाटत होती आणि दुसरीकडे माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे मला त्रास होत होता.
४. आश्रमात येण्यापूर्वी असलेली मनाची स्थिती
आश्रमात येण्यापूर्वी ‘या शिबिराच्या निमित्ताने रामनाथीला जायला मिळेल. अनेक संतांचे दर्शन होईल आणि अशी संधी परत मिळेल न मिळेल’, असे विचार मनात येत होते.
५. आश्रमात आल्यावर मनाच्या स्थितीत झालेला पालट
अ. १९.६.२०१९ या दिवशी भावसत्संग होता. मी शिबिराला आले; पण इकडे आल्यापासून मला ‘गुरुदेवांविषयी ओढ’ किंवा ‘त्यांना भेटले पाहिजे’, असे राहिलेच नाही. ‘हे असे का झाले ?’, ते कळले नाही; पण ‘ती तळमळ किंवा तो भाव नव्हता’, असे नव्हते.
आ. पूर्वी भावनाशीलतेमुळे मला रडू यायचे; पण आश्रमात आल्यापासून ‘प्रसंग झाला, तरी मन स्थिर असते आणि आता पुढे काय ?’, असे विचार येतात. मला अलिप्तपणा जाणवूनही ते करायचे असते. ‘ही स्थिती काय आहे ?’, हे कळत नाही.
‘हे कृपाळू गुरुमाऊली, तुम्ही मला या वैकुंठलोकाचे वैकुंठपती आणि साक्षात् श्री महालक्ष्मीदेवी यांचे दर्शन घडवले. तुमच्या कृपेने आश्रमात मला सकारात्मक ऊर्जा मिळाली. आता मला वाटते, ‘देवाने मला या प्रवाहात आणले आहे आणि हा प्रवाहच मला पुढे घेऊन जाणार आहे.’
– सौ. पुष्पा चौगुले, नवीन पनवेल, रायगड. (२२.६.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |